Tuesday, May 21, 2024
Homeनगरअल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी आरोपी हिरामण संभा तिखोले (वय 52 रा. वडगाव सावताळ ता. पारनेर) याला 20 वर्ष सक्तमजुरी व 25 हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी ठोठावली. अ‍ॅड. पुष्पा कापसे -गायके यांनी सरकार तर्फे काम पाहिले.

- Advertisement -

अल्पवयीन मुलगी ही शेतात गेली होती. त्या ठिकाणी हिरामण संभा तिखोलेने तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन अत्याचार केला. त्यानंतर हिरामणने पीडितेस धमकी दिली की,‘कोणास काही सांगावयाचे नाही’. त्यानंतर देखील हिरामणने पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला. त्यामुळे पीडिताही त्याच्यापासून गर्भवती राहिली. तिची आईने तिला रूग्णालयात नेले. तेथे तपासणी केली असता ती अडीच महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेला पुणे येथील ससून रूग्णालयात दाखल केले.

18 जानेवारी 2021 रोजी बंडगार्डन (पुणे) पोलीस ठाण्यात पीडिताच्या आईने फिर्याद दिली. सदर गुन्हा पारनेर पोलीस ठाण्यात वर्ग झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पुढील तपास करून भारतीय दंड संहिता व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे नुसार न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार तर्फे एकुण आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या.

त्यामध्ये वैद्यकिय अधिकार्‍यांची साक्ष, डी. एन. ए. अहवाल ग्राह्य धरून न्यायालयाने हिरामण तिखोले यास विविध कलमान्वये 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा 25 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास दोन वर्ष साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास साठे तसेच महिला पोलीस अंमलदार थागोडे यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहाय्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या