Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआषाढीची भावदिंडी : भाग २३ - सर्वभावे करी पंढरीची वारी

आषाढीची भावदिंडी : भाग २३ – सर्वभावे करी पंढरीची वारी

नंदन रहाणे

- Advertisement -

‘उपजीविका’ असा एक शब्द बोलण्या लिहिण्यात नेहमी वापरला जातो. ‘टांगा चालवून तो आपली उपजीविका कशीबशी भागवत असे’ किंवा ‘उपजीविकेचे साधन असलेली हातगाडी मोडल्याचे पाहून तो हताशच झाला’ अशी वाक्ये कधीमधी कानावरही पूर्वी पडत होती. जगण्यासाठी पैसा कमावण्याची जी धडपड केली जाते, तिला उपजीविका असे म्हणतात.

YouTube video player

दोन वेळची भूक त्यातून भागते हे खरे… पण मग तिला ‘उप’ हे पद लावून दुय्यमत्व देणे हे खटकणारे नाही का? प्रश्न अगदी मार्मिक आहे, पण त्यातच त्याचे उत्तरही लपलेले आहे! भारतीय तत्त्वज्ञान असे मानते की निव्वळ पोट भरण्यासाठी धडपड करणे हे मनुष्यत्वाचे लक्षण नव्हे… तर ते पशुपक्ष्यांचे जीवन होय! मानवाला हा जो जन्म मिळाला आहे, त्यात त्यांने आपल्या आत्मोन्नतीसाठी झटले पाहिजे व उध्दार करवून घेतला पाहिजे!! तेच खरे त्याच्या आयुष्याचे ध्येय असते आणि तीच त्याची मुळ अन् मुख्य जीविका होय… त्यापुढे बाकी सारे दुय्यम मानावे लागले तरी हरकत नाही!!

हा जो दृष्टिकोन आहे, त्यातून अध्यात्माचा विकास होतो. व्यक्ती ही केवळ स्वत:च्या आणि कुटूंबाच्या भरणपोषणासाठी नाही; तर तिने आपण कोण, आपल्या भोवतीची सृष्टी कशी, तिचा व आपला संबंध काय, या सार्‍याचे सर्जन-विसर्जन घडते त्यामागे कोठले चैतन्य आहे. याचा शोध घेतला पाहिजे अन् आपल्या गरजा व आकांक्षा यांचा उपद्रव इतरांना न होता.

उपकारक पध्दतीने जगले पाहिजे असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. त्यासाठी ज्ञान, कर्म, योग व भक्ती हे मार्गही सुचवते. त्यावरुन जसजसे पुढे जावे तसतसे हे लक्षात येते की, प्रत्येक मार्ग पुढे दुर्घट व क्लिष्ट होत जातो. त्यात यज्ञयाग, व्रतवैकल्ये, पूजा महापूजा, मंत्रतंत्रयंत्र यांचेही स्तोम माजल्याचे अनुभवास येते. त्यात गुरफटल्याने ‘रस’ आटुन जातो व रुक्ष कर्मकांड तेवढे शिल्लक राहाते. म्हणून, मग नामदेवरायांनी वात्सल्यभक्तीची दिशा वारकरी संप्रदायाला दिली. आपण म्हणजे लहान लेकरु व ईश्वर म्हणजे माऊली ही भूमिका घेऊन, साधीसोपी भक्ती सर्वांना शिकवली. संत एकनाथांचे गुरु संत जनार्दनस्वामी हे नेमकी आचारसंहिताच देतात…

सर्वांभूती भाव नको ठेवू दुजा ।
तेणे गरुडध्वजा ।
समाधान ॥1॥
संतांसी नमन आलिया
अन्नदान ।
या परते करण ।
अन्य नाही ॥2॥
सर्वभावे करी पंढरीची वारी ।
आणिक व्यापारी ।
गुंतो नये ॥3॥
म्हणे जनार्दन हाचि घेई बोध ।
सांडोनिया भेद ।
द्वेष सर्वथा ॥4॥

जनार्दनस्वामी हे चाळीसगावचे देशपांडे, निजामशाहीत त्यांना मोठे पदे मिळाले व ते देवगिरी किल्ल्यावर राहू लागले. दत्तभक्त असल्याने त्यांना हिंदु भाविकांमध्ये तर पूज्य मानले जाईच. पण सुफी अवलियांशी स्नेह जमल्याने मुसलमान भक्तही त्यांना सन्मान देत. पैठणचे एकनाथ त्यांच्याकडे शिक्षणासाठी राहिले. गुरु जनार्दन यांनी शिष्याची व्यावहारिक व आध्यात्मिक अशी दोन्ही प्रकारे उत्तम तयारी करवून घेतली. मात्र, आश्चर्य हे की फार मोठा आध्यात्मिक अधिकार असूनही, जनार्दनस्वामींनी वारकर्‍यांच्या आचारधर्माचाच पुरस्कार केला.

सामान्य माणसाला काय पेलवेल, किती झेपेल याचे नेमके भान या थोर संताला होते ते सांगतात : जगतांना आप पर भाव ठेवू नये. जसा आपला आत्मा तसाच इतरांचा असे समजून सर्वांशी प्रेमाने वागावे. त्यामुळे देवाला संतोष वाटतो. संतांना विनम्रपणे नमस्कार करावा आणि दारी आलेल्याला अन्न देऊन त्याची भूक भागवावी यापेक्षा वेगळे काही करण्याची गरजच नाही!

आपल्यासारखे जे कोणी समान आवडीने भेटतील. त्यांच्यासोबत पंढरपूरची वारी करावी. तीच भक्ती म्हणजे काय ते शिकवते. प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे.. आणखी कुठल्याही खटाटोपात गुंतू नये. कारण, बाकीचे सारे व्यर्थ असते. त्यातून काय निष्पन्न होते? तर फक्त शुन्यच! रे भक्तजना, आता भेदवृत्ती आणि द्वेषबुध्दी कायमसाठी टाकून दे व याच साध्या, सोप्या, सरळ, सहज अध्यात्माच्या मार्गाचा बोध घे… बाकी कशाच्याही मागे पळू नकोस, चळू नकोस…

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...