भोकर |वार्ताहर| Bhokar
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला असून त्यास उपचाराकरिता लोणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
भोकर येथील राहुल मधुकर वाकडे (वय-27) हा तरुण त्यांचे वडील मधुकर वाकडे यांना मुंबई येथे जाण्यासाठी श्रीरामपूर रेल्वेस्टेशन येथे सोडून रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एकटाच श्रीरामपूर- नेवासा राज्यमार्गाने मोटार सायकल क्र.एम. एच. 17 बी. बी .6302 वरून घरी भोकर येथे येत होता. भोकर शिवारातील डॅमचा नाल्याजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत राहुल हा गंभीर जखमी झाला. काही प्रत्यक्षदर्शींचे सांगण्यानुसार राहुल यास पिकअप गाडीने धडक देऊन ते वाहन पसार झाले आहे.
या अपघातात त्याचा उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे, त्याचबरोबर त्याच्या पोटाला व छातीला जोराचा मार लागला. तर त्याचेकडे असलेल्या मोटारसायकलचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात घडल्याचे समजताच येथील जगदंबा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश छल्लारे, लक्ष्मीमाता मिल्कचे सुरेश चिडे, पप्पू थोरात, सागर अमोलीक, आप्पासाहेब जाधव, संजय जाधव, संजय निंबाळकर, सोमनाथ छल्लारे यांनी लागलीच रुग्णवाहिका पाचारण करत जखमी राहुल यास साखर कामगार हॉस्पीटल येथे उपचारासाठी रवाना केले. राहुल यास श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने त्यास काल सायंकाळी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.