अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत युवतीचा मृत्यू झाला असून तिचे वडिल जखमी झाले आहेत. अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर सैन्य दलाच्या सीक्यूएव्ही गेटसमोर रविवारी (11 मे) सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान हा अपघात झाला.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जानवी विश्वनाथ शेळके (वय 20 रा. गुलमोहर रस्ता, सावेडी, अहिल्यानगर) असे मयत युवतीचे नाव असून तिचे वडिल विश्वनाथ शेळके जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. विश्वनाथ शेळके व मुलगी जानवी हे अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून दुचाकीने प्रवास करत असताना त्यांच्या दुचाकीला टँकरने धडक दिली.
या धडकेत जानवीचा मृत्यू झाला तर विश्वनाथ जखमी झाले. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकर ताब्यात घेतला. सदरचा टँकर अमोल बबन बोखारे (रा. समर्थनगर, केडगाव रस्ता, अहिल्यानगर) हा चालवित असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी करीत आहेत.