अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील दिल्ली गेट (Delhi Gate) परिसरात बुधवारी (16 जुलै) सकाळी घडलेल्या दुर्दैवी अपघातात (Accident) एका तरूणाचा मृत्यू (Youth Death) झाला. प्रकाश नाना अवचर (वय 35 रा. दातरंगे मळा) असे मयत तरूणाचे नाव आहे. हा अपघात (Accident) सिटी बस स्टॉपजवळ घडला आहे. प्रकाश अवचर हे मजुरीचे काम करत होते. बुधवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास दिल्ली गेट परिसरात रस्त्यावरून जात असताना त्यांना डंपरने (एमएच 16 सीसी 8244) धडक दिली.
डंपरच्या (Dumper) चाकाखाली सापडल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेले प्रकाश यांचे मेव्हणे राजकिरण कुमार पटेकर (रा. गौतमनगर, नीलक्रांती चौक, बालिकाश्रम रस्ता) यांनी ही माहिती तत्काळ नातेवाईकांना दिली व घटनास्थळी बोलावून घेतले आणि प्रकाश यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारांपूर्वीच मृत घोषित केले.
अपघातानंतर घटनास्थळी उभ्या असलेल्या डंपरच्या (Dumper) चालकाने वाहन तेथेच सोडले व घटनास्थळावरून पळ काढला. तो तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) हजर झाला होता. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर डंपर चालकाचे नाव ऋषी बैस असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यासंदर्भात राजकिरण पटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालक ऋषी बैस (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.





