Wednesday, May 29, 2024
Homeब्लॉगसदाबहार देव आनंद

सदाबहार देव आनंद

संध्याकाळचे ५.३० वाजले असावेत, माझी गाडी सुसाट वेगाने वसंतराव देशपांडे सभागृहाच्या दिशेने निघाली होती. आज माझा नायक, माझा हिरो मला भेटणार होता. लहानपणा पासूनच मी मनात एक स्वप्न जोपासलं होत, आयुष्यात एकदा तरी मी देव साहेबांना भेटीन हो देव साहेब म्हणजे आपले देव आनंद. आज तो दिवस उजाडला होता. लोकमत ग्रुप ने देव आनंद ह्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि मलाही कार्यक्रमाचं निमंत्रण होतं.

प्रत्यक्ष भेटीचं स्वप्न पहात असतांनाच मी देशपांडे हॉलच्या आवारात केंव्हा पोहोचलो हे कळलं देखील नाही. लवकर गेल्यामुळे विशेष निमांत्रिकाच्या आरक्षित रांगा सोडल्यानंतर मला योग्य अशी जागा मिळाली. मूळ कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी देव साहेबांचा जीवनपट उलगडणारी चित्रफीत सुरू झाली आणि लगेच मंचावर देव आनंद ह्यांचे आगमन झाले. तोच उत्साह, चेहऱ्यावर तेच हास्य आणि हात उंचावून उपस्थितांना अभिवादन करण्याची ती खास ‘ स्टाईल ‘.

- Advertisement -

आपसूकच माझ्या मनात ह्या पृथ्वी वरील देवा साठी दोन ओळी साकारल्या.

आठवावा देव, पुजावा देव

देवा सम दुसरा नसे कोणी ll”

स्वच्छंद असं अभिवादन करून झाल्याबरोबर देव आनंद ह्यांनी उत्स्फूर्त असं सुंदर भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी हे ही सांगितलं की मी नागपुरला दुसऱ्यांदा आलो आहे. ह्यापूर्वी १९५९ साली काँग्रेसच्या अधिवेशनात आलो होतो त्यावेळी पंडित नेहरूंच्या सानिध्यात राहण्याचा मला योग आला होता.

भाषणाचा शेवट त्यांनी गाईड चित्रपटातील शेवटच्या संवादा ने केला…

आग मे फेक दो मैं जलुंगा नही

तलवार से वार करो, मैं कटुंगा नही

तुम अहंकार हो, तुम्हे मरना होगा

मैं आत्मा हुं, अमर हुं

मौत एक खयाल है

जैसे जिंदगी एक खयाल है

ना सुख है ना दुःख है

ना दिन है, ना दुनिया

सिर्फ मैं हुं, सिर्फ मैं हुं, मैं हुं, मैं हुं टाळ्यांच्या कडकडाटात सत्कार कार्यक्रम संपला. पडदा पडत असतांनाच मी स्टेजच्या मागील भागात पोहचलो होतो. माझी ईच्छा पुर्ण व्हायचा क्षण जवळआला होता.. स्टेजवर दर्डा परिवारातील मोजकी मंडळी होती.

मी माझ्या नायका समोर उभा होतो. क्षणाचाही विलंब न करता एक कडक हस्तांदोलन केलं. शेजारी देव पुत्र सुनील होता. सतरा वर्षा पूर्वीचा प्रसंग आठविण्याचं कारण असं की परवा २६ तारखेला देव आनंद साहेबांची जन्म शताब्दी पूर्ण होते आहे. त्या निमित्ताने माझ्या मनातला देव तुमच्या समोर ठेवण्याचा हा एक लहानसा प्रयत्न.

देव आनंद म्हटल्यावर आपल्यासमोर एक अशी प्रतिमा येते जी लोभस आहे, रूप मादक आणि राजबिंडे आहे, जिची चालण्याची , बोलण्याची स्वतः ची खास अशी शैली आहे, जिने आयुष्यभर स्वतः वर आणि जगण्यावर प्रेम केलं आणि आयुष्य कसं जगावं हे देखील शिकवीलं अशी व्यक्ती.

कोण होता हा देव आनंद…… मी सुरवातीलाच एक बाब स्पष्ट करतो ती म्हणजे देव आनंद ह्यांना त्याच्या संबंधात येणाऱ्या लोकांनी फक्त देव म्हणावं असं वाटतं असे पण येवढ्या मोठ्या माणसाला फक्त देव कसं म्हणायचं असा लोकांना संकोच होता. म्हणून त्याचा उल्लेख चित्रपट सृष्टीत सर्व देव साब असा करायचे. मी मात्र त्यांची इच्छा ह्या लेखाद्वारे पूर्ण करतो आहे.

पंजाब मधील गुरुदासपूर येथील एक विधिज्ञ श्री. पिशोरीमल आनंद ह्यांच्या घरात जन्मलेला हा तिसरा पुत्र ज्याचं प्रेमाने नाव धरमदेव ठेवण्यात आलं.

घरात आई वडील सर्वच त्याला प्रेमाने देव आन संबोधायचे. ह्या आन ला तसा काही अर्थ नव्हता.असा हा मातृ भक्त देव मोठा होत गेला. देवचं महाविद्यालयीन शिक्षण Govt. College लाहोर येथे झालं. लाहोरच्या कॉलेज मधून English literature विषयासह पदवी घेतली. देवला English literature मध्ये इंग्लंडला जाऊन मास्टर्स करायची इच्छा होती. पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ही इच्छा मात्र पूर्ण होऊ शकली नाही. घरात दोन मोठे भाऊ मोहन आणि चेतन आणि लहान भाऊ विजय शिवाय बहिण शीला कपूर असा परिवार होता.सर्वच भाऊ हुशार होते. देवची इंग्रजीवर मात्र जबरदस्त कमांड होती. मास्टर्स करण्याची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आईच्या मृत्यू नंतर देव नी अभिनेता होण्याचं स्वप्न बाळगलं आणि मुंबई गाठली.

देव जेंव्हा मुंबईत पोहोचला तेंव्हा चेतन काही कामानिमित्त आधीच मुंबईत आलेला होता आणि आपल्या लहान भावाला घ्यायला स्टेशनवर पोहोचला होता. चेतनने डून स्कूल मध्ये शिक्षकाची नोकरी केली होती. त्यामुळे त्याचे अनेक धनाढ्य मित्र मुंबईत होते. चेतन देवला घेऊन वाळकेश्र्वर येथे राजा राव नावाच्या मित्राकडे गेला.

काही काळा करिता का असेना देवची रहाण्याची सोय झाली होती. देव म्हणतो मी जेंव्हा मुंबईत आलो तेंव्हा माझ्या जवळ माझे काही कपडे, ३० रुपये आणि छंद म्हणून जोपासलेला पोस्टल स्टँपसचा अल्बम होता. दिवसभर कामासाठी हिंडायचं आणि रात्री घरी यायचं असा क्रम सुरू झाला. राजा रावच्या बाजूच्या इमारतीत मोतीलाल नावाचे चित्रपट अभिनेते रहायचे. राजा राव ह्यांनी देवची ओळख मोतीलाल ह्यांच्याशी करून दिली. मोतीलाल ह्यांनी देव ला काम मिळण्यास मदत करण्याचं आश्वासन दिलं.

मोतीलालची देवला फारशी मदत झाली नाही मात्र देव निर्माता झाल्यानंतर मोतीलालला त्याने कॅरेक्टर रोल्स जरूर दिलेत. राजा रावकडे काही दिवस राहिल्या नंतर देव जवळच राहणाऱ्या K.A.Abbas ह्यांचेकडे देखील राहिला. दुसऱ्याच्या घरी इतके दिवस कसं राहायचं हा विचार मनात आल्याबरोबर देव मित्राकडे राहायला जातो असं सांगून बाहेर पडला. आता मात्र तो मुंबईच्या झगमगाटात निराश्रित होता. पण नशीब चांगल होतं. त्याला गुरुदासपूरचा एक मित्र भेटला, तो त्यावेळी आपल्या भावाकडे परळच्या चाळीत राहत होता. मगं काय देव मित्रा बरोबर त्या चाळीत राहायला गेला. ह्या सर्व भटकंती मध्ये त्याने काही मित्र जोडले. त्यापैकी एक होता मुसुरेकर.

चित्रपटात काम मिळत नाही म्हणून देवने एका अकाउंट फर्ममध्ये नोकरी धरली, काही दिवस केली. नंतर मिल्ट्रीच्या सेन्सॉर विभागात काम मिळालं. पगार बऱ्यापैकी होता. सुरळीत चालू होतं. त्याचाही कंटाळा आला. कारण मुख्य ध्येय अभिनेता व्हायचं होतं. आणि तो दिवस उजाडला. लोकलने कामाच्या शोधत जात असताना दुरूनच देव, देव असा आवाज त्याच्या कानी पडला. देवने मागे वळून पाहिलं तर आवाज देणारी व्यक्ती मुसूरेकर होती. धापा टाकत तो देव पर्यंत पोहोचला आणि एक आनंदाची बातमी दिली की प्रभात कंपनी आपल्या नवीन चित्रपटासाठी एका देखण्या तरुणाच्या शोधात आहे. देव दुसऱ्या दिवशी सकाळी,सकाळी ऑपेरा जवळील प्रभात कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचला.

गार्डने त्याला आत जाऊ दिले नाही. मात्र तेवढ्यातच प्रभातचे सर्वेसर्वा बाबुराव पै आपल्या ऑफिस मध्ये येत होते, जाता जाता त्यांनी देववर एक कटाक्ष टाकला. केबिन मध्ये बसल्या बरोबर त्यांनी घंटी वाजऊन गार्डला आत बोलाविले आणि बाहेर उभ्या असलेल्या तरुणास आत पाठव असा आदेश दिला. बाबुरावांच्या मनात देव भरला होता. आता प्रश्न ऑडिशनचा होता. बाबुरावांच्या सुचने प्रमाणे सकाळी, सकाळी देव डेक्कन क्वीनने पुण्याला पोहोचला. तिथे पी. एल. संतोषी जे चित्रपटाचे दिग्दर्शक होते त्यांनी ऑडिशन घेतली आणि देव अभिनेता झाला. तो चित्रपट होता ‘ हम एक है ‘ हे मला विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते की देवला देव आनंद बनविण्यात दोन मराठी माणसांचा फार मोठा हात आहे, एक मुसुरेकर आणि दुसरे बाबुराव पै.

१९४३ मध्ये मुंबईत आलेल्या देवला अभिनेता होण्याकरिता १९४६ पर्यंत वाट पहावी लागली. हम एक है च्या निमित्ताने देवला पुण्यात प्रभातच्या गेस्ट हाऊस मध्ये राहावे लागले. तिथे प्रभातचे दिग्दर्शक श्री.बेडेकर ह्यांचा सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाची भेट झाली आणि भेटीचं रूपांतर घट्ट मैत्रीत झालं. त्या व्यक्तीचं नाव होतं गुरुदत्त. त्यांच्यात एक प्रेमाचा करार ही झाला की गुरुदत्तने चित्रपट तयार केला तर त्यात हिरो देव आनंद असेल आणि देव आनंद ने चित्रपट निर्मिती केली तर दिग्दर्शन हे गुरुदत्त ह्यांचं असेल. हम एक है तयार झाला होता आणि चित्रपटाचे मोठमोठे पोस्टर्स मुंबईत आणि लोकल स्टेशन्सवर लागले होते.

एक दिवस देव आणि गुरुदत्त लोकल ट्रेन ने प्रवास करत असताना गुरुदत्त च्या नजरेस ते पोस्टर पडले गुरु मोठ्याने ओरडला देव त्या पोस्टर वर तुझा भला मोठा फोटो आहे. तो पर्यंत लोकल पुढे सरकली होती. आपल्या पहिल्या चित्रपटाचं पोस्टर आणि त्यावर आपला फोटो ते पाहण्या करिता देव उत्तेजीत झाला होता. पुढील स्टेशनवर दोघंही उतरले आणि विरुद्ध दिशेला जाणारी लोकल पकडली आणि ते पोस्टर पहाण्याकरिता आधीच्या स्टेशन वर उतरले. देव खूष होता. इतकचं काय तर इतर प्रवासी देखील एकदा पोस्टरकडे आणि एकदा देव कडे पहात होते. काय प्रसंग असेल तो. देवने नंतर प्रभात साठी आगे बढो हा चित्रपट केलाआणि इतर बॅनरचे काही चित्रपट केलेत.

देव ला १९४८ साली जीत प्रोडक्शनचा एक चित्रपट मिळाला नाव होतं ‘ विद्या ‘ चित्रपटात देवला एका प्रसिद्ध गायिका अभिनेत्री बरोबर काम करण्याची संधी मिळाली होती त्या मानाने देव तिच्या तुलनेत नवखाच होता तिचं नावं होतं सुरय्या. काही दिवसातच देव ने तिच्या सोबत मैत्री केली, हळू हळू मैत्री घट्ट होत गेली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. असं नाही म्हणता येणार की देवचं हे पहिलंच प्रेम होतं कारण कॉलेज मध्ये शिकत असताना देव उषा वर्मा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता. तो त्या प्रेमात अडकला नाही कारण त्याचं ध्येय अभिनेता व्हायचं होतं.

त्या अर्थाने देवच पाहिलं प्रेम सुरय्याच होतं असं म्हणता येईल. प्रेम इतकं घट्ट होतं की ते एकमेकांसाठी वेडे झाले होते. सुरय्याच्या आईला हे संबंध मान्य होते मात्र अजीचा खूप विरोध होता, दोघांवर लक्ष ठेवायला सेटवर पहारेकरी बसलेले असायचे. दोघांनीही ह्या विरोधामुळे आपल्या प्रेमाचा बळी दिला. प्रेमभंगाच्या दुःखात सुरय्या आजन्म अविवाहित राहिली. देव आनंद ने सुरय्या सोबत ७ चित्रपट केले. देव ने सुरय्याला दिलेली हिऱ्याची आंगठी देव समोरच सुरय्या ने समुद्रात फेकली, तळाशी जाऊन ती एकदा देवकडे तर एकदा सुरय्या कडे पहाते आहे असा भास होत होता.देव, नाव – लौकिक मिळावं म्हणून एखाद्या चांगल्या बॅनरच्या शोधात होता.

एक चांगला योग सहज जुळून आला. एक दिवस रेल्वे ट्रेन मध्ये चढत असतांना कंपार्टमेंट मधून देव – देव असा कुणीतरी आवाज दिला तो सादिक लतिफ चा होता ( ह्या सादिक ची ओळख देव K.A.Abbas ह्यांचे कडे रहात असताना झाली होती) देव सादिक सोबत जाऊन बसला. सादिक ला देव अभिनय क्षेत्रात आहे हे माहिती होतं,त्याने देवला चांगला चित्रपट हवा आहे का असा प्रश्न केला आणि उद्या बॉम्बे टॉकीजच्या ऑफिसमध्ये ये म्हणून निमंत्रण दिलं.

देव दुसऱ्या दिवशी बॉम्बे टॉकीजच्या कार्यालयामध्ये वेळेत पोहोचला.सादिक तिथे हजर होता, देव ने सादिकला मला कोणाला भेटाव लागेल असं विचारलं. सादिक ने देव समोरच बॉस ला फोन करून त्याला आत पाठऊ का अशी विचारणा केली, येस म्हणून आतून उत्तर आले. आता कोणाशी आपली गाठ आहे असा विचार करतच देव ने बॉसच्या केबिन मध्ये प्रवेश केला. समोरच्या व्यक्ती कडे पाहताच देव जणू दोन फूट उंच उसळलाच, कारण समोरची व्यक्ती देवचा आदर्श असणारी व्यक्ती होती नाव होतं अशोक कुमार म्हणजे आपले दादा मुनी.

ऑडिशनचा प्रश्न नव्हता कारण देव आधीच establish झाला होता. अशोक कुमारच्या तोंडातून निघणारा ५५५ चा धूर देव आनंदलाला हवा हवासा वाटत होता. अशा प्रकारे देवला ‘ जिद्दी ‘ चित्रपट मिळाला. त्याच काळात अशोक कुमारचा लहान भाऊ किशोर मुंबईत आला होता आणि देवचा चांगला मित्र झाला होता. किशोर कुमार ने ‘ जिद्दी ‘ साठी म्हणजेच देव आनंदसाठी पाहिलं गाणं गायीलं. जिद्दीचं दिग्दर्शन सदिकभाईच होतं. जिद्दीच्या यशा नंतर मात्र देव सेलिब्रिटी झाला होता, आता मात्र त्याला लोकल मधून किंवा बस मधून सहज फिरता येणार नव्हतं आणि परळच्या चाळीत देखील सहज जाता येणार नव्हतं.

१९४८-४९ मध्ये देवच्या हातात जवळपास सात चित्रपट होते आणि बहुतेक चित्रपटात सोबत सुरय्या होती. देव चे मोठे बंधू चेतन ” अफसर” च्या निर्मितीत गुंतले होते. अर्थात अफसरचा देव हाच नायक होता. चित्रपटाच्या वितरणा मध्ये अडचण निर्माण झाली होती. देव ने चेतनला मदतीच्या रुपात एक गिफ्ट द्यायचं ठरविलं. तो आपल्या इतर चित्रपटांच्या निर्मात्यांकडे गेला आणि मानधनाची रक्कम आगाऊ मागितली. दुसऱ्यदिवशी एका पार्टीच आयोजन करण्यात आलं.

सिने जगतातील दिग्गज मंडळी ह्या पार्टीमध्ये उपस्थित होती. देव ने सर्व उपस्थितांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले आणि ‘नवकेतन फिल्मस ‘ च्या निर्मितीची घोषणा केली. ‘ ‘अफसर ‘ मोठया दिमाखात नवकेतनच्या बॅनर खाली प्रदर्शित झाला. अफसर धरून पन्नास ह्या सालात देव ने आठ चित्रपट केलेत. नवकेतन मध्ये देव सोबत चेतन आनंद हे देखील काम करायचे. १९५१ मध्ये देवने खऱ्या अर्थाने आपल्या संस्थेच्या माध्यमातून पहिल्या चित्रपटाची घोषणा केली, चित्रपट होता ‘ बाजी ‘.

देव ने आपल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जवाबदारी गुरुदत्त ह्यांचे वर सोपविली. त्याच काळात पंजाब हून आलेली एक तरुणी चेतन आनंदच्या संपर्कात होती, चेतन ने तिची देव बरोबर भेट घालून दिली तिचं नावं होतं मोना सिंग. बाजी मध्ये गीता बालीबरोबर मोनाला ही घेण्यात आलं. ह्याच मोना सिंगच चित्रपटासाठी ठेवलेलं नावं ‘कल्पना कार्तिक’ असं आहे. नवकेतनचा कुठलाही चित्रपट असला की त्यात हिरोईन म्हणून मोनाच राहत असे. बाजी च्या निर्मिती काळात देव मोना सिंग कडे आकर्षित झाला होता.

सुरय्या च्या प्रकरणा मुळे देव तसाही दुखावला होता त्यामुळे मोनाचा सहवास त्याला हवाहवासा वाटला असावा. त्याच काळात एक गमतीदार घटना घडली. देव आणि गीता बाली एकत्र मालवण ला ” जाल” ह्या चित्रपटाच शूटिंग करत होते. लोकेशन ला देव स्वतः ची नवी कोरी कार घेऊन पोहोचला होता. परततांना गीता देव ला म्हणाली मी तुझ्या कार मध्ये येते. देव ला गीतावर इम्प्रेशन मारण्याची आयती संधी मिळाली होती. त्याने ड्रायव्हरला मागल्या सीटवर बसायला सांगितले आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला.

सुसाट वेगाने देवची कार पुण्याच्या दिशेने निघाली. पुणे काही अंतरावर राहिले असताना देवची कार एका पोलला जाऊन धडकली. देव सीट आणि स्टिअरिंगच्या मध्ये अडकला. गीताला किरकोळ मार लागला होता मात्र देव बराच जखमी झाला होता. त्याला पुण्याला ससून हॉस्पिटल मध्ये admit करण्यात आलं. पंधरा दिवस त्याने हॉस्पिटलचा पाहुणचार घेतला. देव म्हणतो उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीम मध्ये एक तरुण डॉक्टर होता त्याच नाव होतं डॉ. श्रीराम लागू. अशा रीतीने गीतावर इम्प्रेशन मारणं देवला खूप महागात पडलं होतं.

१९५४ मध्ये ‘टॅक्सी ड्रायव्हर’ प्रदर्शित झाला. चित्रपट नवकेतनचाचं होता. देव बरोबर होती मोना सिंग ( कल्पना कार्तिक ) ह्या चित्रपटाच्या निर्मिती काळात देव आणि मोनाच प्रेम प्रकरण अंतिम टप्प्यात होतं. देवने गुपचुप विवाह पांजिकरण कार्यालयात जाऊन लग्नाचा नोटीस दिला होता आणि एक दिवस लंच ब्रेकमध्ये कोणाच्याही लक्षात न येऊ देता रजिस्ट्रारचं ऑफिस गाठलं आणि सह्या करून गळ्यात हार घालूनच सेट वर परतले.

बाजी नंतर टॅक्सी ड्रायव्हर खूप यशस्वी झाला होता. टॅक्सी ड्रायव्हरच्या सुरवातीच्या काळात लोकांना मुंबईत टॅक्सी मिळण कठीण झालं होतं कारण टॅक्सी ड्रायव्हर ग्रुप ग्रुप ने ‘टॅक्सी ड्रायव्हर’ पाहण्या साठी चित्रपट गृहात जात असतं. लग्न झाल्या नंतर कल्पना कार्तिकने केवळ दोनच चित्रपट केलेत एक होता House No. 44 आणि नौ दो ग्यारह. नंतर ती आपल्या संसारात रमली. माझ्या मनात सहज एक प्रश्न निर्माण झाला की सुरय्याहून मोना कडे वळतांना देवच्या मनात ” जो मिल गया उसिको मुकद्दर समझ लिया, जो खो गया मैं उसको भुलाता चला गया ” असे द्वंद निर्माण झालं असेल काय ? असो.

नवकेतनच्या निर्मिती नंतर देव ने प्रती वर्ष एका चित्रपटाची निर्मिती केली. स्वतःच्या संस्थे द्वारे निर्मित चित्रपटा व्यतिरिक्त देव ने इतर संस्थेद्वारे निर्मित चित्रपटात देखील भूमिका केल्यात त्यांची ही संख्या खूप होती. देवने २०११ पर्यंत चित्रपट निर्मिती केली.त्याने निर्माण केलेला शेवटचा चित्रपट चार्ज शीट होता. संपूर्ण यादी देता येईल मात्र काही चित्रपटांचाच उल्लेख करतो त्यात हाऊस नंबर ४४ , फंटूष, नौ दो ग्याराह, काला पानी, काला बाझार, हम दोनो, तेरे घर के सामने, गाईड, ज्वेलथीफ, प्रेम पुजारी, हरे रामा हरे कृष्णा, शरीफ बदमाश आणि हिरा पन्ना असा उल्लेख करता येईल. नवकेतन शिवाय देव ने इतर बॅनर चे देखील सुंदर सुंदर चित्रपट केलेत त्यात C.I.D., पेईंग गेस्ट, अमर दीप, लव्ह मॅरेज, सोलवा साल, बंबई का बाबू, जब प्यार किसिसे होता है, असली नकली,बात एक रातकी , माया, तीन देवियां , दुनिया, जॉनी मेरा नाम इत्यादी चित्रपटांचा उल्लेख करता येईल.

तेरे मेरे सपने आणि छुपा रुस्तम हे चित्रपट नवकेतन इंटरनॅशनल ह्या संस्थेचे होते. देव ने चाळीसच्या दशका पासून मृत्यू पर्यंत कमला कोटणीस, खुर्शीद, कामिनी कौशल, सुरय्या पासून तर टिना मुनिम पर्यंत सर्वच अभिनेत्रीं सोबत काम केलं. त्यात आघाडीच्या सर्वच अभिनेत्रींचा उल्लेख करता येईल. त्यात नलिनी जयवंत , मीना कुमारी नर्गिस, मधुबाला, नूतन,साधना , माला सिन्हा, वैजयंती माला, आशा पारेख, वहिदा रेहमान, हेमा मालिनी ह्या सहभागी होत्या.

देव आनंदचे बहुतेक चित्रपट हे रोमँटिकच होते,मात्र १९६५ साली प्रदर्शित झालेला गाईड हा एक क्लासिक चित्रपट होता. विवाहित स्त्रीचे पर पुरुषाशी संबंध असा विषय असल्यामुळे गाईडला बराच विरोध झाला त्याच प्रमाणे गाईड इंग्लिश आणि हिंदी दोन्ही भाषेत असल्यामुळे परदेशातील प्रसारणात देखील अडचणी निर्माण झाल्या, गाईड सेन्सॉरमध्ये अडकला. देव ने तत्कालीन सूचना आणि प्रसारण मंत्री श्रीमती इंदिरा गांधी ह्यांच्यासाठी खास शोचे आयोजन केले आणि शेवटी इंदिराजींच्या मध्यस्थीमुळे गाईड प्रदर्शित झाला.

पहिल्या आठवड्यात तो आपटला होता मात्र हळू हळू लोकांनी गाईडला डोक्यावर घेतलं. गाईडच दिग्दर्शन सुरवातीला चेतन आनंद ह्यांनी सुरू केलं होतं मात्र मी हकीकत चित्रपटाच्या निर्मितीत व्यस्त असल्याचे कारण देऊन चेतन आनंदने गाईड मधून लक्ष काढलं. शेवटी देवचे लहान बंधू विजय आनंद ह्यांनी गाईड पूर्ण केला.

देव आनंदला रोमँटिक हिरो किंवा चॉकलेट हिरो बनविण्यात अनेक गोष्टींचा सहभाग होता. एक तर देव हँडसम होता, त्याची एक खास अशी चालण्याची, बोलण्याची शैली होती. बोलण्यात चालण्यात एक गती होती. ह्याही पेक्षा महत्वाचं काही असेल तर त्याला मिळालेली गाणी खूप गोड होती.

देवसाठी तलत मेहमूद, हेमंत कुमार आणि किरकोळ मुकेश ही मंडळी सुद्धा गायिली आहेत तरी पण देवला रोमँटिक हिरो बनविण्या मध्ये मुख्यत्वे मो.रफी ह्यांचं आणि खालोखाल किशोर कुमार ह्यांचं योगदान आहे. देव आनंदसाठी पाहिलं गाणं गाण्याचा बहुमान मो. रफी ह्यांनाच मिळाला आहे. साल १९४७ चित्रपट होता ‘ आगे बढो ‘ आणि गाणं होतं.

सावन की घटाओं

धीरे धीरे आना

किशोर ला संधी मिळाली ती १९४८ साली जिद्दी च्या निमित्ताने. आणि गाणं होतं..

मरने की दुआएं क्यों माँगू

जीने कि तमन्ना कौन करे, कौन करे” त्या काळात सर्वच गायकांच्या गायकीवर सैगल ची छाप होती.

रफी असो किंवा किशोर ह्यांना सैगल मधून बाहेर पडायला बराच काळ लागला. नौ दो ग्यारह आणि C.I.D. पासून रफी साहेबांचा आवाज बराच मोकळा झाला होता. संगीतकार कोणीही असो देव साठी मो. रफी हे समीकरण तयार झालं होतं. देवला जरी किशोर कुमारचा आवाज हा आपला आवाज आहे असं वाटलं असलं तरीही संगीतकारांना मात्र तसं वाटतं नव्हतं त्यामुळे एस. डी. बर्मन वगळता कोणीही किशोर कुमारचा देव आनंदसाठी उपयोग केला नाही. सुरवातीच्या काळात बर्मन दादांनी सुद्धा मोजक्या चित्रपटात किशोला घेतलं त्यात नौ दो ग्याराह, तीन देवीयां, ज्वेल थीफ , दुनिया आणि गाईड चा उल्लेख करता येईल.

देव आनंदची खरी रोमँटिक हिरोची इमेज जी तयार झाली त्यात “जब प्यार कीसिसे होता है, हम दोनो, असली नकली, काला बाझार, माया, तेरे घर के सामने, तीन देवीयां, गाईड, बंबई का बाबू, बात एक रातकी”, असे चित्रपट होते. गाईड मध्ये किशोर कुमारला एकच गाणं होतं आणि तेही वेळेवर टाकण्यात आलं होतं असं म्हणतात. थोडक्यात देव आनंद ही इमेज साकारण्यात मोठ्ठा वाटा मो.रफी साहेबांचा होता. देव – रफी ह्यांची गाणी लिहिण्याची गरज नाही कारण देव ह्या नावा बरोबरच आपल्या मनात अनेक गाणी रुंजी घालतात.

मग ते “अभी ना जाओ छोडकर ” असेल किंवा मैं जिंदगी का साथ निभाता चला गया असेल किंवा तेरे मेरे सपने असेल किंवा दिन ढल जाये असेल किंवा तुझे जीवन की डोर से किंवा तस्वीर तेरी दिलमे “असेल. असा हा देव त्याच्या अदाकारीने, त्याच्या सौंदर्याने त्याच्या गाण्यामुळे आपल्या पिढीच्या गळ्यातला ताईत होऊन बसला होता.

देव आपल्या चाहत्यां पासून कधीच दूर राहिला नाही. कोणीही फोन केल्या नंतर फोन स्वतः देव उचलत असे आणि समोरच्याच स्वागत देव here ने करत असे.

देव सहज होता. देव हळवा होता. ‘तीन देवीयां ‘ च्या सेटवर असतानाचा एक किस्सा त्याने आपल्या आत्मचरित्रात लिहिला आहे. शॉट तयार होता फक्त देवच्या I am ready. येवढं म्हणण्याचीच वाट होती. कोणीतरी त्याच्या कानात येऊन काहीतरी पुटपुटतो, देव ready च्या ऐवजी रडक्या स्वरात पॅकअप म्हणतो. सर्व अनपेक्षितपणे त्याचेकडे पाहतात, तो एवढंच म्हणतो गुरुदत्त इज डेड आणि सुसाट वेगाने गुरुदत्तच घर गाठतो. तास भर मृत शरीर मांडी वर घेऊन ढसा ढसा रडतो.

अशीच घटना काही काळा नंतर पुन्हा एकदा घडली होती जेंव्हा सुरय्या गेली. त्यांनी स्वतः ला एका खोलीत बंद करून घेतलं आणि अश्रूंना वाट करून दिली होती. देव कसा सहज आणि सुलभ होता हे शिरिष कणेकरांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. शिरिष म्हणतात मी जेष्ठ पत्रकार राम औरंगाबादकर ह्यांचे बरोबर एका फिल्मी पार्टी मध्ये गेलो होतो तिथे देव आनंद आले होते. मी देव आनंद ह्यांना पूर्वी कधीच भेटलो नव्हतो.

मी रामला सहज म्हटल मला देव साहेबांना भेटायचं आहे, दुसऱ्याच क्षणी रामने देव असा कडक आवाज दिला आणि काय आश्चर्य समोर देव हजर. मला तर राम देव आनंद ह्यांना एकेरी देव अशी हाक मारूच कसा शकतो ह्याचेच आश्चर्य वाटले. कणेकर म्हणतात देव साहेबांनी माझ्या सोबत अगदी परिचितांसारख्या दिलखुलास गप्पा केल्या. इतका सहज होता देव.

राष्ट्रीय मुद्यांवरही देवचे विचार स्पष्ट होते. ज्या श्रीमती इंदिरा गांधी चा देव भक्त होता त्याच इंदिरा गांधीच्या विरोधात तो उभा राहिला ज्या वेळी देशावर आणिबाणी लादल्या गेली.

तो जयप्रकाश नारायण ह्यांच्या यज्ञात सामील झाला होता. त्या काळात अटल बिहारी बाजपाई, नानाजी देशमुख आणि लालकृष्ण अडवाणी देवसाठी सर्व काही होते. जनता पार्टीच सरकार पडल्यानंतर देव ने स्वतः. चा नॅशनल पार्टी नावानी राजकीय पक्ष ही काढला. ये अपने बस की बात नहीं है हे कळल्या नंतर तो नाद सोडला आणि सरळ अटलजींच्या प्रचारासाठी दिल्लीत पोहोचला. नानाजी देशमुख मुंबईत आले की देव आनंदकडे निश्चित जायचे इतकी जवळीक होती. लाहोर यात्रेच्या वेळी प्रतिनिधी मंडळात पहिलं नाव देव आनंद ह्यांचं होतं.

लाहोरला जाण्यापूर्वी अटलजींनी नवाज शरीफ ह्यांना विचारलं की आपके लिये क्या लाऊ तेंव्हा शरिफांच उत्तर होतं ‘ मेरे लिये देव आनंद को लाईये ‘ लाहोरला पोहचल्यावर देव आपल्या कॉलेजला भेट द्यायला विसरला नाही.देव एक उत्तम अभिनेता होता. त्याच्या चालण्यात,बोलण्यात एक गती होती. एक लय होती.

आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत तो कार्यरत होता. अखेरचा श्वास त्याने लंडन मधील एका हॉटेल मध्ये घेतला तेंव्हा तो एका स्क्रिप्टवर काम करत होता. वय होतं फक्त ८८ वर्षे. असा हा कर्मयोगी देव. देव हा एखाद्या लहानशा लेखाचा विषय नाही ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. देवसाठी ग्रंथ देखील लहानच होईल. अवॉर्डसच्या बाबतीत म्हणाल तर त्याचे नावे दादा साहेब फाळके अवॉर्ड, पद्मभूषण, दोन फिल्म फेअर अवॉर्डस् फिल्मफेअर लाईफ टाईम achievement अवॉर्ड, IIFA life time achievement award आणि इतर अनेक अवॉर्डस् त्याचे नावावर आहेत. २६ सप्टेबर १९२३ रोजी जन्मलेल्या देव आनंद ह्याची उद्या २६ तारखेला जन्मशताब्दी पूर्ण होते आहे. आपल्या ग्रुप तर्फे देव आनंद ह्यांच्या स्मृतीला अभिवादन आणि ही शब्दसुमनांजली.

नागपुर.

अ‍ॅड. सुनील पाळधीकर

- Advertisment -

ताज्या बातम्या