धुळे ।Dhule। प्रतिनिधी
नाशिक येथून बसमध्ये बसलेल्या डिलेव्हरी बॉयकडील सोने-चांदीच्या दागिण्यांचे पार्सल चोरीच्या किचकट गुन्ह्याची धुळे शहर पोलिस व एलसीबीच्या पथकाने उकल केली आहे. थेट उत्तरप्रदेशात जावून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील 49 लाख 36 हजार 715 रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने व गुन्हयात वापरलेली आठ लाखांची कार हस्तगत करण्यात आली. पथकाच्या कामगिरीची माहिती पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पत्रपरिषदेत दिली. तसेच कामगिरीचे कौतूक करीत पथकाला दहा हजाराचे रिवार्ड जाहिर केला.
जयबजरंग कुरीयरचा डिलेव्हरी बॉय गोविंद रघुनाथसिंह सिकरवार हा दि.14 जुन रोजी पहाटे 5.30 वाजता नासिक येथून धुळे येथे सोने चांदीचे दागिण्यांचे पार्सल घेवून साडेआठ वाजता धुळे येथे आला. दरम्यान त्याला बसमध्ये गाड झोप लागल्याने अज्ञात चोरट्यांनी दागिन्यांचे पार्सलची बॅग चोरून नेली.त्यात 64 लाख 80 हजार 253 रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने होते. याबाबत विष्णुसिंह निनुआ सिकरवार (रा.काळबादेवी, मुंबई) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींवर धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हयाचे तपासात तांत्रीक माहितीच्या आधारे सपोनि चंद्रकांत पाटील, पोहेकॉ विजय शिरसाठ, पोना कुंदन पटाईत, पोकाँ महेश मोरे, मनिष सोनगीरे यांनी नासिक, धुळे या ठिकाणाचे फुटेज, तांत्रीक तपासणी करुन, गुन्हयात आरोपी मनोज कुमार राजेंद्रसिंग सिसोदीया (रा. आग्रा, उत्तर प्रदेश), मयंक कुमार आनंदकुमार गुप्ता (रा. फिरोजाबाद उत्तरप्रदेश), पुष्पेंद्रसिंग शिवसिंग तोमर राजपुत (रा.धोलपुर राजस्थान) व राहुल राजेंद्रसिंह सिसोदिया (रा.आग्रा, उत्तरप्रदेश) यांची नांवे निष्पन्न केली.
या आरोपींच्या शोधसाठी एलसीबीब व धुळे शहर पोलीस ठाण्याचे संयुक्तीक पथकाने उत्तरप्रदेश व राजस्थान राज्यात जावून आरोपीतांचा कसुन शोध घेतला. चौघांपैकी पुण्द्रसिंग शिवसिंग तोमर राजपुत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्हयातील गेलेल्या मालापैकी 770 ग्रॅम सोन्याचे दागिने व 2 किलो 400 ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत केले. त्यांची किंमत एकुण 49 लाख 36 हजार 715 रूपये इतकी आहे. तसेच गुन्हयात वापरलेली 8 लाखांची कार (क्र.यु. पी. 83.ए.यु. 9330) असा एकूण 57 लाख 36 हजार 715 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हयाचे तपासात राहुल सिसोदिया याने कुरीयर बॉय गोविंद सिकरवार यास चहामध्ये गुंगीकारक औषध पाजल्याने तो बसमध्ये गाड झोपल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, सहा. पोलिस अधिक्षक ऋषीकेश रेडी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, धुळे शहरचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी तपास अधिकारी सपोनि चंद्रकांत पाटील यांच्यासह पोऊनि प्रकाश पाटील, पोहेकॉ विजय शिरसाठ, योगेश चव्हाण, पोना कुंदन पटाईत, पंकज खैरमोडे, पोकाँ मनिष सोनगीरे, महेश मोरे यांना पर राज्यात पाठवुन कारवाई करून गुन्हयातील गेला माल व आरोपी पुष्पेंद्रसिंग शिवसिंग तोमर राजपुत यांस ताब्यात घेतले. तसेच आरोपी राहुल राजेंद्रसिंह सिसोदिया यास धुळे येवून ताब्यात घेण्यात आले आहे. तपास पथकास लागणारी सर्व तांत्रीक माहिती सायबर विभागाचे सपोउनि संजय पाटील व पोकॉ अमोल जाधव यांनी उपलब्ध करुन दिली.
नियोजनबध्द पध्दतीने केला गुन्हा, डिलेव्हरी बॉयला गुुंगीचे औषध
आरोपींनी नियोजनबध्द पध्दतीने हा गुन्हा केला. डिलेव्हरी बॉयवर लक्ष ठेवले. बसमध्ये त्याच्या बाजुचेच टिकीट बुक केले. बसमध्ये आल्यानंतर राहुल सिसोदिया याने कुरीयर बॉय गोविंद सिकरवार यास चहामध्ये गुंगीकारक औषध पाजल्याने तो बसमध्ये गाड झोपला. त्यानंतर आरोपींनी डिलेव्हरी बॉयला जाग आल्यानंतर त्याला दागिने चोरीचे लगेच लक्षात येवू नये म्हणून त्याच्या बॅगेत वजनासाठी नारळ आणि पाण्याच्या दोन बाटल्या ठेवल्या. दरम्यान याच्याआधीही आरोपींनी मालेगाव मध्ये असा चोरीचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला होता. डिलेव्हरी बॉयने तेव्हा तक्रार न केल्याने तो प्रकार समोर आला नाही. दरम्यान आरोपी राहुल डिलेव्हरीचेच काम करतो.