नंदन रहाणे
वारकरी संप्रदाय म्हटला की, माळ आणि टाळ या दोन गोष्टी आल्याच. एकवेळ पखवाज, वीणा नसेल तरी भागेल, अगदी तुळस नि विठोबा नसले तरी चालेल… पण गळ्यात माळ व हातात टाळ पाहिजेच पाहिजे. या दोन गोष्टी असल्या की आपण प्रत्यक्ष देवालाही खेचून आणू असा जबरदस्त आत्मविश्वास वारकर्याच्या मनात असतो! आषाढीच्या वारीसाठी शेकडो किलोमीटरचे अंतर वारकरी चालून जातात. तेव्हा मुखात फक्त पांडुरंगाचे नाम आणि संताचा गजर असतो. त्या त्या दिवसाच्या शेवटी मुक्कांमावर पोचले की कीर्तन उभे राहाते. संतांच्या अभंगावर महाराज निरुपण करतात, टाळकरी प्रमाण गातात, भक्तीचा रंग उसळतो आणि तो दिवस सार्थकी लागतो. अशा हजारो दिंड्या पंढरपुरी पोचल्या की तिथेही एकादशी ते पौर्णिमा असा 5 दिवस कीर्तनाचा नुसता दंगा उसळतो. मग आषाढीची वारी करुन भक्त गावोगावी परतले की लगेच गावच्या मंदिरात नामसप्ताह उभे राहतात. तिथेही आठवडाभर रोज नवे महाराज, रोज नवा अभंग आणि रोज नवे कीर्तन!
ही कीर्तनाची रीत या वारकरी संप्रदायाला नामदेव महाराजांनी घालून दिली. त्या अगोदर देवांचा महिमा वर्णन करणारी पुराणे होती. ती सगळी केवळ संस्कृतात… ती भाषा फक्त ब्राह्यण पुजार्याला किंवा कथेकर्यालाच येत असे. मग तो चातुर्मासात एखादे पुराण सांगत असे… नामदेंवानी संस्कृत आणि ब्राह्यण या दोन्ही घटकांंचा बडीवार रद्दच करुन टाकला! ते चक्क मराठीत अभंग लिहून, तेच गाऊन मराठीतच देवाचा महिमा सांगू लागले! त्यात पांडित्य नव्हते तर पावित्र्य होते… विद्ववत्तेचे प्रदर्शन नव्हते तर प्रेम होते… नामदेवांचे कीर्तन ऐकून गावोगावचे भक्त वेडेच झाले… तेही स्वतःच अभंग रचून गाऊ लागले! नामदेवराय इतके उदार, की त्यांनी अशा सगळ्यांना कीर्तने करायला उभेच केले! तेव्हापासून महाराष्ट्राला कीर्तनाचे व्यसन लागले, ते गेली 700-750 वर्षे उलटली तरी सुटायचे नाव नाही! असे आहे तरी काय या कीर्तनात?
कीर्तने ऋध्दी,
कीर्तने सिध्दी ।
कीर्तने निरसे
आधि व्याधी ॥1॥
कीर्तने काया कीर्तने माया।
कीर्तने सर्व एके ठाया ॥2॥
द्वंद्ध द्वैत भेद नुरेचि ठाव ।
कीर्तनी तिष्ठे
उभाचि देव ॥3॥
निद्रेमाजी पहा वोसणे देवो ।
म्हणे मज कीर्तनीच
ठावो ॥4॥
एका जनार्दनी कीर्तनासाठी ।
देव धावे भक्तापाठी ॥5॥
करुणामूर्ती शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे. कीर्तनाची काय किमया आहे हे सांगतांना ते म्हणतात, अहो भक्तजनहो, आपण कीर्तनात तल्लीन झालो की आपल्या सर्व आधिव्याधी मावळून गेल्याचा अनुभव घेता येतो. शरीर स्वस्थ होते, मन शांत होते, बुध्दी शुध्द होते, प्राण सतेज होतात आणि आत्मा सुखी होतो. कीर्तनामुळेच ऋद्धी आणि सिध्दी हात जोडून आपल्यापुढे उभ्या राहतात. कारण आपण संपूर्ण सकारात्म झालेले असतो. कीर्तनाने आपला जडदेह म्हणजे कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये व संसारतापाने पोळलेली कायाही कैवल्याचा आनंद घेऊ लागते. ही जी नाना विभ्रम दाखविणारी, प्रतिक्षणी रुपरंगरेखा बदलणारी माया आहे ती पण सुस्थिर होऊन आपल्या आधीन होते. स्थळ काळ, दिशा, गती, भार, मिती, आप, पर अशा सर्व संकल्पना विरघळून जातात व सगळे काही एका पांडुरंगाच्या ठायी दाटून राहिल्याची भावना जागी होते. आपण व इतर सारे हा भेदच मिटल्यानंतर दुराव्याची भावना उरत नाही आणि त्यातून येणारा संघर्षही उद्भवत नाही.
असा एकात्मभाव जिथे उदय पावतो तेथे देवही तिष्ठत उभा राहिल यात काय शंका ? श्रीहरीला त्याचे वैकुण्ठ आहे. तिथे नक्षत्रे जडवलेला त्याचा प्रासादही आहे. त्यात त्याचे शय्यागृह आणि तिथल्या मंचकावर तो निद्राधीन झालेला असतो. अचानक त्याला टाळमृदंगाचा ध्वनी ऐकू येतो. तो झोपेतच म्हणतो की छे.. छे.. या वैकुंठातील हा आराम काही खरा नव्हे अन् बराही नव्हे! मला खरी विश्रांती कीर्तनातच! आणि तो झडझडून उठतो व भक्तांच्या कीर्तनस्थळी धावत सुटतो! जिथे देव, तिथे भुक्ती आणि मुक्ती येणारच की हो!




