Saturday, July 27, 2024
Homeअग्रलेखउत्सवातील कौतुकास्पद पुढाकार

उत्सवातील कौतुकास्पद पुढाकार

सार्वजनिक गणेशोत्सवाचा आज आठवा दिवस! सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. देखावे पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी उत्सवाचे शेवटचे काही दिवस राखीव ठेवण्याची अघोषित परंपरा समाजात जणू रूढ झाली असावी. यंदाचे वर्षी त्याला अपवाद नाही. शेवटचे ३-४ दिवस लोक गर्दी करतील हे गृहीत धरून पुण्यासारख्या अनेक शहरांत वाहतुकीचे नियोजन जाहीर झाले आहे.

सरकारनेदेखील शेवटचे काही दिवस वेळेची आणि आवाजाच्या मर्यादेची बंधने सैल केली आहेत. त्यामुळे सगळी कामे उरकून लोक निवांतपणे घराबाहेर पडतील, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. अनेक सार्वजनिक गणेश मंडळे त्यांच्याकडून उभारल्या जाणाऱ्या सामाजिक देखाव्यांसाठी ओळखली जातात. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरु केली. त्यामागचा उद्देश स्वातंत्र्य लढ्याबाबत जनजागृती निर्माण करणे हा होता. कालानुरूप उत्सव बदलत गेला, पण जनजागृतीचा उद्देश कायम राहिला. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची नितांत गरज आहे, अशा अनेक समस्या समाजाला वर्तमानात भेडसावतात. मुलांमध्ये मोबाईलचे वाढते व्यसन आणि त्यामुळे वाचनसंस्कृतीचा होणारा ऱ्हास ही अशीच एक गंभीर समस्या! त्यासाठी पुण्यातील विविध गणेश मंडळे एकत्र आली. त्यांनी विंचूरकर वाडा गणेशाच्या चरणी शेकडो पुस्तके अर्पण केली.

- Advertisement -

पुणे शहर, विशेषतः ग्रामीण भागातील मुलांपर्यंत ही पुस्तके पोहोचवली जाणार असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांना सांगितले. अनेक मुलांना पुस्तके विकत घेऊन वाचणे अशक्य असते. अनेक मुलांकडे शालेयोपयोगी साहित्याचा अभाव असतो. गणेशाच्या चरणी पूजा साहित्याऐवजी शालेय साहित्य अर्पण करण्याचे आवाहन मुंबईतील अभ्युदयनगर सार्वजनिक गणेश मंडळाने केले आहे. त्याला भाविकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. जमलेले ते साहित्य गरजू मुलांना वाटले जाईल, असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जागरूकतेसाठी पुणे पिंपरीतील विद्यार्थीही पुढे सरसावले आहेत. जुन्या  सांगवीतील विद्यार्थ्यांनी उत्सवाचे निमित्त साधून थुंकीमुक्त रस्ते अभियान राबवले. हे विद्यार्थी त्यांच्या परिसरात कोणी रस्त्यावर थुंकताना दिसले तर त्याला तसे न करण्याची विनंती करतात. त्या व्यक्तीने ऐकले नाहीच तर रस्त्याने चालणाऱ्या शेजारच्या व्यक्तीचे सहकार्य मागतात. सार्वजनिक उत्सव सुरळीत पार पडावेत, लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी यंत्रणा राबते. स्वच्छता त्यापैकीच एक!

रस्ते आणि परिसर स्वच्छ ठेवणे ही स्वच्छता सेवकांची जबाबदारी! त्यांनाही उत्सवाच्या आनंदात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न पुण्यातील एका मंडळाकडून केला गेला. मंडळाच्या गणपतीची आरती स्वच्छता सेवकांच्या हस्ते करण्यात आली. या उपक्रमांविषयी माध्यमातून बातम्या प्रसिद्ध झाल्या म्हणून लोकांना त्याविषयी माहिती झाली. एकूणच उत्सवांचा मूळ उद्देश हरवू नये आणि त्यांचे स्वरूप पर्यावरण पूरक व्हावे याविषयी जागरूकता वाढत आहे. शाडू मातीच्या उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यातही सर्जनशीलतेचा आविष्कार घडवला जातो.

लाल मातीचे बीजगणेश बनवले जातात. काही जण घरातीलच धातूच्या मूर्तीची पूजा करतात. निर्माल्य कलशातच टाकतात. गणेशमूर्तींना परंपरा पाळून नदीत स्नान घालून त्या मूर्ती दान करतात. स्थानिक प्रशासनदेखील याकामी सज्ज झाले आहे. उत्सवाचे कालानुरूप स्वरूप बदलणे स्वाभाविक! तथापि उत्सवाचा मूळ आत्मा हरवू नये म्हणून वेगवेगळ्या पातळ्यांवर घेतला जाणारा स्वयंस्फूर्त पुढाकार कौतुकास्पद ठरतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या