नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यातील आदर्श पतसंस्थांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढून त्यांच्या कार्याला स्फूर्ती मिळावी या उद्देशाने दैनिक ‘देशदूत’च्या वतीने व नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन, नाशिक यांच्या सहकार्याने या संस्थांना ‘आदर्श पतसंस्था पुरस्कार 2024’ वितरण आज (दि.24) नामवंत व्यक्तींंच्या हस्ते दिला जाणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था फयाज मुलाणी, नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, कार्याध्यक्ष नारायणशेठ वाजे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नाशिक शहरासह जिल्ह्यात शेकडो पतसंस्था कार्यरत असून, हजारो कोटींची उलाढाल या संस्थांची आहे. सामाजिक कार्य, व्यावसायिक भागीदारी संकल्पना, विनम्र व तत्पर सेवा अशा काही वैशिष्ट्यांमुळे सहकार क्षेत्रात अनेक सहकारी पतसंस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत उत्कृष्ट कार्य केले आहे. या संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
पुरस्कार सोहळा नासिक्लब, नंदिनी पुलाजवळ, नाशिक-पुणे रोड या ठिकाणी सायंकाळी ठीक 5.00 वाजेपासून रंगणार आहे. प्रवेश फक्त निमंत्रितांसाठी असणार आहे.