मुंबई | Mumbai
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत छावा चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ऐतिहासिक चित्रपट संभाजी महाराजांच्या शौर्याचे चित्रण करत असून तरुण पिढीला प्रेरणा देत आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही चित्रपटाचे कौतुक करण्यात येत आहे. मात्र अशातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वादग्रस्त विधान केले आहे. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती, त्यांच्या या वक्तव्यावरुन वादंग निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता अधिवेशनात नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
औरंगजेबाच्या राजवटीत भारताचा जीडीपी २४ टक्के इतका होता. त्यामुळेच इंग्रज भारतात आले, असे अबू आझमी यांनी म्हटले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई धार्मिक नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील लढाई ही राजकीय होती, असा दावा ही त्यांनी केला आहे.
यावेळी अबू आझमी यांना औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ज्याप्रकारे मारले, ती कृती योग्य होती का, असा सवालही विचारण्यात आला. मात्र, अबू आझमी या प्रश्नाचे उत्तर न देता तेथून निघून गेले. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. भाजपचे आमदार राम कदम यांनी याबाबत भाष्य केले आहे. अबू आझमी यांना इतिहास माहिती नाही. त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे. उद्या ते सभागृहात येतील तेव्हा मी त्यांना इतिहासाचे पुस्तक देणार आहे, असे राम कदम यांनी म्हटले. औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना कशाप्रकारे कैदेत ठेवले, त्यांचा कशाप्रकारे अनन्वित छळ केला, हे अबू आझमी यांना माहिती नाही का, असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
‘अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले आहे. हा महाराजांचा अपमान आहे. अबू आझमी यांनी जे काही म्हटलेय ते महाराजांविरुद्ध आहे. त्यांच्यावर खटला चालायला हवा. पण तो कधी चालणार? कारण इथे भाजप सरकार आहे, असे ठाकरे म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा