दोंडाईचा । श.प्र dhule
भरधाव दुचाकी भिंतीला धडकून झालेल्या अपघातात तरुण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात काल पहाटे शहरातील अब्दुल हमीद चौक समोर झाला. याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अर्जुन दिलावर पावरा (वय 22) असे मयत तरुणाचे तर राकेश जंगा पावरा (वय 19 रा.राणीपूर ता. शहादा जि.नंदुरबार) असे जखमीचे नाव आहे.
दि.20 रोजी रात्री बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान दुचाकीने (क्र. एमएच 39 डी 8626) जात होते. त्यादरम्यान अर्जुन याचे भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दोंडाईचा शहरातील नंदुरबार चौफुलीकडून राजपथ मार्गावरील अब्दुल हमीद चौका समोरील भिंतीवर धडकली. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अर्जुन पावरा यास मयत घोषित केले. तर राकेश पावरा हा गंभीर जखमी आहे. याबाबत अजित जंगा पावरा याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात मयत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय दिनेश मोरे करीत आहे.