इगतपुरी । प्रतिनिधी Igaptpuri
शनिवार दि. ९ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुंबईहुन नांदेडला जाणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेसला कसारा रेल्वे स्थानकाजवळील सिग्नल जवळ उभी असतांना एका बोगीच्या खाली अचानक आग लागली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाल्याने या डब्ब्यातील सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरविण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
या बाबत अधिक माहिती अशी की, सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नांदेडकडे जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस कसारा स्थानकाच्या अलिकडील सिग्नल जवळ उभी असताना एका बोगीच्या खालील असलेल्या कॉम्प्रेसरच्या बाजूने धुर आला व अचानक आग लागून केबलनेही पेट घेतला. घटनेची माहिती समजताच आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य शुभम धोंगडे व अन्य सदस्य व रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या बोगीतील सर्व प्रवाशांना खाली उतरवून इतर बोगीत हलविण्यात आले. यावेळी रेल्वे कर्मचारी व या सदस्यांनी गाडीतील फायर सिलेंडरच्या व मातीच्या मदतीने आग आटोक्यात आणली. यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी रेल्वेचे अधिकारी यांनी पाहणी करून अर्ध्या तासाने ही एक्स्प्रेस कसारा रेल्वे स्थानकावर आणण्यात आली. डब्ब्या खालील आग पूर्ण शांत करीत कॉम्रेसर कामासाठी गाडी सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर ही गाडी इगतपुरीकडे रवाना करण्यात आली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असुन या घटनेमुळे नाशिकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या एका तासाने उशिराने धावत होत्या.