Thursday, September 12, 2024
HomeUncategorizedआरोग्यदूत : गुडघेदुखी

आरोग्यदूत : गुडघेदुखी

शरीरात एकूण 187 सांधे आहेत. यापैकी गुडघ्याच्या सांध्याचा वांधा झालेला अधिक प्रमाणात आढळतो. त्याचे कारण त्या सांध्याच्या गुंतागुंतीच्या रचनेत तर आहेच शिवाय त्याच्या विविध हालचालीही आहेत. चालताना तो पुढे पुढे असल्याने अनावधानाने मारही जास्त लागतो.

या गुडघेदुखीची आकडेवारी काढली तेव्हा असे लक्षात आले की, चाळिशीनंतर दहा जणातील तीन जणांना अधूनमधून तर साठीनंतर दहातील पाच जणांना गुडघेदुखी झालेली असते. अस्थीभंग, रुमाटॉईड, कुर्च्या तुटणे, वाटी सरकणे, गुरघी (गुडघ्याचा जंतुसांसर्गिक आजार), झिजेचा संधिवात ही कारणे असतात. सुरुवातीला हा त्रास डाव्या वा उजव्या किंवा एकाच बाजूस असतो.

- Advertisement -

प्रत्येक हालचालीत गुडघ्यास धक्का लागण्याची शक्यता, वयानुसार होणारी झीज, वजन वाढणे या सर्वांचा एकत्रित परिणाम गुडघेदुखीत होऊ शकतो. हाडे एकमेकांवर घासत राहिल्याने त्यांचा गुळगुळीतपणा कमी होऊन ती खडबडीत होतात. त्याशिवाय हाडावर हाड घासल्यामुळे सांध्यात बारीक पूड निर्माण होते. ती पूड शोषून घेण्यासाठी सांध्यातील तेलाची अधिक निर्मिती होते. त्यामुळे गुडघ्यास सूज येते. त्यालाच गुडघ्यात पाणी झाले असे म्हणतात.

बाम करी थोडे काम

तात्पुरत्या वेदना कमी करण्यासाठी अ‍ॅस्पिरीन वा त्यासारखी इतर औषधे उत्तम आहेत. अर्थात, काही जणांत या औषधांनी जठराचा दाह होऊ शकतो. म्हणून त्यांचा उपयोग जेवणानंतर व डॉक्टरी सल्ल्यानुसार करणे चांगले. नाहीतर भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था होऊ शकते. वेदनाशामक मलम, लिनिमेंटस्, बाम यापैकी कुठलेही मलम आपल्या हातानेच हलके हलके चोळून लावल्यास बरे वाटते.

आपल्या वाढलेल्या वजनाच्या तिप्पट ताण उभे राहताना वा चालताना गुडघ्यांवर येतो. तुमचे वय, उंची, लिंगानुसार अपेक्षित वजन असावे. वजन कमी करण्यासाठी गुड (गूळ) व घी (तूप) व तत्सम गोड व तेलाचे पदार्थ आहारात कमी करणे आवश्यक ठरते.

द्राक्षाच्या बागेला मांडवाचा आधार

द्राक्षाचा वेल नाजूक असतो म्हणून त्याला भरभक्कम लोखंडी अँगल्सचा मांडव लावतात. तर झेंड्याचा खांब सरळ उभा राहावा यासाठी त्याला दोर व तारांनी ताणून जमिनीत आधार देतात. तोच प्रकार गुडघा नीट ठेवण्यासाठी करावा लागतो. गुडघ्याच्या भोवतालचे स्नायू, लिंगॅमेंट्स मजबूत केल्याने गुडघ्याचा भार ते बर्‍याच प्रमाणात घेऊ शकतात. व्यायामाने ताकदवान झालेले स्नायू गुडघ्याची योग्य स्थिती ठेवतात. तसेच त्याच्यावरील ताण कमी करून वेदना कमी करू शकतात. उताणे झोपून पाय सरळ लांब ठेवून, गुडघ्याखाली लहानशी गुंडाळलेली चादरीची घडी ठेवून ती घडी गुडघ्याने 100-200 वेळा दाबणे हा एक सोपा व्यायाम आहे. हाच व्यायाम पाय लांब ठेवून बसल्या अवस्थेतही करता येतो. तसेच पालथे झोपून घोट्यास 3 किलोपर्यंत वजन बांधून पाय पाठीमागच्या बाजूने वळवून मांड्यांवरती आणणे, असे 10 वेळा करणे हा दुसरा व्यायाम आहे. या दोन्ही व्यायामांनी गुडघ्याच्या पुढील व मागील बाजूचे स्नायू मजबूत होतात.

शॉकअ‍ॅब्सॉर्बर बसवा

आपण चालतो, धावतो त्या प्रत्येक वेळी पाय जमिनीवर आदळत असतो. त्याचा धक्का नडगीवाटे गुडघ्यावर पडत असतो. जॉगिंग, धावणे, बॅडमिंटनचा खेळ यासाठी काँक्रिटसारखा कडक पृष्ठभाग नको तर भुसभुशीत माती, हिरवळ, जॉगिंग ट्रॅक वा लवचिक असलेला लाकडी पृष्ठभाग उत्तम.

नेहमीसाठी स्पोर्टस् शूज वापरल्यास त्यांचे तळ जाड व स्पंजासारखे असल्याने पाय आपटण्याचे धक्के तेथेच काही प्रमाणात शोषले जातात. नी कॅप (गुडघ्याचा मोजा) तात्पुरती वापरल्यास फायदेशीर ठरू शकते.

किस्सा खुर्सी का

गुडघे दुखत असताना धावणे, चढणे, वजन उचलणे, मांडी घालणे टाळा. बसण्यासाठी व सकाळच्या नैसर्गिक गरजेसाठी म्हणजेच शौचासाठी अनुक्रमे खुर्ची व कमोडचा वापर उपयोगी पडतो. सपाटीला थोडेफार चालायला हरकत नाही. पण ‘गुडघ्याला काम करायला लावून मोकळा करतो’ असा अतिरेकी विचार टाळा. शेक, गरम वा थंड, ज्याला जसा साहवेल तसा वापरायला हरकत नाही. पण सूज असल्याचा संशय असल्यास गरम शेक नको.

शेवटी दंड व भेद

वरच्या युक्त्यांनी गुडघेदुखी आटोक्यात न आल्यास हातात आधारासाठी दंड (काठी) उपयोगी पडतो. काठी तिसरा पाय म्हणून जमिनीला टेकवून दुखर्‍या गुडघ्यावरील वजन कमी करता येते. यासाठी काठी दुखर्‍या गुडघ्याच्या विरुद्ध हातात (म्हणजेच उजवा गुडघा दुखत असल्यास डाव्या हातात) धरावी. याशिवाय गुडघ्यात इंजेक्शन देणे, गुडघ्याचा भेद (शस्त्रक्रिया) वा आता कोणत्याही शहरात उपलब्ध असलेली सांधा बदलून कृत्रिम सांधा टाकण्यासाठी शस्त्रक्रिया हे शेवटचे पर्याय आहेत.

शेवटी थोडी गंमत : दुखरा उजवा गुडघा चेपतच गणपतराव डॉक्टरांच्या तपासणी कक्षात शिरतात. त्यांना तपासून डॉक्टर म्हणतात, ‘विशेष काही नाही. वाढत्या वयामुळे उजवा गुडघा दुखतो आहे.’ त्यांचे उत्तर न पटल्यामुळे गणपतराव म्हणतात, ‘तसे असेल तर न दुखणार्‍या माझ्या डाव्या गुडघ्याचे वय तुम्ही सांगू शकाल?’

- Advertisment -

ताज्या बातम्या