Tuesday, November 26, 2024
Homeब्लॉगशिक्षक दिन विशेष : सावित्रीमाईला एका लेकीचं पत्र...!

शिक्षक दिन विशेष : सावित्रीमाईला एका लेकीचं पत्र…!

प्रिय सावित्रीमाई,

माई, कशी आहेस गं? खरं तर असं पत्रबित्र तुला कधी लिहिलं नाही यापूर्वी पण आज वाटलंच लिहून टाकावं सारं खोलवर साठलेलं, मळभ म्हणून मनात दाटलेलं! खरं सांगु माई? माझा एकही दिवस असा सरत नाही ज्यादिवशी तुझी आठवण होत नाही! आईला कुणी विसरतं होय?

- Advertisement -

माई, तू दिलेली पाटी-पेन्सिल इमानेइतबारे सांभाळतेय, लेखणीचा वापर सडेतोड करतेय, शब्दांनाही न्यायासाठी धार लावतेय, पाय घट्ट रोवून उभं राहायला तुझ्याकडूनच शिकलेय. माई, तू आमच्यासाठी झेललेल्या शेणमाती-दगडधोंड्यांचा विसर कधीच पडू देत नाही.

आज जरी तुझ्या लेकींच्या वाटेवर फुलं असली तरी त्यासाठी तुला दगडधोंडे झेलावे लागलेय हे विसरून कसं चालेल? अबलेचा ‘अ’ नसतो तर अपराजितेचा ‘अ’ असतो हे उमजलंय माई मला तुझ्यामुळेच.

माई, तुला तुझे शेठजी अक्षरं गिरवायला शिकवायचे तेव्हा नक्की काय वाटायचं गं तुला? कुठली खूणगाठ बांधत तू एवढं मोठं जीवघेणं अंतर पार केलंस तू माई ? तू शिकलीस आणि काळ्याकुट्ट नकार भरल्या जगात ज्योतिबांच्या साथीने ठामपणे उभी राहिलीस माय. प्रवाहाच्या दिशेने सारेच वाहतात पण तुझ्या धैर्याला, हिमतीला सलाम गं! कारण तू चक्क प्रवाहाविरोधात उभी ठाकलीस!!

व्यवस्थेच्या विरोधात ‘त्या’ प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणं निश्चितच साधी गोष्ट नव्हती, तुझ्यात हे द्रष्टेपण, हा निर्धार, एवढा कणखरपणा, समंजसपणा कुठून आला माई? १८३१ साली जन्मलेली तू १८४८ साली अवघी सतरा वर्षांची तर होतीस, वयाच्या सतराव्या वर्षी इथल्या व्यवस्थेला हादरा दिलास आणि स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलीस.

पण यातना या गोष्टीची आहे की, आज तुझ्या नाती-पणतींना तुझा त्याग आणि तुझ्या दगडधोंड्यांच्या जखमांचा सोयीस्कर विसर पडलाय माई! खरं तर हे लिहिताना, बोलतानादेखील त्रास होतोय गं! पण मी आज वास्तव मांडणारच आहे.

दोन वर्षांपूर्वी माझ्या माहेरच्या शोधात मी निघाले होते. माहेर म्हणजे माझ्या मायेचं आणि मायचं घर शोधत शोधत थेट फुलेवाड्यात पोहचले गं मी. वाड्याच्या कमानीतून आत शिरले आणि अंगी रोमांच उभे राहिले कारण कधीकाळी तू इथे वावरली होतीस, नांदली होतीस. तुझ्या अस्तित्वाच्या, वावरण्याच्या खुणा सैरभैर होऊन शोधू लागले. अंगणात तू तुझ्या हाताने सारवायचीस तो ओटा दिसला, तुळशी वृंदावन आणि ज्योतिबांची समाधी दिसली , मन गहिवरून आलं गं पार आतून! वाड्यातल्या अंगणात हौद दिसला , हा तोच हौद ना गं माई? जो ज्योतिबांनी आपल्या अस्पृश्य बांधवाना खुला करून दिला होता.

माई, तुझी बैठकीची खोली, स्वयंपाकाची खोली बघितली , भिंतीतले खणं, कोनाडे निरखून बघितले, खिडक्यांच्या सागवानी तावदानांवरून कितीतरी वेळ हात फिरवत राहिले, भिंतींना अधाशासारखे स्पर्श करत सुटले…तु कधीकाळी त्या घराला प्रेमाने सारवलं, गोंजारलं असशील ना माई, या भावनेने मीही तुझा स्पर्श शोधत घरभर कितीतरी वेळ फिरत राहिले. तिथून बाहेर पडण्याचे भानच राहिलं नाही बघ.

याच वाड्यात तू नवी नवरी म्हणून आलीस होतीस नं अजाण वयात? याच घरात खंडोजी पाटलांची लेक फुल्यांची साऊ झाली. याच वाड्यातून शिदोरी घेऊन जायचीस नं तू शेतावर पतीसाठी आणि शेतातल्या मातीत अक्षरं गिरवून परतायचीस पुन्हा, पण येताना तुझ्या डोळ्यात लक्षलक्ष स्वप्न असायची, ज्योतिबांनी अक्षरांतून पेरलेली.

ह्याच अक्षरांच्या सोबतीने तू अक्षरक्रांती घडवून गेलीस माई! फुलेवाड्यासमोरील डेरेदार वटवृक्षाच्या सावलीत निवांत बसले माई तेव्हा त्या शीतल छायेत तू जाणवत राहिलीस कितीतरी वेळ …

बाईच्या स्वातंत्र्याचा इतिहास वाचते तेव्हा अज्ञान आणि अन्यायच दिसतो. ‘चूल अन मूल, रांधा वाढा उष्टी काढा, परक्याचं धन, विनाशाचं द्वार असं काहीबाही नकारात्मक कानामनावर आदळत राहातं. या साऱ्या दाट अन्यायाच्या, भेदाच्या काळोखात तू तेजस्वी क्रांतीज्योत बनतेस क्रांतीबा ज्योतिबांच्या सोबतीत. विचार करते की, माई, तू जन्माला आली नसतीस तर मी आज कुठे असते ? डझनभर पोरवाड्यात भाकऱ्या बडवत असते चुलीसमोर वा कुठंतरी ढोरासारखी राबत असते दोन वेळच्या भाकरीसाठी.

नाहीतर घरचं दारिद्र्य वा कित्येक बाळंतपणामुळे खिळखिळे झालेल्या शरीरव्याधींसाठी पोटाला चिमटा काढून एखादी पूजाबीजा घालून घेत असते एखाद्या भोंदूबाबाकडून किंवा ठार निर्जीव दगडधोंडयांना नवस बोलत बसले असते येड्यागत.

तू जन्माला आलीस आणि अवघी स्त्री जात साक्षर झाली, मुलांवर चांगले संस्कार करू लागली, स्वतःला नव्याने निरखू लागली, तिची अस्मिता जागृत झाली, ती नोकरीबिकरी करू लागली, भरगच्च पगार घेऊ लागली, चांगलंचुंगलं खाऊ लागली, नीटनेटकं नेसू लागली, ताठ मानेनं वावरू लागली, गाड्याबिड्या चालवू लागली, घरंजमिनी घेऊ लागली, सर्वपरीने स्वावलंबी झाली, हक्कांसाठी भांडू लागली, कायदेकानून वाचू लागली, अधिकाराच्या गोष्टी करू लागली, थोडक्यात काय तर ‘गुंगी गुडीया फाडफाड बोलू लागली!’ हे सारं कुणामुळे तर फक्त आणि फक्त माई तुझ्या आणि ज्योतिबांच्या अपार त्याग आणि कष्टामुळे बस्स….पण ही जाणीव आज तुझ्या किती लेकींनी ठेवलीय गं…?

कर्मठ स्वार्थी सनातन्यांनी कित्ती त्रास दिला, वर्णवर्चस्ववाद्यांचे पोतसूळ उठले आणि स्त्रीशिक्षणाच्या, सक्षमतेच्या विरोधात हे खुजे उभे ठाकले. तुला वाटेने चालणं कठीण केलं ह्या धर्माच्या दांभिक ठेकेदारांनी! तू त्यांच्या कुठल्याच जाचाला-त्रासाला भीक घालेना, शाळा नि शिकवणं बंद करेना म्हणून पिसाळलेल्या या खुज्यांनी ‘भर रस्त्यात बेअब्रू करण्याची’ धमकीही तुला दिली पण माई तू वाघीण होतीस वाघीण!

पुरून उरलीस ह्या नासक्याकुजक्या डोक्यांना आणि लगावलीस थोबाडीत भरचौकात त्या भटाच्या तशीच ताठ मानेनं गेलीस ताडताड चालत भिडेवाड्यातल्या शाळेत. जिथं इवले इवले निरागस चेहरे तुझी वाट बघत होते आतुरतेने!

सायंकाळी क्रांतीबा आणि तू घरी परतलीस तेव्हा सनातन भटांनी केलेल्या कागाळ्यांनी तुझं घर धुमसत होतं. घर की समाजकार्य? ह्या दोन पर्यायांपैकी तुम्ही दोघांनी समाजकार्य निवडलं आणि आल्या पावली मागे फिरलात अगदी नेसत्या वस्त्रानिशी! बापरे, केवढा मोठा त्याग!समाजाच्या संसारासाठी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवणारे तुम्ही दोघे. तुमची उंची आज कळतेय माई आणि क्रांतीबा. कित्ती संकटं पेललीत आणि किती वादळं झेललीत तरी निर्धार ढळला नाही.

कितीतरी अडल्यानडल्या विधवांची तू प्रेमाने बाळंतपणं केलीत, त्यांच्या मुलांना अंगाखांद्यावर वाढवलं, ज्या ब्राम्हणांनी तुझ्या स्त्रीशिक्षणाच्या कार्यात अडसर निर्माण केले, त्यांच्याच काशीबाई या तरुण गर्भार स्त्रीचे तू प्राण वाचवलेस, तिच्या यशवंतांस तर तू दत्तक घेतलंस माई आणि डॉकटरही केलेस यावरून तू किती प्रेमळ आणि ममता असणारी माऊली होतीस हे सिद्ध तर होतंच त्याहून अधिक तुझ्याठायी असणारं ‘माणूसपण’ अधिक अधोरेखित होतं.

माई, जोडीदाराच्या भक्कम साथीने तू लढत राहिलीस ,जीर्ण रूढी प्रथांना विवेकाने खोल गाडत राहिलीस. किंचितही विचलित झाली नाहीस कधी ध्येयापासून, वा ढळली नाहीस निश्चयापासून जराही. खरंच निर्धार असावा तर असा, समर्पण असावं तर असं…फक्त प्रत्येकीच्या सोबत तिचा ज्योतिबा असला पाहिजे बस्स.

माई, फुलेवाड्यातून मी निघाले आणि भिडेवाडा शोधू लागले पण कुणालाच भिडेवाड्याचा पत्ता सांगता येईना गं! कैक जणांकडे चौकशी केली, विचारून थकलो. पुर्वीचं पुणं बदललंय खूप, मान्य पण भारतातली पहिली मुलींची शाळा असलेला भिडेवाडा विसरण्याइतपत पुण्याचं बदलणं काळजात चर्रर्र करणारं होतं गं माई….

मग बरीच चौकशी केल्यानंतर एका भल्या माणसानं भिडेवाड्याचा पत्ता सांगितला. तो भला माणूस म्हणाला, ”दगडूशेठ गणपतीच्या समोर जो पडका वाडा आहे नं तोच भिडेवाडा!” ते ऐकताच डोळे टचकन भरले ते नेमके कशामुळे काही कळेना. पुण्याच्या रहदारीशी लढत एकदाचे भिडेवाड्याजवळ पोहचलो.

भिडेवाड्याची जी ‘वाडा’ म्हणून माझ्या मनात प्रतिमा होती नं अगदी त्याच्या विपरीत वास्तव मी बघत होते आणि खरं सांगते माई, पडका , कोसळू पाहणारा भिडेवाडा बघून मोठ्याने भोकाड पसरून रडावं वाटलं जोरजोरात. कसेबसे कढ आतल्या आत गिळले आणि भिडेवाड्याचा सागाच्या लाकडी पायऱ्यांना स्पर्श केला , माथा टेकवला आणि डोळ्यातल्या आसवांना रोखण्याच्या भानगडीत पडलेच नाही .

त्या पायऱ्यांवर पाय ठेवून तू कितीतरी वेळा गेली असशील नाही माई? ज्योतिबा, फातिमाबी, लहुजी साऱ्यांचा पदस्पर्श तिथे झाला असणार म्हणून ललाटावर तिथली धूळ माखून घेतली माई त्या दिवशी. तुझ्या चरित्रात वाचलेले एकेक घटना प्रसंग तरळत गेले डोळ्यातल्या पाण्यात …प्लेगबाधित पांडुरंगला पाठीवर घेऊन दवाखान्यात धाव घेणारी तू त्याला जीवदान देऊन स्वतः मृत्यूच्या कुशीत विसवणारी तू.

कितीतरी वेळ भिडेवाड्यासमोर रस्त्याच्या कडेला स्तब्ध, सुन्न होऊन उभी होते समोरचे दृश्य बघून तर सुन्नच झाले माई, अगं तू ज्यांना युगायुगांच्या अज्ञान आणि अंधकाराच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी उभी हयात घालवली नं त्याच तुझ्या लेकी, नाती कृतघ्न निघाल्या गं माई, कृतघ्न निघाल्या! ज्या वास्तुतून यांच्या उद्धाराची, स्वातंत्र्याची सुरुवात झाली त्याच खऱ्या तिर्थक्षेत्राकडे पाठ फिरवून ह्या काल्पनिकतेला पूजताय.

भल्या पहाटे दर्शनाला रांगेत उभ्या राहताय, त्यात उच्चशिक्षित वकील असतात, डॉकटर्स असतात, शास्त्रज्ञ, अभियंता असतात, शिक्षिका-प्राध्यापिका असतात, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनी असतात, मंत्रीण बाई असतात तशा आमदार खासदारही असतात. ज्या दांभिक, ढोंगीपणाविरोधात तू एल्गार दिलास त्याच दांभिकतेला आणि पोटभरू दुकानांना तुझ्या ह्या शिकून हुकलेल्या कृतघ्न लेकी माथा टेकवतात पण भिडेवाडा काय आहे? कुठे आहे? कसा आहे? याबद्दल त्यांना काहीही माहीत नसते.

तुझ्या लेकींसाठी तू जे धोंडे झेललेस प्रसंगी रक्तबंबाळ झालीस त्याच धोंडयांना तुझ्या लेकी मनोभावे पूजताय माई, हे केवढे दुर्दैव! बरं, पशुहून हीन जिणं जेव्हा यांच्या वाट्याला आलं तेव्हा यातले कुठलेच धोंडे यांच्या उद्धारासाठी आले नाहीत हे सोईने कशा बरं विसरल्या ‘ह्या’ लेकी?

तुझ्या आणि ज्योतिबांच्या क्रांतीमुळे, त्यागामुळे, कष्टामुळे समग्र महिलावर्गास-बहुजनवर्गास मानसन्मानाचे जगणे दिलेस पण त्यांना तुझे नाव घ्यायलाही कमीपणा वाटतोय माई! त्यांना तुझ्या जन्मदिवसाशी देणेघेणे नसते किंवा स्मृतिदिनाशीही नाही त्या तर मश्गुल असतात नऊ रंगाच्या साड्या नेसण्याच्या स्पर्धेत वा अनवाणी चालत जातात दर्शनाला कुठं दूर डोंगरात नाहीतर उपासतापास ,नवस करण्यात व्यस्त असतात त्या. तुझे, ज्योतिबांचे कर्तृत्व त्यांना मान्यच करायचे नसते कारण त्यांच्या डोक्यात जातीधर्माचे विष पद्धतशीरपणे पेरले गेलेय त्यामुळे महापुरुषांना प्रणाम करतानाही त्या ‘जात’ वगैरे बघू लागल्या आहेत.

कोण कुठे जन्मला ? यावरून श्रेष्ठत्व ठरवणारी ही ‘येडी प्रजा’ शहाणी करण्याच्या पात्रतेचीही नाही खरं तर. पण तरीही तुम्ही खस्ता खात , रस्ता तयार केलात यांच्या कल्याणाचा. त्याची अजिबात जाणीव न ठेवणारी ही जमात खरे तर, यांच्या शिक्षणाचा आणि वर्तनाचा काडीमात्र संबंध नाही. माई, तुझ्या शिकल्यासवरल्या लेकी स्वतःहून अंधश्रद्धांच्या जाळ्यात अडकल्या आहेत, वर्णवर्चस्ववाद्यांशी बरोबरी करण्याच्या नादात ह्याच अधिक कट्टर होऊ लागल्या आहेत,पोथ्यापुराणात पुन्हा एकदा फसताहेत. आता मात्र तुम्ही पुन्हा यांना ह्या दलदलीतून काढायला येणार नाही हे माहिती आहेच….

पण आणखी एक महत्वाची गोष्ट सांगते माई! तुझा विचार पुढे नेणाऱ्या, प्राणपणाने निर्भीडपणे वास्तव मांडणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने ‘सावित्रीच्या लेकी’ म्हणून विवेकाचा जागर करणाऱ्या स्त्रियाही आहेत हे चित्र फार आशावादी आहे. नवीन पिढीला आता ह्या तुझ्या लेकी ‘सत्यवानाची सावित्री’ न सांगता ‘फुल्यांची सावित्री’ सांगताय हे फार दिलासादायक आहे कारण सत्याला मरण नसतंच, असतं ते चिरंतन आयुष्य आणि तेजस्वी भविष्य.

ह्या मनुवादी व्यवस्थेने तुला वा क्रांतीबांना जितेपणी छळलंच, नंतरही इतिहास खोटे लिहिले. नंतर आलेले कुणीतरी ‘भारतरत्न’ होतात…. ‘शिक्षक दिन’ ही दिनवाणे साजरे होतात….माई, खरं सांगू ? आमचे ‘भारतरत्न’ तुम्हीच आहात आणि शिक्षक दिनाचे मानकरीदेखील! आयुष्यभर विनावेतन राबणारे आणि आयुष्यभराची सारी कमाई शाळांसाठी खर्च करणारे तुम्ही भारतातीलच नव्हे तर जगातील महान शिक्षक आहात.

आज खरंच मनमोकळं केलं माई मी तुझ्याकडे, काळजाच्या तळघरात कितीतरी दिवस कोंडून ठेवलेलं आज सारं रितं केलं बघ, आता बरं वाटतंय. तुझं आणि ज्योतिबांचं कर्तृत्व आभाळाएवढं आहे माई, ह्या विवेकाच्या आभाळाची छाया आणि माया आम्हा धडपडणाऱ्या तुझ्या लेकींना सतत लाभो , तुम्ही खरे समाजशिक्षक आहात तुम्ही दाखवलेल्या नैतिकतेच्या व्यापक वाटेवर आम्ही चालत राहू हे वचन देते आणि थांबते माई!

– तुझी एक धडपडणारी लेक

प्रतिभा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या