राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
आजोबांचा अंत्यविधी करुन मोटारसायकलवर घरी जात असलेल्या चैतन्य भांड या 20 वर्षीय तरुणाचा अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राहुरी तालुक्यातील लाख येथे काल दि. 24 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली.
चैतन्य राजेंद्र भांड (वय 20 रा. लाडगाव ता. श्रीरामपूर) या तरुणाच्या आईचे वडील म्हणजे आजोबा राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथे राहत होते. ते दि. 23 एप्रिल रोजी मयत झाले होते. चैतन्य भांड हा आजोबांच्या अंत्यविधीसाठी टाकळीमियॉ येथे आला होता.
काल दि. 24 एप्रिल रोजी दुपारी चैतन्य भांड हा दुचाकीवरून टाकळीमियॉ येथून त्याच्या घरी लाडगाव येथे जात होता. दरम्यान राहुरी तालुक्यातील लाख परिसरात त्याच्या मोटारसायकलचा अपघात होऊन तो रस्त्याच्या कडेला असलेल्या साईड गटारात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. रुग्णवाहिकेतून स्थानिक नागरिकांच्या मदतीने चैतन्य भांड याला राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला तपासून उपचारा पूर्वीच मयत घोषित केले.
घटने नंतर चैतन्य भांड याच्या नातेवाईकांनी राहुरी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. या घटने बाबत सायंकाळी उशीरा पर्यंत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. चैतन्य भांड याचा अपघात नेमका कसा झाला हे मात्र समजू शकले नाही.