मुंबई | Mumbai
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांनी सह निवडणूक आयुक्त विवेक जोशी आणि सुखबीर सिंग सिंधू यांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मतचोरीसह गंभीर आरोप केले आहेत. या विरोधात येत्या ०६ ऑक्टोबर रोजी दिल्लीत (Delhi) विरोधी पक्षांच्या वतीने मुख्य निवडणूक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी उद्या (दि.०२ ऑक्टोबर) रोजी मुंबईत ‘कॉकरोच जनता पार्टी’कडून (CJP) आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
… तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील
त्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवारी) कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke ) यांनी पत्रकार परिषद घेत सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, उद्यापासून कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु होत असून, देशभरात विविध ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर देखील हे आंदोलन होणार असून,जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, अशी घोषणा दिपके यांनी केली.
ज्ञानेश कुमार हे देशाचे गद्दार
पुढे ते म्हणाले, २०२९ च्या निवडणुकीत ‘जेन झी’ (Gen Z) मतदारांची संख्या सर्वाधिक असणार आहे. त्यांना कसा देश हवा आहे, तसा तो देणे आपली जबाबदारी आहे. लोकशाहीत जनता सरकार ठरवते, पण इथे सरकारच आपले मतदार कोण असावेत हे ठरवत आहे.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे देशाचे गद्दार असून, पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांचे पपेट आहेत, असा घणाघात अभिजित दीपके यांनी केला.
२०२५ ची एसआयआर यादी गोठवावी
पुढे ते म्हणाले, “२०२५ ची जी एसआयआर यादी आहे ती तत्काळ गोठवण्यात यावी.२०२५ किंवा २००५ च्या मतदार यादीच्या आधारेच पुढील निवडणुका घेण्यात याव्यात.निवडणूक आयोगाची कार्यपद्धती ही पूर्णपणे पारदर्शक पाहिजे, अशी मागणीही यावेळी अभिजीत दिपके यांनी केली. तसेच २०२३ पासून वगळण्यात आलेल्या सुमारे १३ कोटी मतदारांच्या हक्कासाठी संपूर्ण देश रस्त्यावर उतरेल”, असा इशाराही त्यांनी दिला.
दिपके आंदोलनावर ठाम अन् फडणवीसांना इशारा
आमच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी मिळो अथवा न मिळो, आंदोलन होणारच असा निर्धार व्यक्त करत दीपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ब्रिटिशांनी गांधीजींच्या आंदोलनाला परवानगी दिली नसती, तरीही त्यांनी लढा दिला. शिवाजी पार्कवर फडणवीस रॅली काढू शकतात, मग आम्हाला तिथे आंदोलन करायला परवानगी का नाही? मला ३ दिवस नाही तर ३ महिने जेलमध्ये ठेवा, मी बाहेर येऊन पुन्हा रस्त्यावर उतरून संघर्ष करेन, असा इशारा त्यांनी दिला.
आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत दिपके काय म्हणाले?
- उद्यापासून मुंबईत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू
- मुंबईनंतर देशभरात आंदोलनाचे सत्र चालवून दिल्लीतील जंतर-मंतरवर बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल.
- विरोधी पक्षांच्या ४ ऑक्टोबरच्या आंदोलनाला आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांचा पाठिंबा असून, या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून सहभागी होतील.
- ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होईपर्यंत आणि निवडणूक आयोगाची कार्यपद्धती पूर्णपणे पारदर्शक होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील.




