अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
दिवसेंदिवस रस्त्यावर होणार्या अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. हे वाढते अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी वाहनचालकांच्या जनजागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे.
त्यानुसार वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे धडे देत वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्याचा उपक्रम महामार्ग पोलिसांकडून राबविण्यात येत आहे. नुकतेच येथील सहायक महामार्ग पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी यांनी वाहनांना रिफ्लेक्टर लावून मोहिमेस सुरुवात केली.
वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या सूचनेनुसार व पुणे महामार्ग पोलीस विभागाचे प्रभारी अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे गिरी यांनी सांगितले.
महामार्गांवर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याने गिरी यांच्या पथकाने नगर-पुणे महामार्गावर वाहनचालकांचे वाहतूक नियम पाळण्याबाबत प्रबोधन केले.
महामार्गावर प्रवास करत असताना वाहनांवर रिफ्लेक्टरचा वापर करणे, महामार्गावर वाहने उभी न करणे, वाहनांचा वेग मर्यादित ठेवणे, अवजड वाहनचालकांनी डाव्या बाजूनेच वाहन चालवणे, वाहनाच्या पाठीमागे रिफ्लेक्टर बसवणे यासारख्या अनेक वाहतूक नियमांचे धडे गिरी यांनी वाहनचालकांना दिले.
वाहनचालकांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास वाढते अपघात निश्चितच कमी होतील, असा विश्वास गिरी यांनी व्यक्त केला. दंडात्मक कारवाई न करता वाहतूक नियमांबाबत महामार्ग पोलिसांकडून करण्यात येणार्या या प्रबोधन उपक्रमाचे वाहन चालकांनी स्वागत केले आहे. वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालविणार्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यात स्पीडगन मोटारी देण्यात आल्या असून वेगाने वाहने चालविणार्यांना 1 हजार रुपयांचा दंड करण्यात येत आहे.