पुणे | Pune
अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यानंतर मांजरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर-पुणे महामार्गावर एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे. मांजरेकरांनी मारहाण केल्यानंतर संबंधित व्यक्तीने यवत पोलीस ठाण्यात मांजरेकरांविरोधात तक्रार दिली आहे.
शुक्रवारी रात्री (१५ जानेवारी) साडे दहा वाजता हा प्रकार घडला. महेश मंजरेकर हे सोलापूरच्या दिशेनं चालले होते. मध्येच त्यांनी कारला अचानक ब्रेक लावला. त्यावेळी मागून येणाऱ्या कैलास सातपुते यांची ब्रिझ्झा कार मांजरेकरांच्या कारला धडकली. त्यात त्यांच्या कारचे किरकोळ नुकसान झाले. हे लक्षात येताच मांजेरकर गाडीतून उतरले आणि सातपुते यांना शिवीगाळ केली. दारू पिऊन गाडी चालवतोस का, असं म्हणत त्यांनी सातपुते यांना चापट मारली, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. अपघातानंतर तक्रारदार व मांजरेकर यांच्यात झालेल्या वादावादीचा व्हिडिओ देखील तक्रादार व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी आहेत.