धुळे । प्रतिनिधी dhule
तिखी (ता.धुळे) येथे फिरस्ती वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरला आरोग्य विभागाच्या पथकाने पकडले. काल रात्री ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडील वैद्यकीय प्रमाणपत्र हे अॅलोपॅथी नसल्याबाबत आढळून आले. तसेच सीएमएस या प्रमाणपत्राची वैधदा देखील संपलेली असल्याचे दिसून आले, म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आले.
संग्रामसिंग कोलमसिंग देवरे (रा.सावळदे ता.धुळे) असे त्याचे नाव आहे. या बोगस डॉक्टरबाबत धुळे तालुका पंचायत समितीचे तालुका आरोग्याधिकारी डॉ.तरन्नुम पाटील यांना माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी सहकारी व बोरकुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कपील नारसिंग पावरा, आरोग्यसेवक शरद नथ्थु खैरनार यांना सोबत घेत तिखी गाव गाठले. रात्री नऊ वाजता संग्रामसिंग देवरे हा गावात फिरस्ती वैद्यकीय व्यवसाय संपवून निघण्याच्या मार्गावर असतांनाच पथकाने त्याला खंडेराव मंदिर चौकात पकडले.
चौकशी करून त्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली. तेव्हा त्याने व्हॉट्सअॅपवर त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र मागवून दाखविले. मात्र ते अॅलोपॅथी नसल्याचे आढळून आले. म्हणून संग्रामसिंग देवरे याच्याविरोधात डॉ.कपील पावरा याच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 420, 419 सह औषधीद्रव्य व सौदर्यप्रसाधणे अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई राजु सुर्यवंशी हे करीत आहेत.