डॉ विकास गोगटे
सकाळी जाग आलीये, निसर्गाने कॉलही दिलेला आहे. पण उठून पाऊल टेकवताच देवाची आळवणी करणारा माणूस देवभक्त असण्यापेक्षा टाचदुखीने पीडित असण्याची शक्यता अधिक असते.
केव्हाही विश्रांती मिळाली (म्हणजे पायावर भार पडला नाही) व त्यानंतर चालू लागल्यावर पहिली काही पावले दुखणे हे लक्षण असते. तसेच चालत राहिल्यास दुखणे कमी होते व तसेच राहते. सहसा असा त्रास एकाच टाचेला होतो असे दुखणे पुढे पुढे विश्रांती घेत असतानाही सुरू होते.
मोठ्या पायी छोटा बूट
टाचदुखीमागे अनेक कारणे असू शकतात. कॅल्केनियम या हाडाचे फ्रॅक्चर, अॅकिलीस या स्नायूबंधाची दुखापत, सतत पायाची आदळआपट (या कारणामुळे त्याला ‘पोलीस मॅन्स हिल’) म्हणतात. खूप चालीने स्नायूंच्या जाळीवर पडणारा ताण, आनुवंशिकतेने पावले सपाट असणे, अनवाणी बराच काळ कडक पृष्ठभागावर चालणे याबरोबरच पायापेक्षा लहान आकाराचे बूट वापरणे ही कारणे संभवतात.
उपटसुंभ सुळे देतात शूळ
तळव्यांचे सर्व स्नायूंच्या खाली या स्नायूंपासूनच बनलेली आधार देणारी एक जाळीसारखी गादी असते. तिला प्लँटर फॅशिया म्हणतात. त्या जाळीला सूज येणे ही टाचदुखीमागील महत्त्वाची घडामोड असते. तसेच हाडांपासून निघणारे उपटसुंभ सुळे हे ही कारण असू शकते. स्नायू एका नायलॉन दोरीसारख्या बंधनाने हाडात गुंफलेले असतात. काही कारणांनी त्या ठिकाणी दाह झाल्यास नंतर तेथील जखम भरताना तिथे कॅल्शियम जाऊन बसते. त्यामुळे तेथे हाडांचे अयाचित उपटसुंभ सुळे तयार होतात असे सुळे शरीरात कोठेही असू शकतात. पण टाचेवर ते अधिक आढळतात. एक्स-रे मध्ये ते दिसतात. टाचदुखी, खांदादुखी अशी लक्षणे असल्यास मधुमेहाची शंका फेडावी. तसेच संधिवातामध्येही इतर सांध्याबरोबर टाचा दुखू शकतात.
खबरदार जर ‘टाच’ मारुनी…
जॉगिंगसारखा व्यायाम, कडक पृष्ठभागावर चालणे, धावणे या गोष्टी टाळाव्यात. अनवाणी चालू नका. त्याने तळव्याच्या जाळीवर ताण येतो. चपलाही नकोत त्यापेक्षा बूट चांगले. जागतिक उदारीकरणानंतर भारतातही सहजी उपलब्ध असलेले (व अर्थातच महागडेही) स्पोर्टस् शूज अधिक उपयोगी ठरतात. साध्या बुटातही आतल्या बाजुने, पण टाचेच्या दिशेला अर्धा इंच जाड रबरी जीभ बसवून घ्यावी. दुखर्या जागी मधोमध भोक पडलेले पॅड (खेळण्याच्या रबरी रिंगसारखा आकार असलेले) बुटात ठेवल्यास सुळ्यामुळे पडणारा ताण कमी होतो. काही दिवसांनी तेथे दाह कमी झाल्यानंतर सुळा तसाच राहिला तरी वेदना नाहीशा होतात.
बादलीत गरम पाणी घेऊन 10-15 मिनिटे पाय बुडवून शेक द्यावा. तसेच पायाला वरचेवर मालीश करावे. दुखर्या भागावर प्रथम हळुवार नंतर सहन होईल इतपत जोराने हाताच्या अंगठ्याने चोळावे. शेक व मालीश यामुळे तेथील रक्तप्रवाह वाढून दाह कमी होण्यास मदत होते.
या व्यायामावर ‘शतदा’ प्रेम करावे
तळपायांची बोटे ताण देऊन टाचेकडे आतील बाजूस वळवण्याचा व्यायाम शतदा म्हणजेच अधिक वेळा करावा. तसेच जमिनीवर रिबन, कापडाची पट्टी पसरवून तिच्यावर उभे राहून ती बोटांच्या साहाय्याने तळपायाखाली गोळा करण्याची क्रिया करावी. कागदाचे कपटे जमिनीवर पसरवून ते बोटांच्या चिमटीत पकडावेत. या व्यायामांनी तळव्यातील स्नायू बळकट होऊन स्नायूंच्या जाळीवरील ताण कमी होऊन बरे वाटते.
याशिवाय वेदनाशामक गोळ्या, मलमे, टाचेमध्ये द्यायचे स्टिरॉइडचे इंजेक्शन, क्वचितच करावी लागणारी सुळक्यावरील शस्त्रक्रिया हे इलाज वैद्यकीय सल्ल्यानुसार उपलब्ध आहेत.
शेवटी थोडी गंमत. बायकोमुळे हैराण झालेला एक नवरा काही कारणामुळे बायकोला डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर म्हणतो, “डॉक्टर जराशी संधी मिळताच ही मला वात आणते. हिला ‘संधिवाता’वरचे औषधही देता का?”