नवी दिल्ली | New Delhi
छत्तीसगडची (Chhattisgarh) राजधानी रायपूरमध्ये (Raipur) चौथिया छट्टीच्या कार्यक्रमावरून परत येताना रायपूर-बालोदाबाजार महामार्गावर खरोराजवळ ट्रक आणि ट्रेलरमध्ये जोरदार टक्कर होऊन आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील १३ जणांचा मृत्यू (Death) झाला असून, १२ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चटौद गावातील (Village) सुमारे ५० लोक स्वराज माझदा गाडीने खरोरा येथील बाणा बनारसी येथे छठीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी रायपुर-बलौदाबाजार रस्त्यावरील सारागांवजवळ त्यांच्या ट्रेलरची ट्रकशी जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत १३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १२ जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. तसेच गंभीर जखमींना उपचारासाठी रायपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, रायपुरचे जिल्हाधिकारी गौरव कुमार सिंह यांनी सांगितले की, “रविवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास अपघाताची माहिती स्थानिक आमदारांमार्फत मिळाली. यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. तसेच जखमींच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत केली जात असून, आवश्यकता भासल्यास अतिरिक्त सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. तर पोलिसांनी प्राथमिक तपासात ट्रक आणि ट्रेलरच्या चालकांच्या जबाबाची नोंद घेतली आहे, असे त्यांनी म्हटले.