नाशिक । प्रतिनिधी Nashik
घरात खेळण्यासाठी आलेल्या सात वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने २० वर्षे सक्तमजूरी व २० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. हेमराज अशोकराव कदम असे आरोपीचे नाव आहे. त्याने ६ नोव्हेंबर २०१९ रोजी पीडितेवर अत्याचार केला होता.
पीडित मुलगी ही दिंडोरी तालुक्यातील कोराटे या गावी तिच्या मैत्रीणीसोबत खेळत होती. त्यावेळी ती आरोपी हेमराजच्या घरी गेली. त्याने पीडितेवर अत्याचार केला. तर संशयित गोदावरी कदम हिने पीडितेस कोणास काही न सांगण्याची धमकी दिली. याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात हेमराजसह त्याची पत्नी गोदावरीविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्कालीन उपनिरीक्षक एस. बी. नवले यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अॅड. सुलभा सांगळे यांनी युक्तीवाद केला. गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने हेमराजला २० वर्षे सक्तमजूरी व २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तर संशयित गोदावरी कदम हिची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. पैरवी अधिकारी म्हणून सहायक उपनिरीक्षक के. के. भोये यांनी कामकाज केले.