नेवासा फाटा |प्रतिनिधी| Newasa
शेतात ऊस तोडणी यंत्राच्या (हार्वेस्टर) मागे शेतकरी उसाची टिपरे गोळा करत असताना हार्वेस्टरचालकाने हार्वेस्टर रिव्हर्स घेतल्याने अंगावरुन चाक गेल्याने शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथे घडली.
नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब तुकाराम जगताप (वय 50) यांचे उसाला भाऊबीजेच्या दिवशी कारखान्याची हार्वेस्टरच्या साह्याने तोड आली होती, यावेळी हार्वेस्टर सुरू असताना पडलेले उसाचे तुकडे स्वतः गोळा करून ट्रॉलीमध्ये टाकत असताना अचानक हार्वेस्टरने रिव्हर्स घेतला. त्यामध्ये आवाज आणि मशिनच्या उंचीमुळे हार्वेस्टर चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे उसाच्या खोडामध्ये गुंतून शेतकरी चाकाखाली आले. त्यांच्या छातीवरून चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आजूबाजूचे कामगार यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी तातडीने धावपळ केली व नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. तामसवाडी येथे शोककुल वातावरणामध्ये त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.
अतिशय कष्टाळू आणि सर्वांशी मनमिळावू स्वभाव असलेले मोठ्या कुटुंबातील शेतकरी बाळासाहेब जगताप यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. मुळा कारखान्याचे संचालक अंबादास बाबासाहेब जगताप यांचे बंधू तसेच नेवासा फाट्यावरील उद्योजक देवीदास जगताप यांचे चुलते होते.