राज्यात अजूनही अवकाळी पावसाचे सावट आहे. या पावसाच्या तडाख्याने राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पीक हातातून गेले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या प्राथमिक अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत जाण्याची शक्यता आहे, कारण हवामान खाते वेगवेगळ्या प्रकारचे इशारे देत आहे. शेतकऱ्यांना कधी पावसाचा आणि गारपिटीचा सामना करावा लागेल हेच कळेनासे झाले आहे. पावसाच्या तडाख्याने पाण्यात बुडालेले कांदे आणि हातातोंडाशी आलेली पण मातीत गेलेली अन्य पीके यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. हवामान बदलाचा तीव्र फटका शेतीला पर्यायाने शेतकऱ्यांना बसतो. तसे अंदाज अनेक जागतिक अहवाल व्यक्त करतात. शेतकऱ्याने जगावे की मरावे असा प्रश्न अनेक शेतकरी विचारतात. आपत्तीच तशी आहे. तथापि वर्षानुवर्षांचा शेती करण्याचा अनुभव आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने संकटांचा सामना करण्याचा आणि शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न अनेक शेतकरी आणि त्यांची पुढची पिढी करत आहे. ‘देशदूत’ नेहमीच अशा शेतकऱ्यांची दखल घेतो. त्यांचे प्रयत्न शेतकरी बांधवांसमोर आणतो. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात खडकओझरखेड गावात एका शेतकऱ्याने माळरानावर थायलंड संशोधीत पेरूची बाग फुलवली आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात खोडद गावात मायलेकींनी जिरायती शेती बागायती करण्याचा पराक्रम केला आहे. भोर तालुक्यात वेळू गावातील शेतकरी सेंद्रिय पद्धतीने फळांचे उत्पादन घेतात. पिंपळगाव बसवंत परिसरातील अनेक तरुण शेतकरी बेदाणा व्यवसायात उतरले आहेत. काहींनी स्वतःचा ब्रँड विकसित केला आहे. राज्यासह नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचा अवलंब केला आहे. नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यापुढचे पाऊल उचलले आहे. त्यांच्या उप्त्पादनाला शाश्वत बाजार शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्या प्रयत्नातूनच नाशिक शहरात असे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी मॉल उभा राहिला आहे. जो शेतकऱ्यांनीच उभा केला असून तेच त्याचे व्यवस्थापन बघतात. अनुभवाला बाजाराच्या अभ्यासाची जोड त्यांनी दिली. आरोग्याबाबत समाजात जागरूकता वाढत आहे. विशेषतः करोना काळानंतर लोक आहार आणि विहार याबाबत सजग झाले आहेत. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले धान्य, फळे आणि भाजीपाला घेण्याकडे कल वाढत आहे. याचे भान अनेक तरुण शेतकऱ्यांना आले. असे उत्पादन लोकांपर्यंत नेण्यासाठी ते त्यांच्या परीने वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. अनेक शेतकरी सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीशी जोडले जावेत असाही त्यांचा प्रयत्न आहे. पेठ तालुक्यात एक शेतकरी जोडपे मोगऱ्याची शेती करते. मोगरा शहरात आणून विकते. काही खरेदीदार यांनी कायमचे जोडले आहेत. तोच अनुभ सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या गव्हाच्या उत्पादकांचा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांच्यामागे उभे राहाणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकरने ते बजवावे ही अपेक्षाही रास्तच. तथापि हातावर हात धरून बसून नशिबाला दोष देणे तरुण शेतकऱ्यांना मान्य नसावे. ही त्याचीच काही चपखल उदाहरणे. ती ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता..’याच जातकुळीतली आहेत. हे बदलत्या शेतीचे आणि मानसिकतेचे आश्वासक चित्र म्हणावे का?