प्रेमेंद्र पाटील
नवापूर, दि.२ | NAVAPUR
तालुक्यातील धनराट भागातील कोतवाल फळी येथील नागरिकांना स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात टाकून नदीच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.
तालुक्यातील धनराट जवळील कोतवालफळी या गावातील नागरिकांसाठी नदीच्या पलिकडे स्मशानभुमी बांधण्यात आली आहे. मात्र, स्मशानभुमीपर्यंत जाण्यासाठी कुठलाही कच्चदा किंवा पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने नदीतूनच अंत्यसंस्कारासाठी जावे लागत आहे.
नदीच्या पात्रात सध्या कमरेपेक्षा जास्त पाणी आहे. तरीही त्यातून मृतदेह घेवून मयताचे नातलग अंतिम संस्कारासाठी स्वतःचा जीव मुठीत घेवून स्मशानभूमीकडे जातांना दिसतात.
अशी गंभीर परिस्थिती असतानाही आजपर्यंत या गावात नदी पार करत स्मशानभूमी पर्यंत जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मार्ग उपलब्ध नाही. धनराट कोतवाल फळी गावातील ग्रामस्थ आपला जीव मुठीत घेऊन मृतदेह एका चार पाईच्या साह्याने नदीत उतरतात.
काही अघटीत घडल्यास इतर ग्रामस्थ नदीच्या एका पात्रापासून दुसर्या पात्रापर्यंत मोठा दोर घेवून उभे असतात. एवढा त्रास सहन करुनही तेथील ग्रामस्थांनी अद्याप शासन किंवा प्रशासनाकडे रस्त्याची मागणी केलेली नाही.
उन्हाळयात नदीला पाणी कमी असते तेव्हा अंत्यसंस्काराला अडचण येत नाही. परंतू पावसाळयात नदीला मोठया प्रमाणावर पाणी असल्याने ग्रामस्थांना त्यातूनच मार्गस्थ होवून अंत्यसंस्कार करावा लागतो. त्यामुळे अंत्यसंस्काराला जाणार्या ग्रामस्थांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे या ठिकाणी रस्ता किंवा पूल बनविण्याची गरज आहे.