मुंबई | Mumbai
स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने (Kunal Kamra) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर करत अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. खारच्या युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये जाऊन शिवसेनेने तोडफोड केली आहे. तर, दुसरीकडे कुणाल कामराविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या वादावर राजकारण तापू लागले असताना या प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य करत एकनाथ शिंदे यांना उलट सवाल केला आहे.
यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले की,” मी कुणाल कामराचा पूर्ण व्हिडिओ बघितला, त्याची कविता बघितली मात्र त्याच्यामध्ये कुठेही एकनाथ शिंदे यांचे नाव त्यांनी घेतलेले नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतले की त्यांचे नाव गद्दार आहे. ” असा खोचक टोला त्यांनी लगावला. तसेच दोन्ही बाजूने विचार केला तर कोण चूक आणि कोण बरोबर याची चौकशी होईल. पण जर नाव न घेता मिरची झोंबत असेल तर त्यांनी स्वतःला ते नाव दिलं आहे का? असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
तसेच “मी त्यांच्या खासदारांची (MP) प्रतिक्रिया ऐकली ते आपल्या नेत्याला साप म्हणतात, एकनाथ शिंदे यांना साप म्हणणारे ते खासदार नरेश म्हस्के (MP Naresh Mhaske) आहेत”, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला. तर भगत सिंह कोश्यारी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरतात तेव्हा त्यांच्या घरावर (House) कधी आंदोलन करतील का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.