यूपीएससीच्या निकालांमध्ये एखाद-दुसरा मराठी उमेदवार यशस्वी झाल्याचा काळ पाहिलेल्या महाराष्ट्राला आज यशाची सवय झाली आहे. यंदाच्या यूपीएससीच्या निकालांमध्ये महाराष्ट्राचा वाटा सुमारे दहा टक्के आहे. हे बदलांचे एक सुचिन्ह मानले पाहिजे. तसेच या परीक्षेला बसणार्या मुलींचे प्रमाण आणि त्याप्रमाणात त्यांना मिळणारे यशही वाढते आहे. हाही एक आनंददायी सामाजिक बदल आहे.
देशाचा कारभार चालवणार्या ज्या अनेक घटनात्मक यंत्रणा आहेत त्यातील एक विश्वासार्ह आणि शिस्तीने कारभार करणारी यंत्रणा म्हणजे यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग. या यूपीएससीचे घटनात्मक काम आहे, देशाचा कारभार चालवण्यासाठी उत्तम व्यक्तींची निवड करून ती यादी सरकारकडे सोपवणे. हे काम करण्यासाठी यूपीएससीकडून नागरी सेवा परीक्षा ही संकल्पना वर्षानुवर्षे राबवली जाते. ही परीक्षा देशातील सर्वात अवघड परीक्षा समजली जाते आणि तशी ती असलीच पाहिजे. कारण शेवटी त्यातून देशाचा कारभार पाहणार्या अधिकार्यांची निवड करायची असते. नागरी सेवा परीक्षा 2022 ची प्रक्रिया पूर्ण करून यूपीएससीने नुकताच आपला निकाल जाहीर केला. यामध्ये एकूण 685 जणांची निवड यूपीएससीने केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे 60 ते 70 जण आहेत. म्हणजेच संपूर्ण देशाच्या पातळीवरील या परीक्षेच्या निकालामध्ये महाराष्ट्राचे योगदान 10 टक्के आहे.
एक वेळ अशी होती की, दरवर्षी महाराष्ट्रातून एखाद- दुसरा मुलगा यूपीएससीची परीक्षा पार करत असे. पण आता महाराष्ट्रासाठी हा काळ मागे पडला आहे. यंदाच्या निकालांमध्ये असलेला 10 टक्के वाटाही निश्चितच आश्वासक आहे. परंतु काही जणांना असे वाटतेय की यंदा महाराष्ट्राचा निकाल कमी लागला की काय? पण वस्तुस्थिती तशी नाही. यंदाच्या वर्षी देशातील निवडच थोड्या जागांसाठी आहे. त्यामुळे त्याप्रमाणामध्ये महाराष्ट्राचे प्रमाण केवळ आकडा पाहून नेहमीपेक्षा कमी असल्याचे वाटते; टक्केवारीच्या भाषेत पाहिल्यास महाराष्ट्राचे योगदान सुमारे 10 टक्क्यांच्या आसपास आहे. ते आणखी वाढायला हवे याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. यासाठी येणार्या काळात महाराष्ट्राला अधिक प्रयत्न करावे लागतील.
महाराष्ट्राच्या या निकालामधून काही वेगवेगळी वैशिष्ट्ये व्यक्त होताहेत. आज या परीक्षांना बसणारे आणि त्यात यश मिळवणारे केवळ पुणे, मुंबई किंवा शहरी क्षेत्रापुरते मर्यादित नाहीत. आता निमशहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील उत्तम अभ्यास करून देशपातळीवर यश मिळवताहेत. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारेही काही विद्यार्थी आहेत. हे असलेल्या बदलांचे एक सुचिन्ह मानले पाहिजे. आणखी एक सकारात्मक बदल म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये या परीक्षेला बसणार्या मुलींचे प्रमाण आणि त्याप्रमाणात त्यांना मिळणारे यशही वाढते आहे, हाही एक आनंददायी सामाजिक बदल आहे.
देशाच्या पातळीवर सुमारे 13 लाख जणांनी या परीक्षेसाठीचा फॉर्म भरला तेव्हा त्यातून 685 जणांची निवड केली जाते. यावरून या परीक्षेतील स्पर्धात्मकता किती मोठी आहे, हे लक्षात येईल. त्यामुळे या क्षेत्रात पाऊल टाकताना याचा विचार करून मगच आले पाहिजे. माझी नेहमी सूचना असते की, स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाबरोबरीनेच स्वतःचे व्यक्तिमत्त्व किमान एका पर्यायी करिअरसाठी तरी तयार ठेवायला हवे. थोडक्यात, आल्टरनेटिव्ह करिअर प्लॅन किंवा प्लॅन बी हा प्रत्येक विद्यार्थ्याकडे तयार असला पाहिजे. तो असेल तर प्रसंगी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळाले नाही तर काही आकाश कोसळणार नाही. पण दुर्दैवाने मी काही वेळा पाहतो की, ऐन उमेदीच्या काळामध्ये काही मुले-मुली आठ-आठ ते दहा-दहा वर्षे स्पर्धा परीक्षा एके स्पर्धा परीक्षा करत असतात. हा जीवनाचा किंवा करिअरचा प्लॅन योग्य नाही. कारण अशी आयुष्यातील उमेदीची दहा वर्षे खर्ची घालून हाती काही पडले नाही तर मग प्रचंड निराशा येते, खचून जायला होते, या वर्षांमध्ये आपल्या बरोबरीचे कुठल्या कुठे निघून गेले, सेटल झाले, त्यांची लग्ने झाली आणि आपण अजून स्पर्धा परीक्षाच करतो आहोत, अशी एक भीषण भावना तयार होते. ती व्हायला नको असेल तर आल्टरनेटिव्ह करिअर प्लॅन तयार करून त्यासाठीची तयारी करता करता स्पर्धा परीक्षेची तयारी करणे हा ‘विन विन फॉर्म्युला’ ठरतो.
स्पर्धा परीक्षा हे एक पिरॅमिड स्ट्रक्चर आहे. बेसिक, प्रीलियम, मेन्स, इंटरव्ह्यू, सिलेक्शन आणि त्यातून 100 जणांची निवड अशी याची रचना आहे. त्यामुळे त्यातील आव्हाने, जोखीम लक्षात घेऊनच स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात आले पाहिजे.
भविष्यात स्पर्धा परीक्षांमधील मराठी टक्का वाढण्यासाठी काय करायला हवे याची बरीच चर्चा होत असते. विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये या परीक्षांसाठीच्या तयारीबाबत कुतूहल-संभ्रम असतो. याबाबतच्या सूत्राला मी म्हणतो – शुभस्य शीघ्रम… अॅण्ड इट इज नेव्हर टू लेट. थोडक्यात, जितक्या लवकर याची तयारी सुरू करता येईल तितके चांगले. अनेक पालकांशी असलेल्या संपर्कातून मला दिसून आले आहे की, आपल्याला स्पर्धा परीक्षांमधून करिअर करायचे आहे हे शाळेत असतानाच मुला-मुलींचं ठरलेले आहे. त्यामुळे याबाबत असा कोणताही नियम नाही; परंतु ढोबळ मानाने सांगायचे झाल्यास दहावीनंतर या परीक्षांची तयारी सुरू करावी. अर्थात, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यापूर्वी स्वत:ला ओळखण्याची गरज आहे. एकदा आपण स्वत:ला ओळखले की त्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार करा. परीक्षा देण्याचा विचार पक्का झाला की अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यासाच्या प्रक्रियेचा कंटाळा येऊ देऊ नका. अभ्यासाची प्रक्रिया एन्जॉय करा. अभ्यास करताना जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्य या गोष्टींची कास धरा. या गोष्टी व्यवस्थित केल्यानंतर तुमचे लक काम करते. या संपूर्ण प्रक्रियेनंतर मिळणारे यश हे तुमचेच असते. ज्ञानार्जनाची प्रक्रिया ही निरंतर सुरू असते. त्यामुळे यश मिळल्यानंतरदेखील ही प्रक्रिया सुरू ठेवा. यशस्वी विद्यार्थ्यांनी प्रशासनात स्वच्छ आणि कार्यक्षम कारभार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. समाजासाठी आपल्याकडून जे करणे शक्य आहे, त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रशासनाला पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी सदैव प्रयत्न हवेत.
मी यंदाचे एक उदाहरण सांगेन. यावर्षी निवड झालेल्यांमध्ये कर्नल अमोल आवटे या 42 वर्षांच्या आर्मी ऑफिसरचा समावेश आहे. लष्करामध्ये सेवा करत असताना तो जखमी झाला आणि त्यांचे दोन्ही पाय कायमस्वरुपी अधू झाले. त्यामुळे साहजिकच आर्मीची सेवा संपुष्टात आली. त्यानंतर त्यांनी अभ्यास करून यावर्षी यूपीएससीमध्ये यश मिळवले आहे. विशेष म्हणजे वयामुळे त्यांच्यासाठी ही एकच आणि शेवटचीच संधी होती; परंतु अफाट जिद्द, परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले.