धुळे । प्रतिनिधी dhule
शहरातील पारोळारोड चौफुलीजवळील हॉटेल पंकजच्या शेजारी आज सकाळी 15 दिवसांचे स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली. येथे कोणीतरी नायलॉन पिशवीत या अर्भकाला टाकून पलायन केले. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनीही तत्काळ अर्भकास उपचारासाठी रूग्णालयात पाठविले. दरम्यान, हे अर्भक कोणी व का टाकले, याचा पोलिसांनी शोध सुरु केला असून परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी केल जात आहे.
नागपूर-सुरत या राष्ट्रीय महामार्गावरील शहरानजीक असलेल्या हॉटेल पंकजच्या शेजारी एका पिशवीत कोणीतरी नवजात अर्भकाला टाकून दिले. महामार्गावरुन जाणार्या लोकांना बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. पिशवीत स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळून आल्याने नागरिकांनी पोलीस मदत केंद्राच्या डायल 112 या क्रमांकावर माहिती कळवली. त्यानंतर आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोकॉ संतोष घुगे, पोकॉ हरीश गोरे, पोकॉ रमेश माळी, चंद्रकांत पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी स्त्री जातीचे जिवंत अर्भक दिसून आले. अर्भकास उपचाराची आवश्यकता असल्याचे लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ गर्दीतील महिलेच्या मदतीने अर्भकास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. याप्रकरणी तालुका पोलिसात अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.