बाभूळखेडा शिवारात गोंडेगाव रोडवरील घटना
सलाबतपूर (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर ते गोंडेगाव रस्त्यावर बाभूळखेडा शिवारात ऊस वाहतूक करणार्या डबल ट्रॉली ट्रॅक्टरने धडक दिल्याने मुलगी जागीच ठार झाल्याची घटना घडली असून घटनेनंतर ट्रॅक्टरचालक पसार झाला. या अपघाताबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, काल शनिवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास सलाबतपूर-गोंडेगाव रस्त्यावर बाभूळखेडा शिवारात औताडे वस्तीनजीक इयत्ता तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी कु. विद्या राजेंद्र औताडे (वय 10) ही रस्त्यावरून आपल्या आजीकडे जात होती. सलाबतपूरकडून भेंड्याकडे जणार्या ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टरने या मुलीला धडक दिली. मुलगी ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने जागीच गतप्राण झाली. जवळच असलेल्या लोकांच्या ही बाब लक्षात येताच. त्यांनी ट्रॅक्टरला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालक ट्रॅक्टर सोडून पळून गेला.
अपघातग्रस्त ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. घटनेनंतर मुलीला लगेच रुग्णवाहिकेतून नेवासाफाटा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी तिला मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकार्यांच्या खबरीवरुन नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
सध्या तालुक्यातील कारखान्यांचे गाळप हंगाम सुरु असून बहुतेक ऊस ट्रॅक्टरद्वारेच वाहून नेला जातो. मात्र ट्रॅक्टरला डबल ट्रॉलीची परवानगी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सलाबतपूर व परिसरातून ट्रॅक्टरने मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक केली जात आहे. मात्र ट्रॅक्टरचालक सर्रासपणे बेकायदेशीर ट्रॅक्टरवर टेपरेकॉर्डरवर मोठ्या आवाजात गाणी लावून ट्रॅक्टर चालवत असतात. त्यामुळे कायमच इतर वाहनांच्या चालकांना याचा त्रास सहन करावा लागत असतो. अशा बेशिस्त ट्रॅक्टरचालकांवर कारवाई होईल का? आणि ती कोण करणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
15 दिवसांतील दुसरा बळी
ऊस वाहतूक करणार्या डबल ट्रॉली ट्रॅक्टरमुळे बळी जाण्याची नेवासा तालुक्यातील 15 दिवसातील ही दुसरी घटना आहे. 14 डिसेंबरला देवगाव-भेंडा रोडवर देवगाव येथील नामदेव आगळे या ज्येष्ठ नागरिकाचा ट्रॅक्टर धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतर विद्या औताडे या चिमुरडीचा बळी जाण्याची काल दुसरी घटना घडली.