नाशिक | Nashik
निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) चांदोरी (Chandori) नजीक असणाऱ्या शिंपी टाकळी फाटा येथे नाशिक ते छत्रपती संभाजीनगर (Nashik to Chhatrapati Sambhajinagar) राज्य मार्गावर आज (दि.१०) रोजी दुपारच्या सुमारास धावत्या शिवशाही बसला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे…
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवशाही बस क्रमांक (एम.एच ०९, एफ एल ०४७७) ही बस नाशिकहून छत्रपती संभाजी नगरकडे जात होती. यावेळी बसमध्ये इंजिनच्या बाजूने दूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यावेळी चालकाने (Driver) तात्काळ बस थांबून सतर्कतेने बसमधील २० हून अधिक प्रवाशांना (Passengers) सुखरूप खाली उतरवले. त्यानंतर काही क्षणातच बसने मोठ्या स्वरूपात पेट घेतला.
दरम्यान, या घटनेमुळे नाशिक ते छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. तसेच सदर आगीत संपूर्ण बस भक्षस्थानी पडली होती. यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तर चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) पथकातील आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर गडाख, सोमनाथ कोटमे,भाऊ कर्डिले किरण वाघ, सुरज पगारे,सचिन कांबळे, निलेश नाठे, गोकुळ टर्ले यांच्यासह आदी घटनास्थळी उपस्थित होते.