अकोले । प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Election) डोळ्यासमोर ठेऊन आदिवासी समाजातील नेते आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी आदिवासी दिनानिमित अकोले शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
तर माजी आमदार वैभव पिचड यांनी सवता सुभा दाखवत आदिवासी भागाचे मुख्य केंद्र असणाऱ्या राजूरमध्ये जोरदार आदिवासी दिन साजरा केला. याचबरोबर शिवसेना नेते मधुकर तळपाडे यांनी आदिवासी दिनानिमित्त देवगाव येथे जाऊन आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. तसेच गावोगावच्या कार्यक्रमांना हजेरी लावली.
हे ही वाचा : जिल्ह्यात ‘लाडकी बहीण योजने’साठी तब्बल 7 लाख 8 हजार महिलांचा अर्ज; किती अर्ज ठरले पात्र? आकडेवारी समोर
तर काँग्रेसचे युवा नेते सतीश भांगरे व माकपचे कॉ. तुळशीराम कातोरे यांनीही शक्तीप्रदर्शन करीत आपले वेगळे अस्तित्व दाखवून दिले. हजारो आदिवासी बांधवांनी डीजेच्या तालावर बेधुंद होत नृत्य केले. तर आदिवासी मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले.
या सर्वच मिरवणुकांचा फटका शहरातील वाहतूक व्यवस्थेस काही प्रमाणात बसला असला तरी मागील वर्षीप्रमाणे विशेष काही त्रास झाला नाही. कोल्हार-घोटी रस्त्यावर ठिकठिकाणी वेगवेगळ्या मिरवणुका सुरू असल्याने रस्त्यावर गर्दीच गर्दी झाली होती.
आमदार डॉ. लहामटे यांनी आदिवासी दिनानिमित नवलेवाडी फाटा येथून मिरवणूक काढली. अकोले बसस्थानक येथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आदिवासी दिन उत्साही वातावरणात साजरा केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी स्वतंत्रपणे मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केले. बाजारतळावर ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता.
हे ही वाचा : ताशी 130 कि.मी. वेगाने धावली नगर-बीड-परळी रेल्वे
माकपचे कॉ. तुळशीराम कातोरे यांनी देवठाण येथून अकोलेपर्यंत मोटरसायकल रॅली काढून अमित भांगरे यांच्या बाजारतळावरील आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदविला. माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून आदिवासी दिन साजरा केला.
आदिवासी समाजाचे हे वादळ येत्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाचे अस्तित्व सिद्ध करणारे वाटत होते. मारुती मेंगाळ व आमदार लहामटे यांनी आदिवासी दिनानिमित्त मिरवणुकीदरम्यान हस्तांदोलन करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता.
हे ही वाचा : …अन् खा. लंकेंनी थांबविली बनपिंप्री येथील टोल वसुली