मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
मुंबई-आग्रा महामार्गावर तसेच मालेगाव-मनमाड रोडवर आज झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये येवला येथील दोघा विक्रेत्यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे.
यो अपघाताचे समजलेले वृत्त असे की, येवला येथील मोहंमद हसन मोहंमद युसूफ (४९) व उत्तर प्रदेशातील मात्र सध्या व्यवसायानिमित्त येवला येथे स्थायिक असलेल्या जहीरूद्दीन मोहंमद अमीन (४५) हे दोघे मालेगावी नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. भेट घेवून परत दुचाकीवरून येवला येथे जात असतांना मालेगाव-वर्हाणे दरम्यान त्यांना भरधाव वेगाने येत असलेल्या टेम्पो क्र. एम.एच.-१४-एम.टी.-८०१५ ने समोरून दुचाकीस धडक दिल्याने दोघे फेकले जावून डोक्यास गंभीर मार लागल्याने ते जागीच गतप्राण झाले. सकाळी ८ ते ९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघा मृतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता ते येवला येथील असल्याचे निष्पन्न झाले.
मनमाड रोडवर गत काही महिन्यांपासून अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था देखील झाली असल्याने वाहतूक कोंडी होण्यासह अपघातांच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली असल्याने या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे केली गेली.
दरम्यान, अज्ञात वाहनाने मुंबई-आग्रा महामार्गावर धडक दिल्याने म्हाळदे घरकुल योजनेत वास्तव्यास असलेला हाशिम खान यासीन खान (२५) हा तरूण गंभीररित्या जखमी होवून जागीच गतप्राण झाला. बुधवारी रात्री ही घटना घडली.




