– डॉ.संजय कळमकर
लेखक, चित्रपट निर्माते, वक्ते, राजकारणी, पत्रकार, कवी अशा नानाविध क्षेत्रांमध्ये लिलया वावरणारे आचार्य अत्रे यांची नुकतीच 125 वी जयंती साजरी झाली. आचार्य अत्रे हे एक शिक्षक होते. चांगले भाषांतरकार होते. त्यांचे लिखाण सोपे, सहज होते. वक्तृत्वासोबतच लेखन हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. शिवाय हे लेखन अचूक आणि योग्य असण्याकडे त्यांचे नीट लक्ष असे. तेंडुलकर हे सुरुवातीच्या काळात ‘मराठा’ मध्ये काम करत असत. एका इंग्रजी लेखाचे भाषांतर करण्याची जबाबदारी तेंडुलकर यांच्यावर आली.
भाषांतर झाल्यानंतर अत्रेंकडे सोपवण्यात आले. काही वेळाने पहिल्या मजल्यावरील अत्रेंच्या केबिनमधून खालच्या मजल्यावरील कार्यालयात इंटरकॉम दणाणला आणि समोरून विचारले गेले, ‘तेंडुलकर आहेत का तेंडुलकर? वर पाठवा त्यांना’. सूचनेबरहुकूम तेंडुलकर अत्रेंच्या केबिनमध्ये गेले. अत्रे म्हणाले, हे तुमचे भाषांतर. काय हे, सगळे चुकले आहे. अगदी चूक. ही काय वाक्ये. हे शब्दप्रयोग काय, हे कुणाला कळणार? तेंडुलकर सांगतात, एकेक लाल खूण केलेले उदाहरण घेऊन चूक पदरात घालण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. यापुढे अत्रेंनी तेंडुलकरांना सांगितले ते जास्त महत्त्वाचे आहे. अत्रे म्हणाले, भाषा सोपी पाहिजे. ‘इव्हन अ चाईल्ड शुड फॉलो इट.’ ती कळली पाहिजे. तर उपयोग! नाही तर हे. सोपे लिहीत चला. छोटी छोटी वाक्ये. सुंदर सुंदर साधे शब्द. सुंदर शब्द मराठीत पुष्कळ आहेत, गाथेत आहेत. जुन्या काळातल्या बायका बोलतात तसे.
बहिणाबाई वाचा. असे शब्द जगात दुसर्या भाषेत नाहीत. तसे लिहिता आले पाहिजे. जे कळत नाही ते बोंबलायला कशासाठी लिहायचे? आचार्य अत्रे यांनी अनेक इंग्रजी शब्दांना मराठी पर्यायी शब्द दिले. लिहिणे ही कायमच अत्रेंची जमेची बाजू राहिली. लेखनासंबंधातला असाच एक किस्सा मधुकर भावे यांनी लिहून ठेवलाय. विन्स्टन चर्चिल यांच्या निधनावेळीचा. 24 जानेवारी 1965 ची गोष्ट. गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण व्हावे, असा ठराव गोवा विधानसभेने एकमताने मंजूर केला. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या सत्काराचा कार्यक्रम पणजीच्या आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला. हा सत्कार आचार्य अत्रेंच्या हस्ते ठेवण्यात आला.
सभेनंतर आचार्य अत्रे मांडवीतल्या हॉटेलात मुक्कामी आले. जेवायला बसणार इतक्यात इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या निधनाची बातमी आली. त्यांनी भरल्या ताटाला नमस्कार केला आणि जेवण बाजूला ठेवले. अत्रेंनी भावेंना ‘मराठा’च्या कार्यालयात फोन करायला सांगितला आणि फोनवरून संपूर्ण अग्रलेख सांगितला. दुसर्या दिवशी म्हणजे 25 जानेवारील ‘मराठा’मध्ये आलेला ‘सर विन्स्टन चर्चिल’ हाच तो अग्रलेख! आचार्य अत्रे हा मराठी साहित्यातला एक चमत्कार होता. ते स्वतःला ‘जीवनाचा यात्रेकरू’ म्हणत असत. अत्रे यांचा विनोद साक्षात धबधबा होता. अत्रे हे फक्त अत्रेच होते. खंडाळ्याकडे जाताना ते पनवेलला एसटी स्टॅण्डवर थांबून बुक स्टॉल बघत असत आणि एक एक म्हणता गाडीभर पुस्तके खरेदी करत असत.
ही खरेदी इतकी मोठी असे की आचार्य अत्रे यांना गाडीत बसल्यावर आपला देह संकुचित करून घ्यावा लागे असे सांगतात. विनोद हीदेखील त्यांची जीवननिष्ठा होती. ती त्यांनी साहित्यातून सतत वाहती ठेवली होती. देत राहणे, सांगत राहणे, लोकप्रबोधन करणे हा त्यांच्या प्रकृतीचा ‘छंद’ होता. हास्य ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे आणि त्यावरच विनोदाची इमारत उभारली गेली आहे. ‘जाम हशिवनारा माणूस’ ही अत्रे यांची तयार झालेली प्रतिमा होती. अत्रे हे एकाच वेळी पत्रकार होते, नाटककार होते, वक्ते होते, समीक्षक होते, दिग्दर्शक होते, विनोदकार होते. ते काय नव्हते? सर्व काही होते!