Sunday, May 3, 2026
HomeराजकीयBaramati By-election : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात

Baramati By-election : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात

बारामती । Baramati

राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा रणसंग्राम आता अधिकच रंगतदार वळणावर येऊन पोहोचला आहे. सतत चर्चेत राहणारे ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले यांनी या निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला असून, त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निर्णयामुळे बारामतीची निवडणूक पुन्हा एकदा राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.

- Advertisement -

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा जागेसाठी ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, स्वतःला ‘शिवछत्रपतींचे वैचारिक वारस’ म्हणवून घेणाऱ्या बिचुकले यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याने सुनेत्रा पवार यांच्यासमोर त्यांनी थेट आव्हान उभे केले आहे. निवडणूक कोणतीही असो, बिचुकले आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ओळखले जातात. यावेळी त्यांनी बारामतीची निवड केल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बिचुकले यांनी त्यांचा निर्धार स्पष्ट केला. बारामती पोटनिवडणूक आपण पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ही निवडणूक लढवण्यामागची नेमकी भूमिका काय आहे आणि त्यांनी अपक्ष अर्ज का भरला, याचे सविस्तर स्पष्टीकरण ते येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत. या परिषदेत ते नेमकी कोणती भूमिका मांडतात, यावर राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.

बारामतीमध्ये ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न काही स्तरांवरून होताना दिसत होता. मात्र, आतापर्यंत तब्बल १२ पेक्षा जास्त उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक होणार हे आता स्पष्ट झाले आहे. बिचुकले यांच्यासह अभिजीत कांबळे, दादा एकनाथ थोरात, संकेत गावडे, अनिल तपे, रझ्जाक मुलाणी, विलास होळकर, संदीप खरात, मिथुन आटोळे, अरुण नितुरे, दत्तात्राय बेडरे, दिलीप अलोनी, त्रिशला कांबळे, गजानन गवळी, रघू घुटूकडे, सागर भिसे आणि सतीश कदम अशा अनेकांनी अर्ज भरले आहेत. उमेदवारांच्या या मोठ्या संख्येमुळे मतदानाची चुरस वाढणार आहे.

दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, नुकताच त्यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंबा मागितल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच त्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाशीही संवाद साधणार असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही कंबर कसली असून, जय पवार यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या नियोजनाचा आढावा घेतला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरकारी पाण्याच्या टँकरवर आता विशेष भरारी पथकांची नजर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खासगी जलस्त्रोत अधिगृहीत करण्याचे अधिकारी त्यात्या तालुक्याच्या तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात 30 पाण्याच्या टँकरद्वारे...