चार गंभीर : संगमनेर येथे रस्त्याच्या जॉईंटवर आदळून कार पलटी
संगमनेर (प्रतिनिधी)- भरधाव वेगात असलेली कार पुलावरील रस्त्याच्या जॉईंटवर आदळून पलटी झाली. या अपघातात एका चिमुकलीसह महिला जागीच ठार झाली तर चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.
गीताली दिलीप दरंदले (वय 35 रा. बुरुडगाव रोड, अहमदनगर), शमिका जितेंद्र जगदाळे (वय 4) अशी मयतांची नावे असून प्रिन्सेस दिलीप दरंदले (वय 11), इशिका मनोज भेकरे (वय 5), दीपाली जितेंद्र जगदाळे, संगिता दिलीप सोनवणे जखमी आहेत. सर्वजण पुण्याहून नाशिक येथे संगमनेरमार्गे मारुती वॅगनार कार (क्रमांक एम.एच. 16 बी. एच. 3182) मधून प्रवास करत होते. दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर बाह्यवळणावर असलेल्या प्रवरा नदीच्या पुलावरील जॉईंटवर कार आदळली.
कारच्या पाठीमागील चाक निखळून कार पलटी झाली. कारने दोन पलटी मारल्याने कारमधील चालक गीताली दरंदले व शमिका जगदाळे या जागीच ठार झाल्या. तर अन्य चारजणी जखमी झाल्या. अपघाताची खबर मिळताच पोलीस निरीक्षक अभय परमार हे सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
याबाबत मयत गीताली दरंदले हिचा भाऊ मनोज शांताराम भेकरे (रा. खराडी ता. हवेली, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मयत गीताली दरंदले हिच्या विरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 746/19 नुसार भारतीय दंड संहिता 304 अ, 279, 337, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील करत आहेत.