94 वे अ.भा.मराठी साहित्य संमेलन नासिक येथे संपन्न होत आहे. 3 ते 5 डिसेंबर काही वर्षापासून संमेलन ही सतत काही ना काहीतरी कारणाने वादाच्या भोवर्यात सापडत आहे.त्यामुळे ते काही नवीन आहे असे नाही… 87 वे सासवडमध्ये झालेले साहित्य संमेलन राजकीय लोकांचा संमेलनातील वावर, 82 वे महाबळेश्वरचे साहित्य संमेलन अध्यक्षाविना झाले, 89 वे पिंपरी चिंचवड साहित्य संमेलन खर्चामुळे चर्चा झाली.
92 वे यवतमाळ संमेलनाला उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांना आमंत्रण दिले, परत आमंत्रण वापसी प्रकरण झाले. आमंत्रण वापसी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारुन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशींनी राजीनामा दिला. राजीनाम्या मागचे कारण स्पष्टीकरण देताना राजकीय हस्तक्षेप, दबावाचे कारण पुढे आले.
संमेलनाध्यक्ष अरूणा ढेरे यांनी या सर्व घडणार्या गोष्टीवर तत्काळ मतप्रदर्शन करुन आपली भूमिका न मांडल्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांचेवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. संमेलन होणार का नाही? असा सूर उमटला.
93 वे उस्मानाबाद येथे सा.संमेलन झाले. फ्रान्सिस दिब्रुटो यांच्या संमेलनाच्या अध्यक्ष निवडीवरून वाद झाला. त्याही वेळेला उद्घाटक ना.धो.महानोर यांना संमेलन नाला जाऊ नये म्हणून फोन आले. तिथेही तब्येतीचे कारण दाखवून फ्रान्सिस दिब्रुटो यांनी संमेलनातून काढता पाय घेतला व संमेलन सोडले, असे काहीना काही कारणांनी बहुतेक संमेलने वादाच्या भोवर्यात सापडली. अगदी कमानीला नाव देण्यावरूनही वाद झालेत. फोटो ठेवला यावरून वाद झाले.
आताही नाशिकचे संमेलनात गुलजार आणि जावेद अख्तर यांच्या संमेलन उपस्थितीला विरोध नोंदवला गेला. आता संमेलनाचे उद्घाटक म्हणून कादंबरीकार विश्वास पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले, पण त्यांची एकंदरीत शासकीय सेवेतील आणि साहित्यिक कारकीर्द यावर वाद उपस्थित झाले. लस्ट फॉर लालबाग या त्यांच्या लिखाणावर त्यांच्या भावानेच त्याचे लिखाण चोरल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप केला होता. आहे. साहित्यिकांचा विश्वासघात केल्याची बातमी आपण वाचली असेल. त्याबद्दल साहित्यिकांमध्ये आज नाराजी आहे.
या सगळ्या घटना बघितल्यावर सर्वसामान्य लेखक-वाचकाच्या मनात संमेलना बाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. समोर येतात….
संमेलनाध्यक्ष निवड
राजकारणात यश मिळवण्यासाठी काय-काय करावे लागते हे सर्व श्रृत आहे. पण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यासाठीचे राजकारण बघितले तर वाईट अवस्था होती. बहुमानाचे पद मिळवण्यासाठी त्या ज्येष्ठ साहित्यिकाला काय करावे लागते? किती लाचारी पत्करावी लागते, याबरोबरच कोणाच्या आशीर्वादाने कोण अध्यक्ष झाले, यापर्यंतची चर्चा जेव्हा समोर येते तेव्हा साहित्यप्रेमी म्हणून मन व्यथित होते. याच गोष्टीवर प्रकाश टाकणारा लेख प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी लिहून थोडक्यात त्यांना आलेला अनुभव कथन केला होता.
त्यादृष्टीनेच बर्याच वर्षापासूनचा एक प्रश्न होता, तो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडीचा. अध्यक्षाचा बहुमान देतांना एकमताने अध्यक्षाची निवड व्हावी. ही मागणी नेहमीच पुढे होत आली आहे. आता त्या मागणीची पूर्तता झाली आणि एकमताने त्यांची निवड होत आहे. ही एक चांगली घटना समजायला हवी. त्यांची साहित्यसेवा आणि वय याचा संमेलनाध्यक्ष निवड करताना विचार व्हावा. हेही महत्त्वाचे.
संमेलनाचे उद्घाटक आणी प्रमुख पाहुणे
संमेलनाला उद्घाटक कोण असावे हा प्रश्न म्हटला तर तसा खूप अवघड नाही. त्याचे क्षेत्र राजकीय असो वा सामाजिक असो, हे साहित्याचे व्यासपिठ आहे एवढे भान ठेवले तरी खूप झाले. साहित्याविषयी आपले विचार, अपेक्षा त्यातही मराठी साहित्याची चर्चा त्यात प्रामुख्याने अपेक्षित आहे. नाही तर साहित्याच्या व्यासपीठावर येऊन राजकीय आरोप-प्रत्यारोप, करुन विषयांतर करायचे हे काही योग्य नाही.हे आपण काही संमेलनात अनुभवले आहे, नाही असे नाही.त्यामुळे संमेलनाचा बराचवेळ त्यातच जातो आणि संमेलनाध्यांना आपले विचार मांडायला पुरेसा वेळ मिळत नाही.
आतासुद्धा नाशिकच्या संमेलनात संमेलनाध्यक्ष जयंत नारळीकर यांना अर्ध्या तासाचा वेळ देण्यात आला आहे, असे वाचण्यात आले. तसे पाहिले तर संमेलनात अध्यक्षाच्या भाषणाला महत्त्व द्यायला हवे नेमके तेच होत नाही. व्यतिरिक्त वक्तेच जास्त वेळ बोलतात. थोडक्यात राजकीय व्यक्तींना वेळ जास्त दिला जातो व त्यांचा वावर संमेलनाच्या मंचावर अधिक असतो हे नेहमीच बघायला मिळते.
गेल्या काही वर्षांनी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षाची नावे बघितली तर ती राजकीय क्षेत्राची संबंधित व्यक्ती दिसतील अर्थात संमेलनाचा होणारा खर्च लक्षात घेता अशीच व्यक्ती निवडावी लागते. अशा निवडीमुळे त्या त्या व्यक्तीच्या व कार्यकर्त्यांचे प्राबल्य दिसून येते. इचलकरंजीचे साहित्य संमेलन प्रथमता पु.ल.देशपांडे यांनी अशा राजकीय व्यक्तींचे प्राबल्य किंवा वावर याविषयी नाराजी व्यक्त केली होती आणि त्यामुळेच जे काही निर्णय होतात ते स्वागताध्यक्ष यांच्या मर्जीने होत असतात. त्यामुळे साहित्य महामंडळ नाराजी व्यक्त करण्यापलीकडे काही करू शकत नाही थोडक्यात काय तर सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होते. मागील काही साहित्य संमेलन बघितली तर काही विशिष्ट राजकीय नेते हे असतातच.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी ते मान्य करुन वाद होतील, ज्या वक्तव्यामुळे तेढ निर्माण होईल, असे विषयावर बोलणे नक्कीच टाळायला हवेत. आपण उद्घाटक म्हणून कोणाला बोलवायला हवे याचा अचूक निर्णय महामंडळाने घ्यायला हवा. ज्या व्यक्तीला बोलावल्याने वाद निर्माण होणार आहे, मतभेद निर्माण होणार आहे, अशा व्यक्तीला का बोलावले जावे? उगीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली संमेलनाचे मंचावरुन असाहित्यिक विचार मांडणेही योग्य नाही. ते हे व्यासपीठ नाही, हा भागही उद्घाटकाने समजून आपले विचार मांडणे योग्य नाही का? संमेलनाला साजेसा उद्घाटक बघणे हे महामंडळाचे काम आहे आणि जर तो मान मराठीतील ज्येष्ठ लेखकाला मिळाला तर त्यात काय वावगे आहे. यवतमाळच्या संमेलनात लेखिका नयनतारा सहगल यांना बोलावणे कितपत उचित होते हा ही एक प्रश्नच होता. महामंडळ येथे चुकलेच. अशा शब्दात ज्येष्ठ लेखकांनी आपले विचार व्यक्त केले होते.
राजकीय सहभाग
आणि राजकीय हस्तक्षेप
संमेलनाला आर्थिक मदत म्हणून राज्य सरकार 50 लाख रुपयांचे अनुदान देत असते. परंतू आजकाल संमेलनाला प्रचंड प्रमाणावर खर्च केला जातो. पिंपरी-चिंचवड साहित्य संमेलन संमेलनात तर काही कोटिंनी खर्च केल्याचे आकडे प्रसिध्द झाल्याचे आपणास आठवत असेल. साहजिकच खर्चाची बाजू भक्कमपणे सांभाळण्यासाठी निधीची उपलब्धी व्हावी म्हणूनच स्वागताध्यक्ष असाच बघितला जातो की ज्याचे नावाने ते सहज शक्य होईल आणि मग त्या त्या भागातील राजकीय नेता मग तो मंत्री असेल खासदार किंवा त्याच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त असेल त्याचेच नाव येते आणि तिथूनच राजकीय हस्तक्षेप सुरु होतो.साहित्य संमेलनाचे व्यासपीठावर त्या राजकीय नेत्यांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते दिसू लागतात आणि मग त्या यजमान संस्थेला, साहित्य महामंडळाला नाईलाजाने का होईना सहन करणे क्रमप्राप्य होते.सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अवस्था होते.
राजकीय मंडळीनी संमेलनात अवश्य सहभागी व्हावे, ते वाचक रसिक म्हणून. रसिक प्रेक्षकांत बसून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, प्रसंगी होणार्या परिसंवादात सहभाग द्यावा. साहित्य रसिक म्हणून त्यांना हक्कही आहे. ही प्रामाणिक अपेक्षा आहे. कुठलाही राजकीय हस्तक्षेप नको.
भाषण साहित्य संमेलनाचे मंचावर आहे याचे भान ठेवून राजकीय उणे-दुणे न काढता, साहित्यावर, वाचक चळवळ, वाचन समृद्धीसाठी काय करत आहे? काय करायला हवे? त्याचा विचार व्हावा तरुणपिढीने काय वाचावे कुठली साहित्यकृती वाचावी याबाबतीत संमेलनात चर्चा व्हावी तसेच अनेक ठिकाणे वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर चर्चा आणि परिसंवाद करण्याऐवजी ठराविकच विषयावर ते करून सर्व वाचक साहित्यिकांना रसिकांना एकत्र कसे ते ऐकायला मिळतील हे बघायला हवे.
स्वागताध्यक्ष कुठल्याही पक्षाचा असेल. त्यांच्याकडून भाषणाचे पथ्य पाळले गेले पाहिजे. पुस्तकाचे गाव भिलार या धरतीवर प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचे गाव स्थापन करण्याचा विचार संमेलनातून पुढे यावा. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी व संस्कृतीक मंत्र्यांनी असा विचार मांडला होता तो प्रत्यक्षात यावा.
संमेलनातील प्रथा
संमेलनात प्रमुख पाहुणे, राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्या स्वागतासाठी हार, गुच्छ, आदी गोष्टीवर लाखो रूपयांची उधळण होत असते.अगदी प्रेमाखातर पाच गुलाबांचा प्रतिकात्मक गुच्छ दिला तो पुरे असतो. अथवा त्यासोबत एखाद चांगले पुस्तक भेट देऊन स्वागत करता येऊ शकते.
मागील एका संमेलनात अध्यक्षांना पाच लाख, तर माजी अध्यक्षांना एक-एक लाख रुपयांचे मानधन, स्नेहभेट दिल्याचे वाचण्यात आले होते. त्यांचा यथोचित सन्मान केला गेला हे चांगलेच. पण प्रत्येक संमेलनात हे शक्य होईल का? हाही विचार व्हायला हवा. इतर संमेलनापेक्षा आपण किती वेगळेपणानी वरचढ ही भावना इर्षा नको नसावी. आताही नाशिकचे संमेलन हे इतर संमेलनापेक्षा वेगळे असेल असे विचार वाचण्यात आले.
एकूणच आता साहित्य महामंडळानी, उद्घाटक, प्रमुख पाहुणे, याबाबतीत अतिशय योग्य निर्णय घ्यायला हवे आहे. म्हणजे परत परत अशा प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही.
92 वे अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्यावेळी ना.नितीन गडकरी यांनी साहित्य क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप नसावा ही अपेक्षा व्यक्त केली. आता तरी राजकीय नेत्यांनीही काही बोध घ्यावा. तसेच बहिष्कार वगैरे टाकून काहींनी काय साध्य होत नाही साहित्य संमेलन हा तर साहित्यकांसाठी, साहित्य प्रेमींसाठी एक आनंदोत्सवच असतो आणि आहे. तो आनंदातच साजरा व्हावा हीच अपेक्षा आहे. मी तर म्हणेल आपण ज्यांना बहुमान देऊन अध्यक्ष केले. किमान त्यांचे विचार काय आहे हे तर जाणून घ्यायला हवे त्यांना भाषणासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. विचारवंत म्हणून समाज ज्यांच्याकडे बघतो त्यांनी याचा विचार करावा. ज्या संमेलनाला राजकीय नेते संमेलनाला सहकार्य करूनही संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी मंचाच्या समोर येऊन बसतील तेव्हा तेच संमेलन इतर संमेलनापेक्षा वेगळे झाले, असे म्हणता येईल. नाशिकचे साहित्य संमेलन असे होईल, अशी अपेक्षा करावी काय?
– जामनेर, जि.जळगाव.
dilipdeshpande24gmail.com