नागपूर | Nagpur
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मदतीसाठी आर्त हाक मारूनही कोणीच मदतीला न आल्याने हतबल पतीने अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. जणू माणुसकी मेली की काय, अशी वेदनादायक घटना नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मोरफाट्यावर रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
संबंधित व्हिडीओत एक व्यक्ती आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधून घेऊन जाताना दिसत आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर कुणीच मदतीला आले नाही. अनेकांना मदत मागूनही कुणी मदत केली नाही. अखेर हतबल झालेल्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवरून घेऊन जाण्याचे ठरवले. तो पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन जात असताना पाठीमागून आलेल्या कारमधील व्यक्तीने हा सगळा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
ही हृदयद्रावक घटना देवलापार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील रहिवासी असलेले अमित भुरा यादव (३५) आणि त्यांची पत्नी ग्यारसी अमित यादव हे मागील दहा वर्षांपासून नागपूर जिल्ह्यातील लोणारा, कोराडी परिसरात राहत होते. रक्षाबंधन असल्याने हे दाम्पत्य मोटारसायकलवरून लोणारा येथून मध्यप्रदेशातील करणपूरला जात होते.
मोरफाटा परिसरात मागून वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे ग्यारसी यादव दुचाकीवरून रस्त्यावर पडल्या आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. पत्नीचा मृत्यू डोळ्यांसमोर झाल्याने अमित यादव हतबल झाले. त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना हात जोडून, डोळ्यांतून अश्रू पुसत मदतीची याचना केली, परंतु थांबले नाही.
पाऊस कोसळत होता, महामार्गावर गाड्या येत जात होत्या. पण मृतदेह उचलायला कोणीही पुढे सरसावले नाही. दरम्यान, अमितने तिचा मृतदेह चक्क मोटारसायकलवर मागे बांधला आणि सुसाट वेगाने निघाला. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि. १०) सायंकाळी घडला. पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला.
दरम्यान, या प्रकाराची माहिती कोराडी पोलिसांना मिळाली. महामार्ग पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो घाबरला असल्याने कुठेही न थांबता सुसाट निघाला. दरम्यान, पोलिसांनी त्याला अडवून ग्यारसीचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठविला. तपास देवलापार पोलिसांकडे वर्ग करणार असल्याची माहिती कोराडीचे पोलिस उपनिरीक्षक नीलेश शेंडकर यांनी दिली.




