Saturday, November 2, 2024
Homeशब्दगंधकाय सांगतो अहवाल?

काय सांगतो अहवाल?

आरोग्य परिस्थितीचे अचूक निदान करणार्‍या आणि तातडीने उपाययोजना हाच समाजसेवेचा कणा मानणार्‍या ‘लॅन्सेट’ या संस्थेच्या अहवालानुसार 140 कोटींच्या भारतात 11 टक्के जनता मधुमेहग्रस्त तर 35 टक्के रक्तदाबाच्या त्रासाने ग्रस्त आहेत. 28 टक्के जनतेला स्थूलत्वाची समस्या भेडसावते आहे, तर सुमारे 40 टक्के जनतेच्या पोटाचा घेर अत्यंत चिंताजनक आहे. हा अहवाल आपण गांभीर्याने घेणार आहोत का?

‘लॅन्सेट’चा ताजा आरोग्य पाहणी अहवाल चर्चेचा विषय ठरण्याची गरज आहे. हा अहवाल भारताबद्दल आहे आणि त्यातील आकडेवारी चिंताजनक आहे. 140 कोटींच्या या देशात 11 टक्के जनता मधुमेहग्रस्त तर 35 टक्के रक्तदाबाच्या त्रासाने ग्रस्त आहेत. 28 टक्के जनतेला स्थूलत्वाची समस्या भेडसावते आहे तर जवळपास 40 टक्के जनतेच्या पोटाचा घेर अत्यंत चिंताजनक आहे. ‘लॅन्सेट’ ही एक वैद्यकीय संशोधन प्रसिद्ध करणारी संस्था आहे. या ऑक्टोबरमध्ये या संस्थेला तब्बल 200 वर्षे पूर्ण होणार आहेत. थॉमस वॉकले या संशोधकाने तिची स्थापना केली आणि आजवर आपल्या विविध अहवालांमधून या संस्थेने देशोदेशीचे सार्वजनिक आरोग्य, साथीचे रोग यावर अत्यंत अमूल्य असे संशोधन केले आहे. त्याचा उपयोग जगभरातील धोरणकर्त्यांना, वैद्यकीय संघटनांना त्यांचे धोरण आखून परिणामकारक उपाययोजना राबवण्याकरता झाला आहे. इतका दीर्घकाळ चाललेली आणि सातत्याने गुणवत्तापूर्ण संशोधन करणारी स्वतंत्र अशी दुसरी संस्था जवळपासदेखील दिसत नाही, हे लॅन्सेटचे वैशिष्ट्य. आरोग्य परिस्थितीचे अचूक निदान, रुग्ण आणि औषधोपचाराने त्यावर तातडीने उपाययोजना हाच समाजसेवेचा कणा मानून ही संस्था गेली दोन शतके कार्यरत आहे. समाजोपयोगी संशोधन करत आहे. 200 वर्षे इतका प्रदीर्घ काळ सचोटीने आपली गुणवत्ता आणि सातत्य टिकवून ठेवणे सोपे नाही. संस्थेचा पसारा खूप मोठा आहे. तिथे प्रसिद्ध होणार्‍या नियतकालीक अहवालांच्या जंत्रीवर नजर टाकली तर हे सहज लक्षात येईल.

- Advertisement -

लहान मुलांचे आरोग्यविषयक प्रश्न, पौगंडावस्थेतील मुलांचे आरोग्य, मधुमेह आणि एंडोक्रोनॉलॉजी, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी आणि हिमॅटोलॉजी, ग्लोबल हेल्थ, एचआयव्ही, साथीचे रोग, कर्करोग, मानसिक रोग, वृद्धांचे आजार, दक्षिण अमेरिका-युरोप-दक्षिण पूर्व आशिया-पश्चिम पॅसिफिक देश यातील सार्वजनिक आरोग्य, आफ्रिकेतील सार्वजनिक आरोग्य, बायोमेडिसीन, न्यूक्लियर मेडिसीन, श्वसनाचे रोग इत्यादी विषयांवर ही संस्था माहिती देते. संस्थेच्या संपादकीय धोरणात पारदर्शकता आहे आणि ती स्वच्छपणे मांडली आहे. संस्था वारंवार आपले संशोधन प्रकाशित करण्याआधी समव्यावसायिक तज्ज्ञांकडून ते संधोधन तपासून पाहते. गुणवत्ता आणि विश्वासार्हता अत्यंत काटेकोरपणे पाळली जाते. या सर्वामुळे संथेच्या संशोधनाला जागतिक मान्यता असून त्याचे पडसाद सातत्याने उमटताना दिसतात. लॅन्सेट डॉट कॉम या त्यांच्या संकेतस्थळाला दरवर्षी चार कोटी लोक भेट देत असतात आणि जवळपास अडीच कोटी संशोधक ‘लॅन्सेट’ची संशोधने डाऊनलोड करत असतात. ट्विटर, लिंक्ड इन अशा सोशल मीडियावर लॅन्सेटचा दबदबा आहे आणि तब्बल वीस लाख जण त्याचे फॉलोअर्स आहेत. पॉडकास्ट आणि यूट्यूब यावरील त्यांची प्रसारणे विलक्षण लोकप्रिय आणि उपयुक्त आहेत. म्हणूनच त्यांचे संशोधन अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवे.

‘लॅन्सेट’च्या ताज्या संशोधनात भारताविषयीची आकडेवारी चिंताजनक आहे. तब्बल 35 टक्के जनता ही रक्तदाबग्रस्त असून 81 टक्के जनतेचे कॉलेस्ट्रॉल अनियंत्रित आहे आणि 15 टक्के जनता मधुमेहाच्या उंबरठ्यावर आहे. कुतूहलापोटी ही आकडेवारी काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीशी पडताळून बघितली तेव्हा यातील धक्कादायक वाढ निदर्शनाला आली. महत्त्वाचे म्हणजे मधुमेहाचे प्रमाण हे विकसित राज्यांमध्ये स्थिरावले असून विकसनशील अथवा मागास राज्यात चिंताजनकरीत्या वाढले आहे. हे संशोधन तब्बल दहा वर्षे चालले होते आणि त्याचा निष्कर्ष म्हणजे भारत हा मधुमेह नावाच्या एका टाईमबॉम्बवर बसला आहे. हे संधोधन ऑक्टोबर 2008 ते 2020 इतका प्रदीर्घ काळ चालले होते आणि या सर्वेक्षणासाठी तब्बल एक लाख लोकांची माहिती सातत्याने गोळा केली जात होती. ‘टाईप 2’ पद्धतीचा मधुमेह रक्तातील साखरेचे प्रमाण आणि योग्य त्या प्रमाणात इन्शुलिन तयार न होणे या सर्व बाबी समोर येत आहेत. अर्थातच याचे मूळ आपल्या जीवनशैलीमध्ये, बैठ्या कामांमुळे, चंगळवादी संस्कृती आणि जंकफूडमध्ये आहे हे उघड आहे. तरुणांमध्ये हृदयविकाराचे आणि मधुमेहाचे प्रमाण शहरे आणि खेडेगावे या दोन्हींकडे वाढताना दिसते. काही प्रमाणात जागृती झाली, पण एक टक्का समाजात. बाकीचे व्यायाम, पौष्टिक अन्न याबाबतीत अत्यंत बेफिकीर आहेत. गेल्या दशकात आपल्या जीवनशैलीत खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडले. शारीरिक श्रम कमी झाले. एक घामरहीत जीवनशैली आम्ही स्वतःवर लादली. त्यात जीवनातील ताणतणाव आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अधिक तास काम याची भर पडली. सहज उपलब्धता आणि चटपटीत स्वाद यामुळे जंकफूड सेवनाचे प्रमाण सर्वत्र वाढले आहे. स्थूलत्व नावाचा फार मोठा रोग अक्षरशः एखाद्या साथीसारखा पसरला आहे. यामुळे हृदयरोगाचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. आज जीवनशैलीमध्ये बदल करून वजन कमी करणे आणि समतोल आहार वाढवणे आवश्यक झाले आहे. अरबट चरबट खाणे कमी करणे आणि चालणे वाढवणे हीच धोक्याची घंटा लॅन्सेटच्या अहवालाने वाजवली आहे. आपण मिळवत असणार्‍या समृद्धीची ही किंमत आहे काय, असा प्रश्न पडतो आणि त्याचे उत्तर म्हणून आपल्या आजी-आजोबांच्या काळातील जीवनपद्धती आणि आहारविचार याकडे वळावेसे वाटते. दुर्दैव म्हणजे महाग असलेले जंकफूड अनेकांचा आहार झाले आहे. यात साखर अणि सोडियमचे प्रमाण कमालीचे जास्त आहे. आज हे सर्व भारतात घडत आहे. मागच्या काही दशकांमध्ये ते दक्षिण अमेरिका आणि युरोपमध्ये घडत होते. ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत आपल्याकडे दीड लाख केंद्रांमार्फत याबाबत जागृती सुरू आहे. तिथे येणार्‍या पेशंटमध्ये मधुमेह, रक्तदाब रुग्णांचा भरणा आहे. केंद्र सरकारच्या श्रीधान्य योजनेमुळे भारतीय नागरिकांच्या कडधान्यांचे (प्रथिने) प्रमाण वाढेल, अशी अपेक्षा आहे. काल आजी-आजोबा, डॉक्टर्स सांगत होते, तेच आता ‘लॅन्सेट’ सांगतेय. हा शेवटचा वेकअप कॉल आहे. तेव्हा वाचा आणि बदला. वाचा आणि चाला. आहार बदलो, जीवन बदलेगा… जीवन बदलो, देश बदलेगा…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या