येवला ।प्रतिनिधी Yeola
तालुक्यातील लौकी येथे शेतात स्री जातीचे जिवंतअर्भक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
शेतकरी हरिभाऊ कुंदे यांच्या शेतामध्ये काम करणार्या मजुरांना शुक्रवारी (दि. 6) दुपारी 4 वाजेच्या सुमारास मक्याच्या शेतातून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मजुरांनी आवाजाच्या दिशेने धाव घेऊन पाहिले असता एका पोत्याखाली झाकलेल्या अवस्थेत बाळ आढळून आले. शेतात बाळ सापडल्याची बातमी गावात वार्यासारखी पसरली अन् बघ्यांची गर्दी झाली.
याबाबत पोलीसपाटील यांनी तालुका पोलिसांना खबर दिली. शेतमजूर जोडपे तापी माळी, गगन मोरे यांनी तातडीने बाळाला येवला उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. बाळावर तत्काळ प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अर्भक किमान तीन दिवसांचे असावे, असा प्राथमिक अंदाज येथील वैद्यकीय अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत. तर सदर बाळाबाबत कुणास काही माहिती असल्यास तालुका पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी केले आहे.