मुलीचे एकदा लग्न करून दिले म्हणजे जबाबदारी संपली, अशीच बहुसंख्य पालकांची भूमिका असते. लग्न झालेल्या मुलीचा माहेरचा हक्क संपतो, तिने चार दिवस माहेरी यावे, पाहुण्यासारखे राहावे आणि तिच्या सासरघरी परत जावे, कोणत्याही परिस्थितीत तिने सासरघरीच आयुष्यभर राहावे, हीच अपेक्षा बाळगली जाते.
सामान्य परिस्थितीत तशा अपेक्षेचे कदाचित समर्थन केलेही जाऊ शकेल. तथापि त्रास असला तरी मुलींनी तो सहन करावा, असेच संस्कार मुलींवर त्यांच्या अजाणत्या वयापासून केले जातात. झारखंडमधील एका घटनेने या पारंपरिक धारणेला काहीसा छेद द्यायचा प्रयत्न केला गेला. रांचीत ही घटना घडली. कैलाशनगर भागातील एका मुलीचा विवाह झाला होता. तिच्या पतीचा आधीच एक विवाह झाल्याचे त्यानंतर उघडकीस आले. शिवाय पतीचे कुटुंबीय तिला त्रास देत होते. परिस्थिती असह्य झाल्यावर मुलीने तिच्या आई-वडिलांना त्याची कल्पना दिली आणि घटस्फोट घेणार असल्याचा निर्णय सांगितला. तिच्या पालकांनी तिला पाठिंबा तर दिलाच, पण तिचे माहेरी वाजत-गाजत स्वागत केले. पतीच्या छळातून तिची मुक्तता करून तिला सन्मानाने माहेरी आणले. समाज माध्यमांवर ही घटना आणि स्वागताचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. अशी घटना अपवाद ठरू शकते. अनेकांना त्यात अतिशयोक्ती वाटू शकेल. तथापि समाजाला संदेश देण्याचा तिच्या पालकांचा हा प्रयत्न म्हणता येईल का? अत्याधुनिक काळ मानला जात असला तरी मुलींना मात्र साचेबद्ध पद्धतीनेच वाढवण्याकडे पालकांचा कल आढळतो.
मुलींवर कळत-नकळत अनेक प्रकारची बंधने लादण्यात काही गैर मानले जात नाही. मुलींचे वाढवणे त्यांच्या भविष्यातील सासरी जाण्याशी जोडले जाते. मुली शिकतात. कर्तृत्व गाजवतात. पुरुषप्रधान क्षेत्रात त्या पाय रोवून उभ्या राहतात. अनेकींना पुरस्काराने गौरवले जाते. तथापि मुलीने तिच्या सासरी नांदणे, यालाच आजही त्यांचे खरे कर्तृत्व मानले जाते. आई-वडिलांचे ‘नाव काढणे’ मानले जाते. मुलींना त्या पद्धतीनेच वाढवले जाते. त्यांनी लवकर घरी यावे, मोठे झाल्यावर मोठ्याने हसू नये, जोरजोरात बोलू नये, कोणतेही निर्णय तिच्या बळावर घेऊ नयेत, हीच अनेक पालकांची अपेक्षा असते. सासरी छळ होत असेल तर तो सहन करावा, असेच मुलींच्या मनावर बिंबवले जाते. एखाद्या मुलीने तशी कल्पना पालकांना दिली तरी ‘हेही दिवस जातील’ अशीच समजूत काढली जाते. मुलगी माहेरी आली तरी तिला समजावून सांगून पुन्हा सासरी नेऊन सोडण्याकडेच पालकांचा कल आढळतो. सासर सोडून मुलगी कायमची माहेरी आली तर तिने तिच्या पालकांचे नाक कापले, अशीच तिची हेटाळणी केली जाण्याची शक्यता जास्त असते.
या सगळ्या विचारांना आणि धारणांना रांचीतील मुलीच्या पालकांनी त्यांच्यापुरते तरी नाकारले आहे. मुलीचे लग्न करून दिले तरी आई-वडिलांच्या घरावरचा तिचा हक्क संपत नाही हे कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मुलीने छळ सहन करण्यातच पालकांची प्रतिष्ठा दडलेली असते, हे गृहीतक खोटे ठरवले आहे. त्यातून एका मुलीच्या पालकांनी प्रेरणा घेतली आणि त्यांच्या मुलीला अशा प्रसंगात पाठबळ देण्याचे धाडस दाखवले तरी ती या घटनेची मोठीच उपलब्धी मानली जाऊ शकेल.