Thursday, January 29, 2026
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा : लोकशाही विरुद्ध हुकूमशाही मूल्यांचा संघर्ष ‘आला रे राजा’

राज्य नाट्य स्पर्धा : लोकशाही विरुद्ध हुकूमशाही मूल्यांचा संघर्ष ‘आला रे राजा’

संदीप जाधव | अहिल्यानगर

सत्ता सहृदयी माणसाच्या हातात आली की राज्य व्यवस्थित चालते. मात्र, हीच सत्ता डोक्यात गेली की अनाठायी हव्यासापोटी माणूस निर्दयी, विकृत बनतो. हुकूमशाही पद्धतीने राज्य करतो. विरोधकांना ऐनकेन प्रकारे संपवण्याचा विडा उचलतो. बुद्धीजीवी वर्गाला शरण यायला सांगतो. स्वातंत्र्याची गळचेपी करतो. कारण स्वातंत्र्य आणि हुकूमशाही एकत्र नांदू शकत नाही. ही अज्ञात काळातील राजकीय परिस्थिती विविध प्रतिकात्मक पात्रांच्या साह्याने रंगमंचावर मांडण्याचा प्रयत्न करणारं ‘आला रे राजा’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत गुरुवारी (20 नोव्हेंबर) पाहायला मिळालं. लांबलचक संवाद आणि जड संदर्भ असलेले हे वैचारिक नाटक प्रेक्षकांना व्यवस्थित उमगले नाही. मात्र त्यातील आशय मात्र गंभीर आणि महत्त्वाचा होता.

- Advertisement -

शेवगावच्या न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेजने सादर केलेल्या या नाटकाचे लेखक दिलीप जगताप होते. प्रा. डॉ. गोकुळ क्षीरसागर यांनी त्याचे दिग्दर्शन केले. मुळात स्पर्धेसाठी अशी आव्हानात्मक संहिता निवडणे हेच मोठे धाडस! काहीतरी वेगळे सादर करण्याच्या विचाराने दिग्दर्शकाने या वैचारिक नाटकाला रंगमंचावर उतरवण्याचा करण्याचा चांगला प्रयत्न केला. नेमका आशय न समजल्याने प्रेक्षक मात्र संभ्रमावस्थेत होते. पण नाटकातील दोन्ही अंकात सलग रंगमंचावर टिकून राहून किल्ला लढविणे सोपे नाही. नाटकातील मुख्य नायकाच्या भूमिकेत असलेल्या प्रा. क्षीरसागर यांच्यावर मोठी जबाबदारी होती. वेगवान घडामोडी नसल्याने नाटक फारसे रंगले नाही.

YouTube video player

नाटकाचा पडदा उघडताच एका राजवाड्याचे दर्शन होते. कुत्र्यांच्या आवाजामुळे त्रस्त असलेला राजा महालात अवतरतो. कुत्र्यांच्या आवाजाचा होत असलेला त्रास त्याला सहन होत नाही. त्यांच्या हत्येचे फर्मान राजा सोंगाड्याला देतो. तो आपली जबाबदारी पूर्ण करतो. पण हव्यासी अत्याचारी धोरणामुळे राजा चुकीचा असल्याचे सोंगाड्याला ठावूक असते. दरम्यानच्या काळात श्रद्धा, विश्वास यांसारख्या जीवनमूल्यांना चिरडण्यासाठी राजा घंटानादाला बंदी घालतो. मात्र, ही बंदी उठवावी यासाठी आग्रही असलेल्या महंताला माझ्या मर्जीनुसारच वागा असा दमवजा सल्ला देतो. दुसरीकडे राजाची पत्नी आजारी असते. तिच्या दुःखाचे खोटे नाटक राजा करत असतो. मध्येच कलेच्या नवनिर्मिती स्विकारण्याची भाषाही तो बोलतो. सरळ मनाचा सोंगाड्या नाटक रचून हुकूमशाह राजाचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतो, मात्र, तो फसतो. नंतर राजा व सोंगाड्या एकमेकांच्या भूमिकेत येऊन नाटक खेळतात. त्यात राजा सोंगाड्याच्या रूपात येतो आणि आपले राणीशी प्रेमसंबंध असल्याचे सांगतो. मग राजाच्या भूमिकेत असलेल्या सोंगाड्याला आपल्या प्रेमसंबंधाची चाहूल राजाला लागली आहे, याची जाणीव होते. दरम्यानच्या काळात राणी दगावल्याचे महंत सांगतात. (राणीवर राजानेच विषप्रयोग केलेला असतो) या वेळी सोंगाड्या आपले प्रेम राणीवर असल्याने आपणच राजा असल्याचे सांगतो. मात्र, संतापलेला राजा त्याची हत्या घडवून आणतो आणि पुन्हा पहिल्यापासून हुकूमशाहीचे चक्र सुरू होते. अशा शेवटाने नाटकाने पडदा पडतो.

नाटकातील सर्व पात्रे ही प्रतिकात्मक आहेत. राजा हा हुकूमशाही व्यवस्थेचे प्रतीक आहे. सोंगाड्या हा लोकशाहीचे, कुत्रे हे विरोधकांचे, महंत हे बुद्धीजीवींचे, तर नाटकात न दिसणारी पण रुग्णशय्येवर असलेली राणी हे स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. निर्दयी हुकूमशाह राजा विरोध करणार्‍यांना संपवतो. बुद्धीजीवींना शरण यायला लावतो. लोकशाही विरुद्ध हुकूमशाही मूल्यांच्या संघर्ष होतो. लोकशाही आणि स्वातत्र्य यांची जवळीक सहन न झाल्याने त्या दोघांचाही खात्मा होतो. हुकूमशाही जिंकते असा नाटकाचा आशय. मात्र, नाटकातील जडपणामुळे नाटक फारसे रंगले नाही. मात्र प्रयत्न मात्र धाडसाचा म्हणावा लागेल.

राजाची भूमिका गोकुळ क्षीरसागर यांनी केली. त्यांंनी दोन्ही अंकात एकही क्षण रंगमंचावरून राजाला बाहेर जाऊ दिले नाही. त्यांच्या वाट्यालला सगळ्यात जास्त संवाद आले. त्यांची भूमिका आव्हानात्मक होती. तरीही त्यांचे पाठांतर दांडगे होते, एका संवादावेळी अडखळले. काही प्रसंगांत एकसुरी संवादामुळे हावभावांकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवले. दुसर्‍या अंकात सोंगाड्याच्या रूपात त्यांचा वेगळा अभिनय पाहायला मिळाला. नाटकात सब कुछ राजाच असल्याने आपली जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न डॉ. क्षीरसागर यांनी केला. त्यांनी नाटक पैलतीरावर व्यवस्थित नेले. ढोंगी भाव मात्र त्यांना छान जमले.

सोंगाड्ाच्या भूमिकेत आलेल्या माफिज इनामदार यांनी विविध हावभाव आणि नैसर्गिक अभिनय यांच्या जोरावर आपले पात्र खुलवले. राजाच्या मागे चालताना केलेले विनोदी हावभाव प्रेक्षकांना हसवून गेले. नाटकात सर्वांत खुललेले हे पात्र. अनेक प्रसंगांत त्यांच्या चेहर्‍यावरील परिपक्व अभिनय देहबोलीला शोभून दिसला. मात्र, अनेकदा आपल्या टोपीला हात लावणे त्यांना टाळता आले असते. कावरेबावरे हावभाव त्यांनी उत्तमपणे दर्शवले.

वृद्ध महंताची भूमिका रोहिदास गाडे यांनी केली. आवाज बारीक असूनही न अडखळता त्यांनी केलेले उपदेशपर संवाद आत्मविश्वासाने पार पाडले. त्यांनी हावभावांकडे लक्ष द्यायला हवे होते. मात्र, आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी त्यांनी गंभीरपणे तडीस नेली. शायद सय्यद व हर्षद डोंगरे यांनी राजसेवकाची भूमिका न बोलता पार पाडली. संवाद वाट्याला आले नाहीत, मात्र नाटकात काम करण्याची हौस मात्र त्यांनी पूर्ण केली.

नेपथ्य प्रा. राम कोरडे, सुभाष खंडगळे, शुभम तांबे, अभिजीत मिसाळ यांचे होते. राजाचे सिंहासन, खिडकीतून दिसणारा रस्ता छान वाटले. खांबांभोवती पडदा टाकून आकर्षक भिंत दर्शवता आली असती. पार्श्वभूमीवर असलेले राजकीय चिन्ह राजाच्या वृत्तीचे दर्शन घडवत होते. संगीत योजना प्रा. योगेश रोकडे, असिफ सय्यद यांनी सांभाळली. दोन-तीन प्रसंगांत त्यांनी अनुरूप संगीत दिले. मात्र, नाटकात संगीताचा वापर आणखी करता आला असता. प्रकाश व्यवस्था विनोद गरूड व शरद तुपविहीरे यांच्याकडे होती. दोन प्रसंगांत राजा अंधारातच वावरला. या वेळी स्पॉटचा वापर करायला हवा होता. मात्र, काही प्रसंगात दिलेले लाईट्स उत्तम वाटले. वेशभूषा प्रा. आशा वडणे, पूजा शित्रे यांनी केली. सर्वच पात्रांची वेशभूषा व्यवस्थित वाटली. रंगभूषा वंदना सैंदाणे व गायत्री नांगरे यांच्याकडे होती. राजा व सोंगाड्या शोभून दिसला. रंगमंच व्यवस्था डॉ. रवींद्र वैद्य व प्रा. मोहनराव वेताळ यांनी पाहिली. प्रा. डॉ. पुरूषोत्तम कुंदे हे नाटकाचे निर्मितीप्रमुख होते, तर प्रा. विठ्ठल देवढे सूत्रधार होते.

लोकशाही मूल्यांविरुद्ध हुकूमशाही मूल्यांचा संघर्ष दाखविणारे वेगळ्या धाटणीचे वैचारिक नाटक प्रा. डॉ. गोकुळ क्षीरसागर यांनी स्पर्धेसाठी निवडले व सादर केले. अर्थात त्यासाठी मोठी मेहनत त्यांना घ्यावी लागली. दिग्दर्शनाबरोबरच स्वतःची भूमिका त्यांनी सांभाळली. स्पर्धेत तोडीस तोड नाटके सादर होत असतात. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या नाटक जरासे जड असल्याने सर्वसामान्य प्रेक्षकांना फारसे रूचले नाही. प्रयत्न मात्र कौतुकास्पदच मानावा लागेल. एक वेगळा प्रयोग स्पर्धेत सादर करण्याची दिग्दर्शकाची इच्छा मात्र पूर्ण झाली.

ताज्या बातम्या

पडसाद : कणखर प्रशासकाची अकाली एक्झिट

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. 'देशदूत' - संपादक प्रमोद महाजन (२००६), विलासराव देशमुख (२०१२), गोपीनाथ मुंडे (२०१४) आर. आर. पाटील(२०१५) आणि आता अजितदादा पवार.. महाराष्ट्राने...