Saturday, July 27, 2024
Homeनगरअपघातात व्यापारी कुंदनमल सुराणा जागीच ठार

अपघातात व्यापारी कुंदनमल सुराणा जागीच ठार

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरातील बस स्थानकासमोर नगर-मनमाड राज्य महामार्गावर काल 18 मे रोजी सायंकाळी झालेल्या दुचाकी व कंटेनरच्या अपघातात शहरातील प्रतिष्ठित व्यापारी कुंदनमल सुराणा हे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
राहुरी नगरपरिषदचे माजी नगरसेवक तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यापारी कुंदनमल माणकचंद सुराणा (वय 73) रा. गोकुळ कॉलनी हे सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान शहरातून नगर-मनमाड रस्त्याने त्यांच्या घराकडे दुचाकीवर जात असताना राहुरी बसस्थानकासमोर अपघात होऊन एका कंटनेरच्या चाकाखाली ते सापडले. कंटेनरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कंटेनर ताब्यात घेऊन मृतदेह रुग्णालयात नेला व वाहतूक सुरळीत केली.

- Advertisement -

राहुरी बसस्थानकासमोर नगर-मनमाड राज्य महामार्गावर सिग्नल व गतिविरोधक नसल्याने या भागात कायमच अपघात होत असतात. राहुरी बसस्थानकासमोर राज्य महामार्गावर तातडीने गतिरोधक व सिग्नल बसविण्यात यावे, अन्यथा व्यापारी असोसिएशनच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रकाश पारख यांनी दिला आहे. राहुरी शहरातून जाणार्‍या नगर-मनमाड महामार्गावर गाडगे महाराज आश्रम शाळा ते जुने बसस्थानका दरम्यान प्रशासनाच्या दुर्लक्षांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून या परिसरात वाहतूकीची कोंडी नित्याचीच झाली असल्याने नागरिकांना व वाहन चालकांनी याचा मोठा मनस्ताप होत आहे. राहुरी शहरातील नगर- मनमाड मार्गावर मल्हारवाडी चौक, बाजार समिती, जुने बसस्थानक या ठिकाणाहून नागरिक रस्ता पार करत असतात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सिग्नल नसल्याने नागरिकांना शाळकरी मुलांना रस्ता पार करताना आपला जीव धोक्यात घालावा लागतो.

तसेच रस्ता पार करण्यासाठी बराच वेळ ताटकळत उभे रहावे लागत आहे. त्याच प्रमाणे येथे पोलीस प्रशासनाचा वाहतूक नियंत्रक नसल्यामुळे काही वाहन चालक बेजबाबदारपणे वाहने रस्त्यावर थांबवून वाहतुकीची कोंडी निर्माण करीत आहे. तसेच गाडगे महाराज आश्रम शाळा ते जुने बसस्थानका दरम्यान या महामार्गावर दोन्ही बाजूस अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असून आपल्या दुकानाचे फलक ते थेट महामार्गावर आणून ठेवले आहे. त्यामुळे येणार्‍या-जाणार्‍यांना या फलकांचा अडथळा निर्माण होत असून काही व्यावसायिक तर आपला माल थेट रस्त्यावर विक्रीसाठी ठेऊन त्यासमोर दगडे ठेवले आहे.

तर काहींनी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशी शेड तयार करून रस्त्यावरच दुकाने थाटली आहेे. अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने हे रस्त्याच्या कडेला उभी राहत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.
प्रशासनाने ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गाडगे महाराज आश्रम शाळा ते राहुरी जुने बसस्थानक दरम्यानच्या व्यावसायिकांनी महामार्गावर केलेले अतिक्रमण तात्काळ हटवावे व अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांना शिस्त लावावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. अपघातात ठार झालेल्या कुंदनमल सुराणा यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे, तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या