Saturday, October 24, 2026
Homeमनोरंजनतिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आमिर खान, गौरी स्प्रॅटसोबतच्या लग्नाचा पहिला Photo आला समोर

तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आमिर खान, गौरी स्प्रॅटसोबतच्या लग्नाचा पहिला Photo आला समोर

मुंबई । Mumbai

सध्या मुंबईत मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असतानाच, दुसरीकडे मनोरंजन विश्वात मात्र बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान याच्या तिसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. आमिर खान आणि त्याची जुनी मैत्रीण गौरी स्प्रॅट यांनी अत्यंत साधेपणाने राहत्या घरी ‘रजिस्टर मॅरेज’ करत आपल्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली आहे. या अत्यंत खाजगी आणि कौटुंबिक विवाह सोहळ्याचे फोटो आता समोर आले असून सोशल मीडियावर ते तुफान व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

या विवाह सोहळ्याला राजकीय, व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. देशातील आघाडीचे उद्योगपती अंबानी कुटुंब, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यांनी या सोहळ्याला खास उपस्थिती लावून नवदाम्पत्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

या लग्नाचे सर्वात मोठे आणि भावनिक वैशिष्ट्य म्हणजे आमिर आणि गौरी यांच्या आधीच्या लग्नांमधील मुलांची या सोहळ्यातील आनंदी उपस्थिती. आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुले— अभिनेता जुनैद खान आणि इरा खान, तसेच त्याची दुसरी पत्नी किरण राव यांचा मुलगा आझाद राव खान, हे सर्वजण आपल्या वडिलांच्या या आनंदात मनापासून सहभागी झाले होते. याशिवाय, गौरी स्प्रॅट यांचा ६ वर्षांचा लहान मुलगाही या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार बनला होता. मुलांच्या या परिपक्व आणि प्रेमळ साथीने सोहळ्याची शोभा अधिकच वाढवली.

या लग्नाविषयी भावना व्यक्त करताना आमिर म्हणाला, “हे लग्न आम्ही अगदी घरातच करत आहोत. हे आमच्यासाठी अतिशय खाजगी आणि भावुक आहे. आम्हा दोघांनाही तुमच्या सर्वांचे मनापासून आशीर्वाद हवे आहेत, जेणेकरून आमचा पुढील जीवनप्रवास सुखाचा होईल.” वरवर पाहता हे नाते नवीन वाटत असले, तरी आमिर आणि गौरीची ही कहाणी तब्बल २५ वर्षांपूर्वी सुरू झाली होती. बंगळुरूमध्ये त्यांची पहिली भेट झाली होती, मात्र काळानुरूप त्यांच्यातील संपर्क तुटला आणि दोघांचे आयुष्य वेगवेगळ्या दिशांना निघून गेले. साधारण २-३ वर्षांपूर्वी आमिरच्या चुलत भावाच्या मध्यस्थीमुळे या दोघांची पुन्हा एकदा गाठ पडली. दोन दशककांहून अधिक काळानंतर झालेल्या या भेटीत जुन्या मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि अखेर त्यांनी कायमचे एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

गौरी स्प्रॅटबद्दल सांगायचे तर, ती मूळची बंगळुरूची असून तिची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय प्रतिष्ठित आहे; तिचे आजोबा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी होते. गौरीने लंडनमधून फॅशन, स्टायलिंग आणि फोटोग्राफीचे उच्च शिक्षण घेतले आहे. सध्या ती ‘आमिर खान प्रॉडक्शन्स’सोबत व्यावसायिक पातळीवर काम पाहत आहे. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणे पसंत करणारी गौरी आता आमिरच्या जीवनाचा मुख्य भाग बनली असून, चाहत्यांकडून या नव्या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ताज्या बातम्या

रील स्टार निघाले लुटारू! ९ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि दुचाकी...

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळविणारेच लुटारू निघाल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावर...