संवादाची आधुनिक साधने नित्य नवे रुप धारण करतात. तंत्रज्ञानात रोज नवनवे शोध लागतात. आधुनिक संवाद साधनांमुळे जग जवळ आले. दळणवळण वाढले. त्यामुळे विकासाचे राजमार्ग खुले झाले. या साधनांनी लोकांचे जीवन बदलून टाकले. आधुनिक संवाद साधनांचे आणि त्यावरील समाजमाध्यमांचे वर्णन माध्यमतज्ञ सामाजिक बदलाची साधने असा करतात.
देशातील मोबाईलधारकांमध्ये दरवर्षी लाखोंनी भर पडत आहे. आधुनिक संवाद साधनांचे फायदे कोणीच नाकारु शकणार नाही. तथापि त्यांच्या अतिरेकी वापरामुळे देखील नवनवे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे ती बदलांची साधने न राहाता ताणतणावाची देखील साधने बनत आहेत. युवापिढीला त्यांचे व्यसन लागले आहे. चलबोलावरील (मोबाईल) खेळांमुळे मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढत आहे. मुले अभ्यास करणे विसरत आहेत. चलबोलाशी संबंधित किरकोळ कारणांमुळे मुले आत्महत्या करत आहेत.
इतके आधुनिक संवाद साधनांचे भूत मुलांच्या मानगुटीवर बसले आहे. तो समाजस्वास्थ्याचा विषय झाला आहे. साधनांच्या दुष्परिणामांवर जगभरात तर चर्चा सुरु आहेच पण सांगली जिल्ह्यातील एका खेडेगावातील महिलांना देखील त्याची चिंता वाटत आहे. त्यावर उपाय योजले नाहीत तर आधुनिक संवाद साधनांच्या अतिरेकी वापरामुळे युवा पिढी उद्वस्त होण्याचा धोका त्यांना जाणवला असावा. म्हणुनच या साधनांचा विवेकी वापर वाढावा असे सामुहिक प्रयत्न त्यांनी सुरु केले आहेत.
यासंबंधीचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात ‘मोहित्यांचे वडगाव’ नावाचे गाव आहे. वरील मुद्यांवर विचार करण्यासाठी गावात नुकतीच महिलांची आमसभा पार पडली. या सभेत महिलांनी संवाद साधनांच्या अतिरेकी वापराकडे गावकर्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अनेकींनी हिरीरीने वेगवेगळी मुद्दे मांडले. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांच्या परिणामांकडेही काही जणींनी लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन आमसभेने एक अभिनव निर्णय संमत केला आहे. सायंकाळी सात ते साडेआठ या वेळेत घराघरातील दूरचित्रवाणी संच आणि चलबोल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी गावकर्यांसह पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य यांनाही सहभागी करुन घेतले आहे.
निर्णयाच्या अंमलबजावणीच्या वेळेची आठवण सर्वांना करुन देण्यासाठी भोंगा वाजवला जाणार आहे. ही कल्पना चांगली आणि अभिनंदनीय आहे. ‘गाव करील ते राव काय करील?’ अशी मराठी म्हण आहे. गावाने ठरवले तर ती कल्पना अंमलात येईल. गावानेच तसा ठराव केल्याने ती कल्पना अंमलात येण्यात अडचण येणार नाही अशी आशा वाटते. गावातील सर्वांची लक्ष या कल्पनेच्या अंमलबजावणीकडे एकवटले तर आमसभेचा निर्णय नक्कीच यशस्वी ठरु शकेल. दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवरील मालिकांचे विषय आणि त्यांचा दर्जा हे नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे.
चलबोलाच्या वाढत्या व्यसनांविषयी समाजतज्ञ वारंवार इशारे देतात. पण त्या दुष्परिणामांची तीव्रता एका खेडेगावातील महिलांना देखील जाणवली. नव्या जगात आधुनिक साधनांचा वापर अपरिहार्य आहे. मुुलांनाही त्यापासून दूर ठेवणे व्यवहार्य नाही. हे लक्षात घेऊन त्या साधनांचा वापर आपापल्या परीने काहीसा मर्यादित करण्याचा प्रयत्न महिलांनी केला हे विशेष कौतुकास्पद आहे. हा प्रयोग मोहित्यांच्या वडगावात यशस्वी झाला तर तो इतर गावांना सुद्धा मार्गदर्शक ठरु शकेल.