नंदन रहाणे
आषाढी एकादशी म्हणजे महासोहळा महाराष्ट्राचा! धर्म व परंपरा यादृष्टीने या तिथीला महत्त्व आहेच… पण संस्कृती व भाषावैभव या अंगानेही या दिवसाची महत्ता मोठीच आहे. आषाढी म्हणजे संतांचे अभंग… म्हणजेच मराठी भाषेचा सर्वव्यापी गजर! पंढरपुरातले फक्त पांडुरंगाचेच राऊळ नव्हे तर तिथली एकूण मंदिरे, मठ, धर्मशाळा, चौक, रस्ते, वाडेहुडे, घरे, झोपड्या आणि चंद्रभागेचे वाळवंट, नदीपात्रातल्या होड्यासुद्धा अभंगांनी भारावलेल्या असतात. मग आळंदी, देहू, पैठण, नरसी, त्र्यंबकेश्वर, सासवड, कोथळी, अरण, तेर, मंगळवेढा, नेवासे, शिऊर, गंगाखेड, आपेगाव अशी संत वास्तव्याने पुनित झालेली गावे घ्या… किंवा मग महाराष्ट्रातली सर्व इतर तीर्थक्षेत्रे, जिल्ह्या-तालुक्यांची ठिकाणे, बाजारपेठांची गावे नाहीतर अगदी लहानुली खेडोपाडी पाहा… सर्वत्र केवळ मराठी भाषेतल्या अभंग रचनाच दुमदुमत असतात. नामदेवांनी शतकोटी अभंग करण्याची प्रतिज्ञा केली होती. अभंग करणे म्हणजे तेवढ्या संख्येत अभंग लिहिणेच असे नाही… तर तेवढ्या संख्येत त्यांची उजळणी करणे असाही अर्थ होऊ शकतो! शतकोटी म्हणजे एक अब्ज… गेल्या 700 वर्षांत किती एकादश्या, किती वार्या, किती सप्ते, किती कीर्तने झाली याचा विचार केल्यास, शतकोटीच काय, शतअब्ज अभंग उजळणी महाराष्ट्राने केलीच असणार!
हे अभंग, त्यांचे गायन, त्यांचे निरूपण, मधूनच होणारे संतांचे जयजयकार हे सगळे आपल्या संस्कृतीचाच भाग होऊन बसले आहे. दोन ओळींचा निरोपही कोणीच कोणाला पाठवत नाही, पण ठरल्या दिवशी हजारो माणसे, उरल्या गावी जमा होतात आणि संतांच्या पालख्यांसोबत पंढरीच्या दिशेने चालू लागतात. पुढ्यातल्या पत्रावळीवर जे पडेल ते खातात. शाळेचे व्हरांडे असोत की मैदानावरची माती… जिथे मिळेल तिथे पाठ टेकतात. हालअपेष्टा सोशीत थेट पंढरपूर पायीपायीच गाठतात. तिथे कोणीच कोणाचा सत्कार करणार नसते किंवा काही मानधनही मिळणार नसते. उलट पंढरपूरला पोचेपर्यंत खिशातली रक्कमही खर्च होऊन गेलेली असते. मग हा सारा खटाटोप, इतका आटापिटा माणसे दरवर्षी का करतात? त्यांच्या पदरात नेमके काय पडत असते?
उदारांचा राणा पंढरीस आहे।
उभारोनी बाहे ।
पालवितो ॥1॥
जाणतियाहूनी नेणत्याची गोडी।
आलिंगी आवडी ।
करुनिया ॥2॥
दुःखाचियासाठी तेथे
मिळे सुख ।
अनाथांची भूक ।
दैन्य जाय ॥3॥
शीण घेऊनिया प्रेम
देतो साटी ।
न विचारी तुटी।
लाभ काही ॥4॥
तुका म्हणे असो अनाथ
दुबळी ।
आम्हांसी तो पाळी ।
पांडुरंग ॥5॥
‘जगद्गुरू’ असा ज्यांचा गौरव उभा महाराष्ट्र गेली 350 वर्षे करतो आहे, त्या देहूच्या वाण्याचा, सावकार महाजनाचा हा अभंग आहे. तुकाराम बोल्होबा आंबिलेमोरे हे त्या महाकवी संताचे नाव. संत शिरोमणी नामदेव महाराजांनी पांडुरंगासह स्वप्नात येऊन त्यांना अभंगरचनेची प्रेरणा दिली आणि मग हा कुणबी संतकवी तर झालाच, पण मराठी काव्यमंदिराचा झळाळता कळसही ठरला! ते तुकोबाराय एकूणच वारी, पंढरी, विठोबा यांचे मर्म या अभंगात उलगडून दाखवत आहेत… या जगात जेवढे काही उदार दानशूर आहेत त्यांचा राजा या पंढरीत उभा आहे. दोन्ही बाहू उंच करून तो भक्तांना आपल्याकडे बोलावत असतो. अतिविद्वान, महाव्यासंगी, वादविवादपटू, वैय्याकरणी, भाषाकोविद अशा मंडळींपेक्षा त्याला भोळ्या भाबड्या, निर्मळ, निरागस जनांची गोडी आहे. त्यांना तो प्रेमभराने आलिंगन देतो. त्यांची दुःखे स्वतःकडे घेऊन तो त्याबदल्यात सर्व सुखे देतो. त्यामुळे अनाथांना पाठीराखा मिळून पोरकेपण संपते व त्यांची तहान-भूक व दैन्यदारिद्य्र यांचा उपशम होतो.
त्याच्यापर्यंत पोचताना जो काही शीणभाग झालेला असतो तो ओसरून, त्याच्या घट्ट दाट प्रेमाचा लाभ सर्वांनाच होतो. या त्याच्या व्यवहार व्यापारात तो नफा-तोट्याचा अजिबातच विचार करत नाही. तुकोबा म्हणतात, आम्ही दीनदुबळे असू, अडाणी, अनगड असू… पण तो पांडुरंगच आम्हाला राखतो, पाळतो यावर आमचा दृढ विश्वास आहे! पंढरीला आषाढीच्या दिवशी एवढे 12-15 लाख लोक गोळा होतात, कारण त्यांना तुकोबांच्या या शब्दांचा अनुभव आलेलाच असतो!




