भुसावळ । प्रतिनिधी bhusawal
तालुक्यातील खडका येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (Republican Party of India) युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष गिरीश तायडे यांच्यावर खडका एमआयडीसी परिसरात गेल्या आठवड्यात रात्री साडेनऊच्या सुमारास धारदार शास्त्रांनी वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती.
या प्रकरणातील संशयित आरोपी हा जितेंद्र भागवत खंडारे (राफखडका, ता.भुसावळ) हा असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा तपास घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी सुरज पाटील, प्रेम सपकाळे व दीपक जाधव असे तिघांचे विशेष पथक गठीत करून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. या पथकाने खडका, किन्ही, शिंदी, वरणगाव, वाराणसी, कानळदा, नांद्रा, जळगाव व भुसावळ अशा ठिकाणी शोध घेतला. दरम्यान डीवायएसपी श्री.पिंगळे यांना मिळालेल्या माहितीवरून सदर आरोपी हा अहमदाबाद येथे त्याच्या बहिणीकडे गेला असल्याचे समजले.
या पथकाने थेट अहमदाबाद गाठले मात्र आरोपी हा तिथूनही निष्ठून रात्री बाराच्या गाडीने नाशिक जिल्ह्यातील सिन्नरकडे निघाल्याची माहिती मिळाल्यावरून या पथकाने रातोरात सिन्नर शहर गाठले. या ठिकाणी असलेल्या हॉटेल शाहू मध्ये आरोपी येणार असल्याचे समजताच तेथे सापळा रचला व आरोपी जितेंद्र खंडारे तेथे पोहोचताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली व ताब्यात घेऊन त्यास भुसावळ येथे वरिष्ठ अधिकार्यांसमोर हजर केले. या गुन्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व डीवायएसपी भुसावळ कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुरज पाटील, प्रेम सपकाळे व दीपक जाधव यांनी ही कारवाई केली. घटनेचा पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोलीस कॉन्स्टेबल संजय तायडे, विठ्ठल भुसे, श्री.मोरे व श्री.पालवे करीत आहेत.