धुळे (प्रतिनिधी)-
साक्री तालुक्यातील घोडदे गावाजवळ आज सकाळी गँस टँकरने अचानक पेट घेतला. ग्रामस्थांनी वेळीच घटनेची माहिती साक्री पोलिसांना दिली. तर पोलिसांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळी धाव घेत आग विझविली. त्यामुळे मोठी वित्त आणि जीवितहानी टळली.
सुरत येथून जी.जे. 08/एव्ही 1896 क्रमांकाचा टँकर लिक्ीफाईड नॅचरल गॅस घेवून धुळ्याच्या दिशेने निघाला होता. आज दि.3 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास या टँकरच्या कॅबीनच्या भागाने घोडदे गावाजवळ पेट घेतला. हीबाब लक्षात येताच चालकासह सहचालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून खाली उड्या घेतल्या. तर सूज्ञ नागरिकांनी व घोडदे ग्रामस्थांनी डायर 112 वर पोलिसांना माहिती देत महामार्गावरील वाहतूक रोखून धरली.
टँकरमध्ये गॅस भरलेला असल्याने मोठा स्फोट होण्याची भीती होती. साक्री पोलिसांनी देखील तत्काळ अग्निशामक बंबाला माहिती दिली. अग्निशामक बंब व साक्री पोलीस ठाणचे त्यानंतर पोलीस कर्मचारी मंगेश खैरनार, संतोष मोरे, निखिल काकडे, रामलाल अहिरे, दिनेश मालचे, प्रमोद जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. टँकरवर पाणी आणि अग्निरोधीवायूचा मारा करून आग विझविण्यात आली. टँकर तापल्यामुळे आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे