Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यापिकांनी टाकली मान!

पिकांनी टाकली मान!

नाशिक । राजेंद्र जाधव Nashik

नाशिक जिल्ह्यात यावर्षी थोड्या प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकर्‍यांनी पिकांची पेरणी केली मात्र काही शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाने जिल्हाभरात समाधानकारक हजेरी लावली नाही.

- Advertisement -

पावसाचा ऑगस्ट महिना संपुन सप्टेंबर सुरू झाला मात्र अजूनही पाऊस न पडल्याने कशी तरी तग धरून असलेल्या उरल्या-सुरल्या पिकांनीही मान टाकली आहे. आता पाऊस झाला तरी गेलेली पिके आता उभी राहणार नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. खरिपासाठी केलेला खर्च वाया गेला असून शेतकर्‍याच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आणखी वाढला आहे. सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून ठोस मदत करावी अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

येवला, मनमाड, नांदगाव, देवळा, बागलाण, चांदवड, निफाड, मालेगाव इत्यादी परिसरात समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकर्‍यांवर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. अनेक ठिकाणी तर मका, सोयाबीन, बाजरी, लाल कांद्याचे रोपे तर काहींनी लागवड केलेला लाल कांदा देखील जळून खाक झाला आहे. तर चांदवड तालुक्यासह अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी टोमॅटो पिकाला सुरूवातीला चांगला भाव मिळत होता त्या आशेवर अनेक शेतकर्‍यांनी टँकरने पाणी आणून टोमॅटो जगविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तर अनेकांनी लाल कांद्याचे रोप अक्षरश: औषध फवारणीच्या पंपाने पाणी मारून आतापर्यंत रोपे जगविली मात्र ते देखील आता जळून गेले आहे.

यावर्षी उन्हाळ कांदा लवकर सडून मोठे नुकसान झाले त्यातून उरला-सुरल्या कांद्याला भाव मिळून जगण्यासाठी आधार होईल अशी आशा असताना उन्हाळ कांद्याचे भाव गडगडले. त्यापाठोपाठ मिरची, कोथिंबिर, शिमला, टोमॅटोचे भाव पडल्याने शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. काहींनी पाऊस पडण्याच्या आशेवर स्प्रिंक्लरने पाणी फवारणी करत आठवड्यापूर्वी लागवड केलेला लाल कांदा देखील पाणी संपल्याने जळाला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनावरांना देखील पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.

आता सरकारकडूनच मदतीची अपेक्षा

यावर्षी अत्यल्प पावसावर आतापर्यंत तग धरून असलेली पिके जळून गेली असल्यामुळे आता पाऊस झाला तरी गेलेली पिका पुन्हा उभी राहणार नसल्याने शेतीासाठी मशागत, बियाणे, खते, औषधे, मजुर यांचा खर्च वाया गेला. सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून शेतकरी वर्गासाठी केवळ घोषणा न करता ठोस मदत केली तरच शेतकरी काहीसा सावरू शकेल.

अनिल बोराडे, अनकाई, येवला

टोमॅटोकडूनही निराशा

यावर्षी समाधानारक पाऊस न झाल्यामुळे कुठलेही पिके व्यवस्थित राहीली नाही. उन्हाळ कांद्याचे काही प्रमाणात वाढले दर देखील सरकारच्या धोरणामुळे कोसळले. दोन महिन्यापूर्वी अत्यंत कमी शेतकर्‍यांच्या टोमॅटोला यावर्षी उच्चांकी दर मिळाला. मात्र जिल्ह्यातील टोमॅटोला सुरू होताच त्याचे देखील भाव 5 हजारावरून 300 रुपयांपर्यंत कोसळल्याने शेतकर्‍यांची पदरी मोठी निराशा पडली आहे.

संजय जाधव, शिरसाणे, चांदवड

लाल कांद्याचे क्षेत्र घटणार

जिल्ह्यात सुरूवातीपासूनच समाधानकारक पाऊस नसल्याने अनेक शेतकर्‍यांना लाल कांद्याचे रोपे टाकता आली नाही काहींनी टँकरने पाणी आणून रोपे जगविली मात्र अनेकांचे रोपे देखील जळून गेली आहेत. दरवर्षी आतापर्यंत लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली असते. मात्र यंदा अजूनही पाऊस न झाल्याने विहीरी कोरड्या आहेत. आता पाऊस झाला तरी अनेकांना रोपाअभावी लाल कांदे लावता येणे शक्य होणार नसल्याने यावर्षी कांद्याचे क्षेत्र घटणार आहे.

टंँकरची संख्या 68

ऑगस्टमध्ये त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण तालुक्यातील डोंगराळ भागात झालेल्या पावसामुळे या तालुक्यातील किमान पिण्याचा पाण्याचा प्रश्न तरी सुटला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या तालुक्यातील टँकर्स बंद आहे. याशिवाय दिंडोरी, निफाड तालुक्यातील टँकरमुक्त आहेत. सध्या जिल्ह्यातील नांदगाव 18, येवला 16, चांदवड बारा, मालेगाव बारा, देवळा पाच, बागलाण पाच अशी तालुकानिहाय टँकरची संख्या आहे.

नाशिकवरही पाणी संकट

ग्रामीण भागापाठोपाठ आता नाशिक शहरावरही टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. सध्या गंगापूर धरणात 611 मीटरपर्यंत पातळी स्थिरावली आहे. राज्य सरकारच्या मेंढीगिरी समितीच्या समन्यायी पाणीवाटप धोरणात जायकवाडी धरण 65 टक्के न भरल्यास गंगापूर, दारणा, मुळा, प्रवरा, पालखेड, आळंदी व निळवंडे या धरणांतून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांना दिवाळीपासूनच पाणीकपातीला सामोरे जावे लागेल.त्यामुळे वरच्या धरणांमधून आता खालच्या धरणांमध्ये पाणी सोडले जाण्याची शक्यता असल्यामुळे शहरावर पाणीकपातीचे संकट घोंघावत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या