Friday, June 21, 2024
Homeअग्रलेखखरी गरज इंटरनेट साक्षरतेची

खरी गरज इंटरनेट साक्षरतेची

मोबाईलचा शोध लागला तेव्हा संवाद क्षेत्रात क्रांती होईल अशी जगाची अपेक्षा होती. तशी ती झालीही पण मोबाईलचे व्यसनात रुपांतर होईल असे मोबाईलच्या शोधकर्त्यालाही कदाचित वाटले नसेल. मार्टिन कुपर यांनी मोबाईलचा शोध लावला. तथापि मोबाईलमुळे लोकांच्या जगण्यातील आनंद हरवला आहे अशी भावना ते व्यक्त करतात. आपण मोबाईल वापरत नाही अशी मनमोकळी कबुली त्यांनी एका मुलाखतीत दिली होती. पण मोबाईलचे आकर्षण इतक्या टोकाला गेले आहे की, युवा पिढीतील अनेक जणांची पावले गुन्हेगारीकडे वळत आहेत. नुकत्याच अशा दोन घटना उघडकीस आल्या. बंगळुरुमधील एका तरुणाला आयफोन घ्यायचा होता पण त्यासाठी पैसे नव्हते. त्याने ऑनलाईन फोन मागवला. फोन द्यायला आलेल्या युवकाची हत्या केली. त्याचा मृतदेह घरातच लपवला आणि फोन वापरायला काढला. दुसरी घटना नाशिकमध्ये घडली. मौजमजा आणि महागडे फोन वापरायचे आकर्षण या दोन कारणांसाठी तीन मुले सराईत मोबाईल चोर बनले. हे चिंताजनक आहे. मोबाईल वापराची व्यक्तीगणिक कारणे वेगवेगळी असु शकतात. तथापि समाजमाध्यमांचे वाढते आकर्षण हे युवा पिढीतील मोबाईल व्यसनाचे प्रमुख कारण आहे. समाजमाध्यमांवरील आभासी जग, ‘स्व’ची आभासी प्रतिमा, गेमिंग, चॅटिंग, रिल्स, व्हिडियो यांची भुरळ त्यांना पडली आहे. त्यासाठी मोबाईल हवाच याच अट्टाहासाने युुवा पिढीला पछाडले आहे. मोबाईलशिवाय राहाण्याची कल्पना सुद्धा अनेकांना अस्वस्थ करणारी असेल. त्यामुळेच खुन आणि चोर्‍या करण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. युवापिढी समाजमाध्यमांवरच्या आभासी जगात रमते. त्या जगात सारेच आभासी आढळते. ती प्रतिमा निर्माण करण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. खोट्या नावाने, खोट्या चेहर्‍याने आणि उसन्या श्रीमंतीने वावरणे सहज शक्य झाले आहे. तुम्ही प्रत्यक्षात कसे आहात हे कधीच कोणाच्या लक्षात येत नाही. समाजमाध्यमांवर बोलण्याचा, वावरण्याचा आणि प्रतिक्रियांचा समोरच्या व्यक्तींवर काय परिणाम होतो याचा अंदाजही येत नाही. युवापिढीला हीच त्यांची सोय वाटते. समाजमाध्यमांवर भाईगिरीचे आकर्षण वाढते आहे. अनेक व्हिडियोजमध्ये शब्दागणिक शिव्यांचा वापर वाढत आहे. आभासी आणि वास्तवात फरक असतो याची जाणीवच हरवत चालली आहे. मोबाईलचे चांगले फायदे देखील आहेत. पण त्याच्या अतीवापराने नकारात्मकच परिणाम जास्त होत असावेत. मुलांना मोबाईल वापराला बंदी हा त्यावरचा उपाय खचितच नाही. मोबाईलचा विवेकपूर्ण वापर मुलांना शिकवायला हवा. यात पालकांची भुमिका महत्वाची आहे आणि हाच कळीचा मुद्दा देखील. मुले पालकांकडे बघुन शिकतात असे मानले जाते. पालकच तासन्तास मोबाईल वापरत असतील,  त्यामध्ये रमत असतील आणि लहान मुलांची कटकट नको म्हणून त्यांच्या हातात सहज मोबाईल सोपवत असतील तर मुलांना मोबाईलच व्यसन लागणे स्वाभाविक आहे. किती पालक मुलांना जाणीवपूर्वक मोबाईलचा चांगला वापर शिकवतात? ज्ञान मिळवण्यासाठीचे मार्ग सुचवतात? मुलांनी आभासी जगात रमू नये म्हणून त्यांना खर्या जगाचे दर्शन घडवतात? छंद जोपासण्यासाठी प्रवृत्त करतात? गरज आहे ती पालक आणि मुलांमध्ये इंटरनेट साक्षरता निर्माण करण्याची. वाचन, अभ्यास, नैतिकता, मुल्यांची जपणूक, छंदांची जोपासना, संस्कार यामुळे व्यक्तिमत्वाचा खरा विकास होतो आणि आत्मविश्वासही बळावतो हे मुलांच्या मनात पालकांनाच रुजवावे लागेल आणि त्यासाठी त्यांनाही थोडेसे बदलावे लागेल. 

- Advertisment -

ताज्या बातम्या